⭕निखिल वागळेंचे जरांगे प्रेमः संविधान-विरोधी व ओबीसी-विरोधी। (पुर्वार्ध)(लेखाचा भाग-3)
🔵पत्रकारांनी दोन्ही बाजूंचा अभ्यास करावा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
अकलूज दिनांक 30/9/2026 :
जेव्हा जेव्हा वर्ण-जातीव्यवस्था नव्या स्वरूपात पुनरूज्जिवीत करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा तथाकथित क्षत्रिय वर्ण-जातीचे क्षत्रियत्व जागृत करण्यात येते व क्षत्रिय वर्ण-जातीच्या खांद्यावर बंदुक ठेवून वर्ण-जातव्यवस्था मजबूत करण्यात येते. गेल्या दोन शतकातील फुले, शाहू, आंबेडकर व पेरियार या महापुरूषांच्या जात्यंतक चळवळींमुळे जातीव्यवस्था काही प्रमाणात का होईना पण खिळखिळी झाली आहे. त्यात भर घातली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने! संविधानामुळे ब्राह्मण-क्षत्रियांच्या जातीय हितसंबंधांवर कायदेशीर बंधने आलीत. संविधानाने जातीय समतोल साधण्यासाठी काही जातींना आरक्षण वगैरे सारख्या उपाययोजनेत समाविष्ट केले व काही जातीना बाहेर ठेवले. संविधानाने आरक्षणाच्या कक्षेबाहेर ठेवलेल्या जातींमध्ये राज्यस्तरावरील सत्ताधारी जाती येतात व त्या स्वतःला क्षत्रिय समजतात.
मंडल आयोगाच्या संघर्षातून मिळालेल्या ओबीसी आरक्षणातून 52 टक्के असलेला ओबीसी समाज जागृत होत आहे व त्या संघर्षातून जे नेतृत्व निर्माण होत आहे तेच ओबीसी नेते आज ब्राह्मण-क्षत्रियांच्या सत्तेला आव्हान ठरत आहेत. मुसलमान, दलित वगैरे सर्व समाजघटकांचे नेतृत्व संघ-भाजपाच्या नियंत्रात (शरण) आणता येते, परंतू, ओबीसी आरक्षणाच्या संघर्षातून निर्माण होणारे नेते ब्राह्मण-क्षत्रियांच्या खिशात कोंबणे अशक्य आहे, हे त्यांना *त्यागमुर्ती चंदापूरी, भारतरत्न कर्पूरी ठाकूर, शहिद बाबू जगदेव प्रसाद, लालू-मुलायम, करूणानिधी-स्टॅलिन वगैरे असंख्य राष्ट्रीय ओबीसी नेत्यांनी दाखवून दिलेले आहे.* अशा वेळी ब्राह्मनवाद्यांसाठी ओबीसींची जागृती रोखणे आवश्यक होउन बसते. म्हणून त्यांनी मंडल-युगाच्या ऐन तारूण्यात बाबरी मशिदविरोधात राममंदिरवादाचे बाळ *अनैतिक* मार्गाने जन्माला घातले व बाबरी मशिदीच्या ढिगार्याखाली मंडल आयोगाला गाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतू पाताळालाही चिरून पृथ्वीवर अवतारणार्या *बळीराजाचा वारसा* ओबीसींना लाभलेला असल्याने ओबीसी समाजाने ना त्या ढिगार्याला दाद दिली. ना त्या रामाला *‘भीख’* घातली. ओबीसींनी सात्याने संघर्ष करून मंडल आयोगाचे ओबीसी आरक्षण मिळवूनच दाखविले.
