जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान; कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी?
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/02/2026 : जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोकरदारवर्गासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवारी (दि.७) सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदान करता यावे, यासाठी मतदानाच्या दिवशी कामगार व कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा विशेष सवलत देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.
मतदानासाठी भरपगारी सुट्टी
जे कामगार, अधिकारी किंवा कर्मचारी निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदार आहेत, तसेच जे कामानिमित्त त्या क्षेत्राबाहेर कार्यरत आहेत, अशा सर्वांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत.
सुट्टीचे आदेश कोणासाठी?
परिपत्रकानुसार, हे आदेश सर्व सरकारी व खासगी आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम, आयटी कंपन्या, शॉपिंग मॉल्स आणि रिटेल दुकाने यांना लागू असणार आहेत.
मतदानासाठी विशेष सवलत
काही अत्यावश्यक किंवा लोकहिताच्या सेवांमध्ये, जिथे कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मोठे नुकसान होऊ शकते, तिथे पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल. अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी २ ते ३ तासांची विशेष सवलत देणे आवश्यक राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या निवडणुकीमुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांतील संबंधित पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.
राज्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या