"बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे"

 


"बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे" 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 15/7/2026 :

सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अख्ख जगच पोळून निघतय. जुने लोक म्हणायचे,  सुरवातीला उणीदुणि, दुसऱ्याच्या चुका, त्याच खापर, फक्त स्वतःच्या दृष्टीने स्वार्थी एककल्ली विचार, त्यानंतर द्वेष, वैर, सूड, आणि त्याच पर्यावसान हिंसाचार, हा प्रवास खूप जास्त वेगवान झालाय हा प्रवास. 

      खरतर माणूस मुळात हिंसक प्राणी नसतोच. पण परिस्थिती, त्यातून घडत चाललेली मानसिकता, चंगळवाद, आणि फक्त आणि फक्त स्वतः बद्दलच विचार करण्याची लागलेली सवय ही माणसाला बदलायची ताकद पण असते हे विसरून देखील चालत नाही. 

       "बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे" ह्या म्हणीप्रमाणे जगातल्या विज्ञानवादी हुशारवंतांनी विज्ञानाचे भरपूर फायदे आणि त्याचबरोबर काही भयंकर त्याचे तोटे सुद्धा त्यांनी पूर्वीच ओळखले होते. विज्ञान चुकीच्या माणसाच्या हाती लागले की कसा विध्वंस, नायनाट होतो हे आपल्या इतिहासाने शिकविले आहेच. त्यामुळे ह्या विज्ञानाची कास धरून उभ्या राहिलेल्या अणुऊर्जा बद्दल त्यांच्या मनात कुठेतरी भीती ही दडलेली होतीच. 

    खुप विचारांती काही नावाजलेल्या शास्त्रज्ञांनी अणुशस्त्रांच्या वापरा विरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि संपूर्णपणे विरोध दर्शविण्यासाठी सामुहिकरीत्या घोषणा करायचे ठरविले. ही मैनाऊ घोषणा म्हणुन ओळखल्या जाते. 

   मैनाऊ घोषणा ही अणुशस्त्रांच्या वापराविरुद्धचे एक आवाहन होते . जर्मन अणुशास्त्रज्ञ ओटो हान आणि मॅक्स बॉर्न यांनी तयार केलेली ही घोषणा 15  जुलै 1955  रोजी मैनाऊ बेटावर सादर करण्यात आली. या घोषणेवर सुरुवातीला 18 नोबेल पारितोषिक विजेत्यांनी स्वाक्षरी केली होती. एका वर्षाच्या आतच त्यातील नोबेल पारितोषिक विजेत्या समर्थकांची संख्या जवळपास तिपटीने वाढून 52 पर्यंत पोहोचली.

       ह्या सगळ्यांमध्ये मला पटलेली आणि खुप आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांचे घोषणापत्र. हे पत्र म्हणजे त्यांनी 1955 साली केलेली भविष्याची नांदीच जणू. त्यांनी नोंदविलेले भविष्य अगदी त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे,

"आम्ही, खाली सही करणारे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या पंथांचे, वेगवेगळ्या राजकीय मतांचे शास्त्रज्ञ आहोत. वरवर पाहता, आम्ही केवळ नोबेल पारितोषिकामुळे एकत्र बांधले गेलो आहोत, जे आम्हाला मिळण्याचे भाग्य लाभले आहे. आम्ही आनंदाने आमचे जीवन विज्ञानाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. आमचा विश्वास आहे की, हा लोकांच्या अधिक सुखी जीवनाचा मार्ग आहे. आम्ही हे भयाने पाहतो की, हेच विज्ञान मानवजातीला स्वतःचा नाश करण्याची साधने देत आहे. आज शक्य असलेल्या शस्त्रांच्या संपूर्ण लष्करी वापराद्वारे, पृथ्वीला किरणोत्सर्गाने इतक्या प्रमाणात दूषित केले जाऊ शकते की संपूर्ण लोकसमूह नष्ट होऊ शकतात. यामुळे युद्धखोरांप्रमाणेच तटस्थ देशही मरू शकतात.

जर महासत्तांमध्ये युद्ध भडकले, तर त्याचे प्राणघातक संघर्षात रूपांतर होणार नाही याची हमी कोण देऊ शकेल? संपूर्ण युद्धात सामील होणारा देश अशा प्रकारे स्वतःच्या विनाशाचा संकेत देतो आणि संपूर्ण जगाला धोक्यात घालतो.

आम्ही हे नाकारत नाही की कदाचित याच शस्त्रांच्या भीतीमुळे शांतता टिकून आहे. तथापि, जर सरकारांना असे वाटत असेल की ते या शस्त्रांच्या भीतीमुळे दीर्घकाळ युद्ध टाळू शकतील, तर तो एक भ्रम आहे असे आम्हाला वाटते. भीती आणि तणावामुळे अनेकदा युद्धे जन्माला आली आहेत. त्याचप्रमाणे, भविष्यात लहान संघर्ष नेहमीच पारंपरिक शस्त्रांनी सोडवले जाऊ शकतील, असा विश्वास ठेवणे हा देखील आम्हाला एक भ्रम वाटतो. अत्यंत धोक्याच्या परिस्थितीत, वैज्ञानिक तंत्रज्ञानाने निर्माण करता येणारे कोणतेही शस्त्र वापरण्यास कोणताही देश स्वतःला नकार देणार नाही.

सर्व राष्ट्रांनी अंतिम उपाय म्हणून बळाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. जर ते असे करण्यास तयार नसतील, तर त्यांचे अस्तित्वच संपुष्टात येईल."

        युद्धाच्या घोषणा, सगळीकडे दहशत, टंचाई, असुविधा, सगळी एकूणच शाश्वती नसणे इत्यादी गोष्टी वरील जाहीरनामा वाचुन खऱ्या वाटतात आणि कुठेतरी हलके कळ येऊन काळजी वाटते.

कल्याणी बापट (केळकर)

9604947256

बडनेरा अमरावती                           

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या