ग्रामगीतेतील आदर्श ग्राम जीवन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 13/01/2026 :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून आदर्श ग्राम जीवनाची कल्पना मांडली आहे. राष्ट्रसंताचा ग्राम व्यवस्थेशी निकटचा संबंध असल्याचे दिसून येते. समाजाचे सारे जीवनच ग्राम व्यवस्थेशी निगडीत आहे. ग्रामजीवन म्हणजे सामूहिक सामर्थ्यावर आधारित स्वावलंबी, स्वच्छ, सुसंस्कारी आणि एकोप्याचे गाव. जिथे ग्राम स्वराज्य (लोकांनी स्वतःचे राज्य चालविणे) आणि ग्रामदेवता (जनसेवा) हे केंद्रस्थानी असतात. जिथे अंधश्रद्धा, जातिभेद संपवून शिक्षण, आरोग्य, श्रमप्रतिष्ठा आणि परस्परांचा आदर यावर भर दिला जातो असे राष्ट्रसंत म्हणतात.
हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे |
हे सूत्र ध्यानी ठेवून खरे |
आपुले ग्रामची करावे गोजिरे |
शहराहूनी ||
आपण आपल्या गावाच्या उन्नतीकरिता प्रयत्न करु शकतो. गावातील लोक जर एकत्र आले तर आपल्या गावाचा विकास निश्चितच साधू शकतो. ग्राम विकासाचे तत्वज्ञान आपल्याला राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतून मिळेल आणि आपले गाव आदर्श होईल. ग्रामगीतेतील ज्ञान घेऊन आपले गाव आपणच छान करावे, गोजिरे करावे आणि ते शहराहूनी सुंदर करावे. "हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे" हा हात कुणाचा? हा हात कुणाचा नसून तो हात गावकऱ्यांचा आहे. ज्या दिवशी गावकऱ्यांचा हात गावाकरिता फिरायला लागेल, त्या दिवशी ग्राम निर्माणास प्रारंभ होईल. ग्रामगीता हे एक असे जीवन दर्शन आहे की जे गावाला केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे तर नैतिक आणि सामाजिक दृष्ट्याही समृद्ध बनवते.
राष्ट्रसंतानी "जन सेवा हीच ईश्वर सेवा" हे ध्येय समोर ठेवून आपल्या समाजात परस्पर प्रेम, सहानुभूती व सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक व्यक्तीला व गावाला स्वावलंबी बनवून राष्ट्राचे भवितव्य उज्वल बनवून समाजाची निर्मिती करणे हे त्यांचे स्वप्न होते. सर्व समाज गुण्या गोविंदाने समता, ममता, एकता आणि राष्ट्रीयता या तत्वावर उभा राहून तो प्रगत व्हावा यासाठी तुकडोजी महाराजांनी आपल्या वाणी, लेखणी, शक्ती व भक्तीव्दारे निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे महान कार्य केले आहे.
गाव हा विश्वाचा नकाशा |
गावावरुनी देशाची परीक्षा |
गावची भंगता अवदशा |
येईल देशा ||
गावाचा विकास साधायचा असेल तर ग्राम संघटन निर्माण करावे लागेल तरच सर्व हात एकत्र येतील आणि गावाचा विकास होईल. फक्त गावच्या माणसाने शहराकडे जाण्याचा प्रयन्त करु नये. तुम्हाला वाटते की, शहराकडे गेलो म्हणजे तुमचा विकास होईल व तुम्हाला चांगले दिवस येईल. गावातील सर्व कुशल माणसे जर शहराकडे जाऊ लागली तर गावामध्ये कुशल मनुष्यबळ उरणार नाही. सामान्य माणूस उभा झाला, कार्यप्रवण झाला की गाव व देश उभा व्हायला वेळ लागणार नाही. देशातील प्रत्येक गाव असे झाले तर देशाचे सुंदर चित्र साऱ्या जगासमोर येईल. विश्वाची कल्पना राष्ट्रसंतानी केली आहे.