*ओबीसी आरक्षण खतम केले तरच या ओबीसींची जागृती रोखता येईल व ओबीसी समाजाचे ब्राह्मणीकरन गतिमान करता येईल,* ना रहेगा बांस, ना बजेगी बासरी, हे संघ-भाजपाने ओळखले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे ओबीसींचे आरक्षण काढून घेता येत नाही, परंतु ते ओबीसींकडून पूर्णपणे हिसकावून घेता येते, हे हिसकावून घेण्याचे काम संघ-भाजपाने तथाकथित क्षत्रीय जातींकडे सोपविलेले आहे. *गेल्या दशकात संपूर्ण देशातील राज्यात सत्ताधारी असलेल्या जाट, पटेल, मराठा यासारख्या क्षत्रिय(?) जमीनदार व पुढारलेल्या जाती अचानक आरक्षण मागायला लागल्या व ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे म्हणून हट्ट धरायला लागल्यात,* हा काही योगायोग नाही. ओबीसी जातींच्या यादीत जाट, पटेल, मराठा या पुढारलेल्या जाती घुसल्या की त्या आपोआप खर्या ओबीसींचे ताट हिसकावून घेतील व ओबीसी आरक्षण पूर्णपणे फस्त करतील, याची खात्री ब्राह्मणवाद्यांना आहे. ओबीसींचे आरक्षण मराठ्यांनी खाल्ले तर ब्राह्मणांना मराठ्यांपासून काहीही धोखा नाही, कारण *मराठा जात ‘क्षत्रीय’* म्हणून प्राचीन काळापासून ब्राह्मणांच्या खिशात आहे व या जातीला केव्हाही खांद्यावर घेता येते व केव्हाही पायाखाली घेउन चिरडून टाकता येते, हे ब्राह्मण परशूरामाने *एकवीस वेळा* सिद्ध केलेले आहे व आता *बावीसाव्या वेळी* एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार हेच सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. *‘एक ब्राह्मण लाख मराठ्यांना भारी’* हा वाक्प्रचार *महादेव जानकर* यांनी परशूरामाचे अवतार असलेल्या श्रीमंत पेशवा फडणविसांना डोळ्यासमोर ठेवून व त्यांच्या पायाखालच्या *शिंदे1 व पवार2* यांच्या लाचार अवस्थेकडे पाहून प्रचारात आणलेला आहे. ब्राह्मणी षडयंत्र ओबीसी आरक्षण पूर्णपणे खतम करेल ही रास्त भीती ओबीसींच्या मनात पक्की घर करून बसलेली आहे. म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात राहणार्या व 358 छोट्या-मोठ्या जातीत विखुरलेल्या कष्टकरी जाती आज आपल्या हक्काचे संवैधानिक ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी *आक्रोश* करीत आहेत.
आपला ब्राह्मणी अजेंडा राबविण्यासाठी संघ-भाजपाकडे केवळ हिन्दुत्ववादी फौज असते असे समजण्याचे कारण नाही. संघ-भाजपा हे शेकडो हातांनी *कारवाया* करतात व हजारो पायांनी *‘‘चाली’’* चालतात! त्यांचे हस्तक वा ‘टुल’ प्रत्येक विचार-तत्वज्ञानधारेत, प्रत्येक पक्ष-संघटनेत, प्रत्येक गटा-तटात, प्रत्येक धर्म-पंथात, प्रत्येक वर्ग-वंशात व प्रत्येक जाती-जमातीत विखुरलेले आहेत. जे टूल बाळगतात ते चांगलेच जाणतात की कोणत्या वेळी कोणते टुल वापरायचे आणी कसे वापरायचे!
