✍️ सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्काराने प्रविण सरवदे सन्मानित
वृत्त एकसत्ता न्यूज
माहिती सेवा ग्रुप पेठवडगाव
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/7/2026 : थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांच्या 170 व्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार' यंदा प्रविण सरवदे यांना प्रदान करण्यात आला. कराड येथे इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
मराठी साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घकालीन व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत प्रवीण सरवदे यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्ञान विज्ञान व चालू घडामोडी ,शेतकरी वर्गाकरिता प्रबोधन करत ज्ञान व्यापक करण्यासाठी सातत्याने काम केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पेठवडगाव कोल्हापूर- येथील माहिती सेवा ग्रूप या व्हॉटसअप ग्रूप मधुन ज्ञान वाटपाचे काम करत आहेत.
सध्या सर्वत्र सोशल मिडियाचा बोलबाला आहे हे हेरून त्यांनी गेल्या १२ वर्षापासून हे व्रत अंगिकारले आहे.सकाळी पाच वाजल्यापासून त्यांच्या पोस्ट माहिती सेवा ग्रूप वर प्रसारित होत असतात. पुढे अनेकजण त्यांच्या या पोस्ट फॉरवर्ड करत असतात यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तसेच कर्नाटक सीमाभागात त्यांच्या या पोस्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने माहिती संकलन करणारे ते एकमेव आहेत. त्यांच्या या विक्रमी कार्याची नोंद घेण्यात येऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे, रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांनाही 'गोपाळ गणेश आगरकर पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये शशिकांत पाटील (संपादक, दैनिक प्रीतिसंगम), विजय जाधव (दैनिक तरुण भारत), डॉ शरद गोरे आणि अनुराधा कदम (दैनिक पुढारी, कोल्हापूर) यांचा समावेश होता.
सामाजिक समता, विज्ञाननिष्ठ विचार आणि बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार करणारे गोपाळ गणेश आगरकर यांची जन्मभूमी असलेल्या कराड तालुक्यातील टेंभू येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. आगरकरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या ऐतिहासिक भूमीत प्रविण सरवदे यांचा झालेला गौरव हा मराठी सोशल मिडिया विश्वासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
या सोहळ्याचे आयोजन इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहन आणि माणिक डोंगरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या सोहळ्यास साहित्यप्रेमी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या