गावातील रस्ते, घरे, शाळा, मंदिरे, ग्रामपंचायत इमारत, परिसर, मोकळे मैदान सर्व स्वच्छ व सुंदर असावं. गावात प्रवेश करताना प्रसन्न वाटले पाहिजे. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष असावेत. सांडपाण्याची नीट व्यवस्था असावी. राष्ट्रसंताच्या नजरेतून एकही गोष्ट सुटलेली नाही. गावातील लोकांचा व्यवहार परस्पर पूरक, परस्पर सहकार्य व समन्वयाचा असावा. लोक संस्कारीत, चारित्र्यवान, प्रामाणिक, परिश्रमशील व कर्तव्यशील असावेत, यालाच स्वयंपूर्ण ग्राम म्हणावे.
जैसे आपण स्नान करावे |
तैसे गाव ही स्वच्छ ठेवीत जावे |
सर्वची ||
लोकांनी झिजूनी घ्यावे |
श्रेय गावाच्या उन्नतीचे ||
गावातील कार्यकर्ते, गावाचा सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, शाळेतील शिक्षक हे आदर्शवत असणे यालाच गावधर्म म्हणता येईल. धर्म याचा अर्थ विकास. आध्यात्मिक व भौतिक दोन्ही दृष्टीने गावाचा विकास हाच राष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जातो. गावाचा विकास करायचा असेल तर शेतकरी म्हणजेच ग्रामनाथ ग्राम निर्माणाचा केंद्रबिंदू आहे. आज शेतकरी हरितक्रांतीच्या मागे लागून देशी बी-बियाणे, शेणखत हे सर्व आपण गमावले. स्वयंपूर्ण शेतकरी आपल्या परावलंबी व कर्जबाजारी झाला. गो-पालन हा शेतीपूरक व्यवसाय सुटला आणि आज देशाचा शेतकरी आत्महत्या करायला लागला.
भारत कृषीप्रधान देश, शेतीसाठी हवा गोवंश |
गोरसा इतुका नसे सत्वांश, अन्यत्र शुद्ध ||
शेतकरी सुखी व गाव समृद्ध करायचा असेल तर गोपालन, गो-संवर्धन करायला हवे. ग्रामोन्नतीचा मूलाधार म्हणून राष्ट्रसंत गायीकडे पाहतात. गाईच्या दुधात कायाकल्प करण्याचे सामर्थ्य आहे.
ईश्वर सेवाची गाव सेवा, तो सर्वांच्या सुखाचा ठेवा |
परि काही असुरही असती गावा, यज्ञ भंग करावया ||
ग्रामसेवेतच ईश्वर सेवा आहे व त्यातच सर्वांचे सुख सामावले आहे, हे खरे असले तरी यज्ञ भंग करणारे जसे राक्षस असतात तसेच गावात काही विघ्न संतोषी लोक असतात. प्रत्यक्ष गावात असणाऱ्या दुष्टांचा कायम बंदोबस्त करावा. आपल्या गावात संघटना निर्माण करावी. संघटनेने काय होऊ शकत नाही? थेंब थेंब मिळून समूद्र बनतो तसे लोक संघटीत झाले तर गावाचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. संघटनेतून शक्तीचा उदय होईल आणि ग्रामराज्य निर्माण होईल.
दारु, गांजा, भांग, अफीम |
जुगार, वेश्यादि वाईट काम |
यांचे उरु न द्यावे नाम |
आपुल्या गावी ||
दारु, गांजा, अफू, भांग, जुवा व वेश्या व्यवसाय यांचे नावच गावात उरु देऊ नये. त्यासाठी गावातील सत्प्रवृत्त लोकांनी गावातून व्यसनांचे निर्मूलनासाठी लागावे व चांगले गुण वाढीस लागतील अशा योजना कराव्यात. गावातील सज्जनांनी वाईट रुढ्या व परंपरा एकदम बंद कराव्या. गावातील देवांना कोणत्याही जीवाचा बळी देण्याची प्रथा पूर्णपणे बंद करावी. गावात अंगात देव आल्याचे सोंग वठवून आजही लोकांना फसवितात. अशापासून गावकऱ्यांनी सावध राहावे.
गावाच्या सेवेसाठी ग्रामसभेची योजना सुचविली आहे. गावात काही संकटे आल्यास प्रसंगी धावून जाणाऱ्या कर्तव्यदक्ष अशा "ग्रामसेनेची" स्थापना करावी. गावात सदाचार, प्रेमभाव आणि समाजाला पुढे नेणारे संस्कार रुजवावे, जेणेकरून आपले गाव आदर्श होईल.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677


0 टिप्पण्या