*मुख्यतः जेव्हा जेव्हा जातीच्या प्रश्नावर जेव्हा अटी-तटीची लढाई सुरू होते तेव्हा तेव्हा संघ-भाजपाची ढाल बनून पुढे सरसावतात ते तथाकथित समाजवादी-ब्राह्मण, कम्युनिस्ट-ब्राह्मण, गांधी-नेहरूवादी व तथाकथित फुलेवादी-आंबेडकरवादी म्हणविणारे सेलिब्रिटीज!* बरं हे सेलिब्रिटीज पुरोगामी असूनही संघासाठी का काम करतात, असा प्रश्न भोळ्या-भाबड्या दलित-ओबीसींच्या मनात निर्माण होउ शकतो. यात गोम अशी आहे की या सेलिब्रिटीज लोकांना सेलिब्रीटी बनवतं कोण, तर मनुवादी मिडिया! ब्राह्मणवादी मिडिया निगेटिव्ह-पॉझिटिव्ह प्रसिद्धी देऊन हे सिलिब्रिटीज निर्माण करतो व *बहुजन समाज या सेलिब्रिटीजना उरावर घेतो.* त्यामुळे संघ-भाजापा त्यांच्याकडून योग्यवेळी ‘‘वसुली’’ करून घेतो, बस्स!
आता हा झाला वैचारिक मुद्द्याचा भाग! प्रॅक्टीकलचं काय? आमच्या ओबीसींना केवळ एखादा विचार सांगून चालत नाही, त्यांना ‘‘उदाहरणार्थ’’ असे एखादे प्रॅक्टीकल सांगीतले की लवकर समजतं आणी तेवढ्याच उशीरा वळते सुद्धा!
महाराष्ट्रात *माधव गडकरी* नावाचे थोर पत्रकार होउन गेलेत. ते पुरोगामी डावे वगैरे म्हणून ओळखले जात होते. डावे-पुरोगामी असूनही मक्तेदार-भांडवलदारांच्या दैनिकात ते मुख्य संपादक म्हणून काम करीत होते. *‘इंडियन एक्सप्रेस’* या ब्राह्मणी-भांडवली उद्योगसमुहातील *‘लोकसत्ता’* मराठी दैनिकाचे ते संपादक! संपादक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सांगायचे तर *मोक्याची व मार्याची ‘जागा’* होय! या गडकरी महाशयांनी अनेक पुरोगामी अग्रलेख लिहून आपली पुरोगामी ‘इमेज’ निर्माण केलेली! सत्ताधार्यांच्या विरोधात आक्रमक लेखणी चालविनारा झुंजार पत्रकार म्हणून ओळख निर्माण केलेली. आता ऐन मोक्याच्या वेळी पुरोगामी पत्रकार कसे *यु-टर्न* घेतात ते पहा!
*महाराष्ट्रात बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे 1980 साली मुख्यमंत्री झालेत आणी संघ-आर.एस.एस. चा हिन्दुत्ववाद धोक्यात आला. केवळ हिन्दुत्ववाद धोक्यात आला* एव्हढेच पुरेसे नाही, तर महाराष्ट्रातील 96 कुळांची बेरीजही धोक्यात आली. बॅ. अंतुले साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अनेक पुरोगामी योजना राबविल्यात, त्यांचे कौतुक तर झाले नाहीच. परंतु एक मुसलमान नेता 96 कुळी मराठ्यांच्या डोक्यावर येउन बसला याचेच जास्त दुःख येथील प्रस्थापित जातींना जिव्हारी लागले. त्या आधी या प्रस्थापित जातींनी मालेगावचे सुप्रसिद्ध समाजवादी नेते निहालभाई अहमद यांना मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले होते. बरे, हा अंतुले नावाचा मुसलमान नेता मुख्यमंत्री झाल्यावर ब्राह्मण-मराठ्यांच्या हातचा बाहुला झाला असता तर कदाचित पूर्ण कार्यकाळ टिकलाही असता, पण अंतुलेसाहेब होते धडक व तडका-फडकी निर्णय घेणारे स्वाभिमानी मुख्यमंत्री! ते कसे ते सांगतो-
