🔰 जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाकडून १५ दिवसांची मुदतवाढ 🔵 सोलापूर सह १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार

 🔰 जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

🔵 सोलापूर सह १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार

वृत्त एकसत्ता न्यूज

मुंबई:  गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी मोठा दिलासा दिला. निवडणुकांचे आयोजन आणि तयारी करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला वाढीव १५ दिवसांची मुदत दिली. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने ही विनंती मान्य केली. या आधी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिल्यानंतर किती टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

राज्यातील जादा आरक्षणासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदांव्यतिरिक्त, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.ज्या जिल्हा परिषदांमध्ये जादा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे, त्या वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतरच घेण्यात येतील, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण विभाग), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (पुणे विभाग) तसेच छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर (छत्रपती संभाजीनगर विभाग) या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे.याचबरोबर रायगडमधील १५, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग ८, पुणे १३, सातारा ११, सांगली १०, सोलापूर ११, कोल्हापूर ११, छत्रपती संभाजीनगर ९, परभणी ९, धाराशिव ८ आणि लातूरमधील १० अशा एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकाही जिल्हा परिषदांसोबतच १० फेब्रुवारीपूर्वी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या