सहकार महर्षि कारखान्यामध्ये ऊस वाहतुकीकरिता आलेल्या पशुधनासाठी लसीकरण शिबिर संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 09/12/2025 : शंकरनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2025-2026 सुरू असून या हंगामामध्ये ऊस तोडणी-वाहतूकीचे कामाकरिता आलेल्यांच्या पशुधनासाठी लसीकरण शिबीर-मोहीम राबविण्यात आली.
याशिबिरात त्यांच्या आरोग्याची तपासणी शंकरनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच.एम.काळे व त्यांच्या टीमने करून पशुधनास द्यावयाचा योग्य खुराक, आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती दिली. कारखान्याच्या संचालिका- स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या संलग्न असणाऱ्या सर्व घटकांच्या सोयी व सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न अखंडितपणे चालू आहे.
सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1960 साली माळशिरस तालुका अकलूज या ठिकाणी या सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आहे. त्यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखाना सिझनमध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार शिबिराची अथवा जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याची प्रथा नेहमीच या कारखान्याने जपलेली आहे. सध्या थंडीची लाट चालू असून ऊस तोडणी वाहतुकीकरिता आलेल्यांच्या पशुधनास कोणताही आजार अथवा साथीची लागण होऊन त्यांच्या जीवितास धोका होऊ नये याकरिता कारखान्याने या शिबिराचे आयोजन करून तोडणी वाहतूक कामासाठी आलेल्या पशुधनाची योग्य ती काळजी व खबरदारी घेतलेली आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी सहकार महर्षि कारखान्याचे बैलगाडी ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, मुकादम, शेती विभागाचे शेतकी अधिकारी रविराज उर्फ समाधान चव्हाण व त्यांचा स्टाप इत्यादी उपस्थित होते.


0 टिप्पण्या