महाराष्ट्रातील बहुतेक सगळेच साखर-सम्राट मराठाच! केवळ साखर-सम्राटच नव्हे तर ‘‘सहकार-माफियाच’!’ त्यामुळे माळी जातीने स्वकष्टातून उभा केलेला एकमेव माळीनगरचा साखर कारखाना मराठा-ब्राह्मणांच्या डोळ्यात सलत होता. *1979-1980 च्या काळात साखर-सम्राट असलेले शंकर मोहिते पाटलांनी हा माळीनगरचा साखर कारखाना शिस्तबद्ध पद्धतीने हिसकावून घेतला व बंद पाडला. मात्र मुख्यमंत्री असलेल्या अंतुलेसाहेबांनी अनेक प्रयत्न करून हा कारखाना माळी जातीच्या ताब्यात परत दिला.* हा जिव्हारी बाण ब्राह्मण-मराठ्यांच्या वर्मी लागला आणी अंतुलेंना मुख्यमंत्रीपदावरून काढण्यासाठी षडयंत्र सुरू झालीत. या षडयंत्रात मोक्याच्या व मार्याच्या ठिकाणी बसलेले माधव गडकरी टुल म्हणून वापरले गेलेत. *जेव्हा एखादी व्यक्ती मनुवाद्यांना नकोशी होते तेव्हा त्या व्यक्तीशी सरळ मुद्द्यानिशी लढणे कठीण असते, म्हणून त्याची बदनामी करणे, चारित्र्यहनन करणे वगैरे फंडे वापरले जातात.* अंतुलुसाहेबांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आलेत. जणू काय सगळे मराठा सत्ताधारी धुतल्या तांदळाचेच होते! दैनिक लोकसत्ता मधून गडकरींनी अंतुलेंविरोधात गरळ ओकायला सुरूवात केली आणी परिणामी अंतुलेंना 1982 साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
याच माधव गडकरींच्या नावावर आणखी एका पराक्रमाची एतिहासिक नोंद आहे. 1987 सालची घटना! मंडल-युग अवतरत असतांना हिन्दु-ओबीसींचे मोठ्या प्रमाणात फुले-आंबेडकरी धृवीकरण सुरू झाले होते. *ओबीसींच्या या पुरोगामी धृवीकरणाला रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर बाबरी मशिदीच्या व राम-मंदिराच्या नावाने षडयंत्र सुरू झाले होते. परंतु संघ-भाजपाने फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे षडयंत्र वेगळ्या पद्धतीने राबविले.* डावे-पुरोगामी इमेज असलेल्या गडकरींना पुन्हा एकदा ‘टुल’ म्हणून वापरले गेले. महाराष्ट्र शासनाने 1987 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा *‘‘Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches (BAWS) Volume-4’’* प्रकाशित केला. या खंडात परिशिष्ट म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे *‘‘रिडल्स ऑफ राम-कृष्णा’’* हे प्रकरण समाविष्ट केले. या परिशिष्टामुळे संघ-भाजपाचा हिन्दुत्ववाद (ब्राह्मणवाद) धोक्यात आला, आणी त्यांनी मोक्याच्या व मार्याच्या जागी बसलेल्या पुरोगामी गडकरींना कामाला लावले. डाव्या-पुरोगामी माधव गडकरींनी लोकसत्तामधून अग्रलेख लिहीला आणी डॉ. बाबासाहेबांच्या या परिशिष्टाला *‘कॅन्सर’* संबोधून ग्रंथातुन काढून टाकायला सांगीतले. त्या काळात शिवसेनेमध्ये मोठ्याप्रमाणात ओबीसी होता. कार्यकर्ते व उपनेते मोठ्या प्रमाणात ओबीसी असले तरी मुख्य नेता सीकेपी म्हणजे (अर्ध) ब्राह्मणच होता. *चित्पावन माधव गडकरींच्या चिथावणीवरून सीकेपी ब्राह्मण नेत्याने पूर्ण महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या विरोधात गरळ ओकून दंगली-सदृष्य हिंसक वातावरण निर्माण केले.* मोर्चे-प्रतिमोर्चे निघालेत व दलित-ओबीसी फुट पाडून ओबीसींचे हिन्दुकरण करण्यात संघ-भाजपाला मोठे यश मिळाले. गडकरींच्या लेखणीने ओबीसींवरचा मंडल-प्रभाव निस्तेज करण्याचा प्रयत्न केला व ओबीसींचे ब्राह्मणीकरण गतिमान करण्याचा प्रयत्न झाला.
