रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धेत महर्षि प्रशाला प्रथम
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/8/2026 :
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुलींच्या "रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य" स्पर्धेत महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यांनी प्रथम क्रमांकासह रोख रुपये एक लाखाचे बक्षीस पटकावले. स्मृतीभवन शंकरनगर येथे
मोठ्या दिमाखात संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सौ.सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते झाले. या वेळी ग्रामीण कला, क्रीडा व संस्कृतीचे जोपासक जयसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील,सौ.ऋतुजादेवी मोहिते पाटील,सौ.सुनयना जगताप, अकलूजचे नगरसेवक व युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील, दिपकराव खराडे पाटील,सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील द्वितीय क्रमांक विभागून सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, जिजामाता कन्या प्रशाला अकलूज व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला शंकरनगर या संघांना प्रत्येकी ७१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.व सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला गृहविज्ञान महाविद्यालय अकलूज व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सदरचा बक्षीस समारंभ सौ. सुनयना जगताप व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रस्ताविकात स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली व महिलांच्या पारंपारिक खेळासाठी समर्पित असलेली ही देशातील पहिलीच स्पर्धा आहे. मागील तीन वर्षांपासून शिवपार्वती मंदिर परिसरात सुरु केले असून गत वर्षी वीस हजाराहून अधिक महिलांनी या सोहळ्याचा आनंद घेतला.महिलांना घरकामातुन विरंगुळा मिळावा,आपली संस्कृती जोपासावी, महिलां व मुलींना व्यासपीठ मिळावे हा हेतू आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभ्यासक्रमात पारंपारिक खेळाचे पुस्तक प्रकाशित करुन त्यांचे शिक्षण दिले जात आहे.
जयसिंह मोहिते पाटील यांनी मागील पन्नास वर्षांत सुमारे ४० हुन अधिक भव्यदिव्य कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.आनंदयात्रा, विज्ञानयात्रा, गौरव मराठी मातीचा,गौरव भारतीय लोककलेचा,रयतेचा राजा,राजा शिवछत्रपती,शंभर वर्षांपूर्वीच गांव, चित्ररथासह भव्य प्रजासत्ताक दिन सोहळे आदी कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे.
लेझीम स्पर्धेतून सुमारे ४७ हजार मुले,मुली खेळाडू तयार झाले आहेत.तर मागील ४८ वर्षे सुरु असणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाच्या समुह नृत्य स्पर्धेतून राष्ट्रीय पारितोषिक विजेते कलाकार निर्माण केले आहेत.
जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावत चाललेली महाराष्ट्राची लोककला जतन व्हावी यासाठी स्पर्धेचे आयोजन केले. भारतीय परंपरा महिलांनी जिवंत ठेवली आहे. पूर्वीची लोककला, खेळ, ग्रामीण संस्कृती पुन्हा निर्माण व्हावी या करिता पुढील वर्षी महिलांच्याही स्पर्धा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी शिवपार्वती मंदिर परिसरात दि. १६ व १७ रोजी महिलांसाठी नागपंचमी सण सोहळ्याचे आयोजन केले असून यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
परीक्षक म्हणून योगेश देशमुख, कुणाल मसाले, पूजा क्षिरसागर यांनी काम पाहिले.
फुगडी,झिम्मा,गौरीचा सण, वारुळ, सुप, घागर, उखाणा, गोफ, मंगळागौर, हांडे, पिंगा आदींच्या पारंपारिक गीतांतून सर्वच संघांनी दर्जेदार सादरीकरण केले. उपस्थित रसिकांनी त्यांना मनमुराद दाद दिली. प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभिशन जाधव यांनी आभार मानले.


0 टिप्पण्या