मुंबई वाचवा, ठाकरे बंधुची हाळी...
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : भाग्यवंत ल. नायकुडे,
अकलूज दिनांक 10/01/2026 :
भाजपकडे केंद्रात व राज्यात सत्ता आहे. विरोधी पक्षांना दुर्बल करण्यासाठी पोलीस-प्रशासनाचा वापर कसा करायचा यात भाजप माहिर आहे. भाजपाकडे प्रचंड धनशक्ती आहे. या पक्षाकडे संघटीत केडर आहे. नियोजन, रणनिती आणि दूरदृष्टी आहे. अशा बलवान भाजपशी महापालिका निवडणुकीत लढताना ठाकरे बंधुंनी तमाम मराठी भाषिकांना एकजूट राखण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र आणि मुंबई विकण्याचे भाजपचे षडयंत्र उधळून लावण्यासाठी विकले जाऊ नका असेही ठाकरे बंधुंनी बजावले आहे. मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे, चुकाल तर कायमचे मुकाल असा इशारा उद्धव व राज यांनी दिला आहे. मराठी माणूस विरूध्द भाजप असे या निवडणुकीला स्वरूप देण्यात ठाकरे बंधू यशस्वी होतील का ? उबाठा सेना, शिवसेना, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन, रिपब्लिकन आदी राजकीय पक्षात विभागलेला मराठी मतदार महापालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकजुटीने मतदान करील का ? हा लाख मोलाचा प्रश्न आहे. मराठी विरूध्द भाजप अशा लढाईसाठी ठाकरे बंधुंनी सर्वस्व पणाला लावले आहे. मुंबई गुजरातला जोडण्याचे भाजपने मोठे कारस्थान रचले आहे अशी भिती त्यांनी बोलून दाखवली आहे.
वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले व त्यांनी राज्यात भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या चार महिन्यांपासून राज्यभर फिरत आहेत. हिंदीच्या सक्तिच्या विरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधु सहा महिने शांत का राहिले होते ? त्यांनी नगर परिषद किंवा नगर पंचायत निवडणुकीत मुळीच रस घेतला नाही आणि मुंबईतून बाहेर कठे गेले नाही.
एकट्या भाजपचे ११७ नगराध्यक्ष निवडून आले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ नगराध्यक्ष विजयी झाले तरी ठाकरे बंधू मुंबईत होते. मुंबई बाहेर नगर परिषदा व नगर पंचायतींशी आपला काही संबंधच नाही अशा समजुतीत ते वागत राहिले. ठाकरे बंधुंना मुंबई बाहेर काही रस नाही असे चित्र महाराष्ट्राला दिसले. मुंबई, ठाणे, नाशिक आणि थोडेफार पुणे व कोकण या पलिकडे ठाकरे बंधुची दौड जात नाही. ठाकरे बंधुंसह अन्य विरोधी पक्षांनीही राज्यात भाजपला रान मोकळे दिले असल्याने भाजपची मनसोक्त घोडदौड चालू आहे, हेच नगर परिषद व पंचायत निवडणुकांमधे दिसून आले.
मातोश्रीला बडव्यांनी घेरले आहे, असे आरोप करीत राज ठाकरे वीस वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडले व महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. या पक्षाला सुरूवातीला मोठे यश मिळाले. राज यांचा करिष्मा लोकांना भावला. पण सातत्य नसल्याने त्यांना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. सात वर्षापूर्वी झालल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जे मनसेचे सात नगरसेवक निवडून आले ते सुध्दा त्यांना संभाळून ठेवता आले नाहीत. भाजपच्या अफाट ताकदीशी लढण्यासाठी या दोघा भावांना यावेळी एकत्र यावे लागले आहे. आमच्या वादापेक्षा नि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असे दोघे प्रत्येक सभेत व मुलाखतीत सांगत आहेत.
दि. १९ जून १९६६ रोजी मुंबईच्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीच्या माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली..
काँग्रेस पक्षात बंडाचा झेंडा फडकविल्यानंतर याच मैदानावर शरद पवार यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. वीस वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर याच मैदानावर दि. ११ जानेवारी २०२६ रोजी ठाकरे बंधुंची संयुक्त सभा झाली व भाजपच्या कारस्थानातून मुंबई वाचवा अशी त्यांनी हाळी दिली. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल असे भाकीत केले तर भाजपचे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णा मलई यांनी मुंबईत येऊन मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी नाही तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे तारे तोडले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईतील कार्यक्रमात आयआयटी बॉम्बेचे मुंबई असे नामांतर केले नाही म्हणून आनंद व्यक्त केला होता. भाजपच्या नेत्यांची मुंबईविषयी मानसिकता काय आहे याची ती झलक होती. कृपाशंकर सिंह, अण्णा मलई किंवा जितेंद्र सिंह हे चुकीचे बोलले असे भाजपाने चुकूनही म्हटले नाही. पण त्यांच्या वक्तव्याने ऐन निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत ठाकरे बंधुंना आयते कोलीत मिळाले.
शिवशक्ति या बनरखाली ठाकरे बंधुंनी शिवतीर्थावर मोठे शक्ति् प्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) चे नेते जयंत पाटील यांचेही भाषण झाले. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आम्ही करून दाखवले याची यादीच दिली. आमच्या कामांचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये असे सांगताना त्यांच्या एकसुरी भाषणाची नक्कलही करून दाखवली. उद्योगपती गौतम अदाणी यांचा २०१४ पूर्वी देशात एकेठिकाणी उद्योग होता अकरा वर्षानंतर २०२५ मुंबई- महाराष्ट्रच नव्हे तर देशभर विविध क्षेत्रात अदाणीच्या उद्योगांचे कसे जाळे निर्माण झाले आहे हे राज यांनी पडद्यावरच सर्व महाराष्ट्राला दाखवले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईतील वीज पुरवठा, मुंबई विमानतळ, नवी मुंबई विमानतळ, अंधेरीतील आरटीओची जमीन, ऐरोली येथे डेटा सेंटरसाठी जमीन, धारावी पुनर्विकास प्रकल्प, स्मार्ट वीज मीटर, मुंबई व नवी मुंबईत हायस्केल डेटा सेंटर, मेट्रो- मोनोला वीज पुरवठा अशी भली मोठी यादीच प्रकल्पाच्या रकमेसह राज ठाकरे यांनी सादर केली. आपला उद्योगांना विरोध नाही पण एकालाच सारे कसे मिळते हा प्र्श्न आहे. भाजपाने अकोटमधे एमआयएमशी, अंबरनाथमधे काँग्रेसशी, युती केली, महापालिकेत ६७ नगरसेवक बिनविरोध आले, आपण कशाही प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो, पण वाईट याचे वाटते की लोक विकत जातात.
जो राजकीय पक्ष आशियात सर्वात मोठा आहे. सर्वात मोठी सदस्य संख्या आहे , देशात सर्वात जास्त सत्ता या पक्षाकडे आहे. चौफेर विकास आम्हीच केला असा या पक्षाचा दावा आहे, मग निवडणुकीत मतदारांना पैसे का वाटावे लागत आहेत ? उमेदवारांना माघार घ्यायला का लावली जात आहे ? निवडून आलेल्या दुसऱ्या पक्षातील लोकप्रतिनिधींना पायघड्या का अंथरल्या जात आहेत ? सर्वसामान्य लोकांच्या मनात अशा प्रश्नांनी गर्दी केली आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
0 टिप्पण्या