अशी अनेक उदाहरणे देता येतील. ब्राह्मण जातीतील समाजवादी पुरोगामी म्हणविणार्या *अनंत भालेराव (संपादक, दै. मराठवाडा) व गोविन्दभाई श्रॉफ यांनी नामांतर चळवळीत घेतलेल्या ब्राह्मण-मराठावादी भुमिकेने किती दलितांचे बळी घेतलेत,* याची नोंद इतिहासाने करून ठेवलेली आहे. पश्चिम बंगालचे दिर्घकाळ राहीलेले मुख्यमंत्री ज्योती बसू व त्यांच्या कम्युनिस्ट पक्षांचे सर्व विद्वान ब्राह्मण नेते या सर्वांनी मंडल आयोगाविरोधात घेतलेली भुमिका किती कट्टर ब्राह्मण-क्षत्रियवादी होती, हे प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील यांनी अनेकवेळा सिद्ध केलेले आहे. हे सर्व विद्वान, पत्रकार व नेते केवळ ब्राह्मण होते म्हणून त्यांनी ब्राह्मणवादी भुमिका घेतली, असे नव्हे तर संघ-भाजपाने त्यांचेवर डावे-पुरोगामी विद्वान-पत्रकार, नेते म्हणून टाकलेली ती ‘जबाबदारी’ होती, जी त्यांनी ईमाने-ईतबारे पार पाडली.
*संघ-भाजपाने आता आपला जुना ‘आरक्षणविरोधी पॅटर्न’ सोडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान इतके अभेद्य व मजबूत आहे की, त्यातून काडीईतकेही आरक्षण काढून घेता येत नाही. त्यामुळे ब्राह्मण-क्षत्रिय(?) जातींनी आपला जुना ‘‘आरक्षणविरोधि पॅटर्न’’ सोडून देऊन जाती-जातीत भांडणे लावन्याचा ट्रेण्ड सुरू केलेला आहे.* आदिवासी विरुद्ध धनगर, मातंग विरुद्ध महार आणी ओबीसी विरुद्ध मराठा आणी असे बरेच संघर्ष कमी-अधिक प्रमाणात सुरू आहेत. यापैकी बहुतेक संघर्ष शासित-शोषित जातींमध्येच सुरू आहेत व ते ब्राह्मणी प्रतिक्रांतीचे लक्षण आहेत. *परंतु, ओबीसी विरुद्ध मराठा हा एकमेव जात-संघर्ष जात्यंतक क्रांतीला पोषक आहे.* (हा मुद्दा समजुन घेण्यासाठी प्रा. श्रावण देवरे यांनी लिहीलेला ‘‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतिकारक पर्व खंड-1’’ हा दोन खंडी ग्रंथ वाचणे आवश्यक आहे.) *शासित-शोषित ओबीसी जातींच्या विरोधात शासक-शोषक मराठा जात हा जातीसंघर्ष मुलभूत जात्यंतक असल्याने संघ-भाजपा या संघर्षात पुरोगामी पत्रकार असलेल्या निखिल वागळेंना ‘टूल’ म्हणून वापरून घेत आहेत.* अर्थात हे वापरून घेणे सरळ मार्गाने नसून व्हाया शरद पवार अशा ‘वाकड्या’ तोंड-मार्गाने आहे. निखिल वागळे हे समाजवादी पुरोगामी व अभ्यासू नेते आहेत. मराठा-ओबीसी संघर्षात त्यांनी प्रा. श्रावण देवरे यांना ओबीसींची बाजू मांडण्यासाठी अनेक टि.व्ही. चॅनल्सवर संधी मिळवून दिली आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी निखिल वागळेंचे कायम आभारी राहू! म्हणूनच त्यांनी आता अचानक घेतलेल्या ‘यु-टर्न’ मुळे तमाम ओबीसी समाज दुखावलेला आहे व त्यांच्या अधःपतीत भुमिकेमुळे चिंतीतही आहे. *माधव गडकरी, अनंत भालेराव यासारख्या विश्वास-घातकी पत्रकारांचा वारसा निखिल वागळे पुढे चालविणार असतील तर ती महाराष्ट्रासाठी मोठी चिंतेची बाब ठरणार आहे.*
एक अभ्यासू पत्रकार म्हणून निखिल वागळेंना चांगलेच माहित आहे की संविधानिक दृष्ट्या ओबीसी समाजघटक हा शोषित-शासित ‘मागास’ आहे व घटनेच्या 340 व्या परिच्छेदानुसार तो आरक्षणास पात्र आहे. तसेच वागळेंना हेही माहीत आहे कि, संविधानाच्या 15 (4) व 16 (4) परिच्छेदानुसार मराठा ही जात सत्ताधारी जात असून पुढारलेली आहे. त्यामुळे मराठा ही जात आरक्षणासाठी पूर्णपणे अपात्र आहे. *देश पातळीवर मागास वर्ग कोण हे ठरविण्यासाठी केन्द्र सरकारने नियुक्त केलेले तज्ञांचे कालेलकर आयोग व मंडल आयोग, राज्यस्तरावरील सरकारने नियुक्त केले तज्ञांचे सहा मागास आयोग, हायकोर्ट, सुप्रिम कोर्ट अशा सर्व संवैधानिक संस्थांनी अनेकवेळा सिद्ध केले आहे की, मराठा जात पुढारलेली सत्ताधारी जात आहे व ती आरक्षनासाठी पूर्णपणे अपात्र आहे.* अशा परिस्थितीत एक समाजवादी, पुरोगामी, अभ्यासु व झुंजार पत्रकार म्हणून वागळेंनी ओबीसींची बाजू घेउन पत्रकारिता करणे अपेक्षित आहे. अर्थात त्यांनी ते पुरोगामी कर्तव्य केले नाही म्हणून आमचा त्यांच्यावर राग असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला राग तेव्हाच येतो जेव्हा एखादा पत्रकार पुरोगामी व अभ्यासू असूनही सत्ताधारी पुढारलेल्या जातीची अन्याय्य बाजू उचलून धरतो व शोषित ओबीसींच्या न्याय्य बाजूला दडपून टाकतो.
निखिल वागळे यांनी जरांगेला ‘मोठा’ करण्यासाठी लेख लिहीलेत आणी आता फेसबुकवर पोस्ट टाकून जरांगेला प्रसिद्धी देत आहेत. महाराष्ट्र शासनाला अप्रत्यक्षपणे धमकीवजा भाषणे यु-ट्युबवर टाकून जरांगेच्या ओबीसी-विरोधी मागण्या मान्य करायला भाग पाडत आहेत. अर्थात निखिल वागळे हे सुरूवातपासूनच ओबीसीविरोधी आहेत. *वागळेसारख्या असंख्य डाव्या-पुरोगामी नेत्यांना व पत्रकारांना ‘ओबीसी’ शब्द आठवला की ‘भुजबळ’ आठवतो व भुजबळ आठवला की फक्त ‘भ्रष्टाचार’ आठवतो.* पण भुजबळांनी ओबीसींसाठी केलेली कामे यांना कधीच आठवत नाही. भुजबळांच्या व्यतिरिक्त असे असंख्य नेते व अगणीत ओबीसी कार्यकर्ते आहेत, जे मराठा गुंडाच्या दहशतीला झुगारून जीव धोक्यात घालून आपले हक्काचे संविधानिक ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. *एखादा तरी लेख, एखादि तरी पोस्ट लक्ष्मण हाके, ससाणे यांच्यासाठी लिहीण्याची तसदी घेतली का वागळेंनी?*
अर्थात मराठ्यांच्या अन्याय्य बाजुने लिहीण्याने व संविधानविरोधी भुमिका घेतल्याने निश्चितपणे वागळेंचे फॅलोअर्स वाढतील, त्यांचा टी.आर.पी. वाढेल, त्यांच्या यु-ट्युब चॅनलला खूप *‘मराठा-लाईकही’* मिळतील व त्यातुन त्यांची कमाईसुद्धा वाढेल. मराठा जात सत्ताधारी, जमीनदार, कारखानदार व सहकार-माफिया असल्याने ते वागळेंचे सर्व लाड पुरवू शकतात. अ-संघटित, अ-जागृत व शोषित-पिडित ओबीसी जाती तुम्हाला काहिही देऊ शकणार नाहीत, ना पैसा, ना लाईक, ना टी.आर.पी.! परंतू, मग तुम्ही स्वीकारलेल्या समाजवादाचे काय? तुम्ही नेहमी ज्यांचा आदर्श सांगतात ते लोहिया, जयप्रकाश नारायण, गांधी-नेहरू वगैरेंचा समाजवाद तर शोषित-पिडित जनतेसाठीच होता ना? तुम्ही *संघ-भाजपाच्या विरोधात घेतलेल्या ‘संविधान-बचाव’ भूमिकेचे काय करायचे? का तोही धंद्याचा भाग समजायचा?* समाजाने तुम्हाला पुरोगामी पत्रकार, विद्वान व अभ्यासू म्हणून मान्यता दिलेली आहे तिचा तुम्ही असा ‘धंदा’ करायचा? देशासाठी समाजासाठी स्वेच्छेने दारिद्र्य स्वीकारलेल्या महापुरूषांनी प्रस्थापितांचा व सत्ताधार्यांचा छळ सहन केला त्या *गांधी, फुले, आंबेडकर, जय प्रकाश नारायण यांचा आदर्श तुम्ही एकीकडे समाजाला शिकवायचा आणी स्वतः मात्र या महापुरूषांच्या नावांचा धंदा करायचा, ही कुठली नैतिकता?*
पुरोगामी, समाजवादी, डावे नेते-पत्रकार वगैरे सेलिब्रीटीज हे कोणाच्या जीवावर मोठे होतात? अर्थातच बहुजन समाजाच्या जीवावर! आणी या बहुजन समाज घटकात ओबीसी सर्वात मोठा समाज घटक आहे. आणी तरीही बहुतेक सेलिब्रिटीज, पत्रकार वगैरे हे दलित-ओबीसींच्या विरोधात टुल म्हणून वापरले जातात? म्हणून दलित-ओबीसींना मी आवाहन करेन की पुरोगामी, डावे, अभ्यासू असलेल्या सेलिब्रिटी पत्रकार-नेत्यांवर विश्वास ठेवू नका! ते ऐन मोक्याच्या वेळी विश्वास-घातकी म्हणून सिद्ध होतात. तेव्हा सावधान व्हा!
पुढील भागात निखिल वागळेंच्या *जरांगे-स्तुतीस्तोत्र* गाणार्या लेखांचे व त्यांच्या यु-ट्युब चॅनलचे विश्लेषण करू या व अशीच आणखी काही उदाहरणे बघु या! तो पर्यंत जयजोती, जयभीम, जय पेरियार, सत्य की जय हो!
लेखकः
रविन्द्र सोलनकर महासचिव,
धोंडू मानकर, कोषाध्यक्ष
सचिनदादा माळी संघटक
ओबीसी राजकीय आघाडी
0 टिप्पण्या