🔰 शेळ्या मेंढ्यासाठी पशुसंवर्धन कडून उपचार मोफत करावे; यशवंत क्रांती चे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंना निवेदन

🔰 शेळ्या मेंढ्यासाठी पशुसंवर्धन कडून उपचार मोफत करावे;

यशवंत क्रांती चे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंना निवेदन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 02/11/2025 :

ग्रामीण भागात व शहरी भागात पशुवैद्यक (पशुवैद्यकीय डॉक्टर) भेटीचे दर शासनाकडून वाढवण्यात आले आहेत. ग्रामीण भागात पशुवैद्यक भेटीचे दर दिवसा १५० रु ते २५० रू रात्री जादा १०० रुपये तसेच  उपचारासाठीचा खर्च वेगळा हे दर सर्वसामान्य पशुपालक शेतकरी मेंढपाळ यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. यापेक्षा खासगी डाॅक्टरांचे दर कमी आहेत. तरी सदर पशुवैद्यकीय सेवा ही शेळी मेंढीसाठी उपचार व सेवाशुल्क मोफत करण्यात यावे.  अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली. 

      सभापती राम शिंदे हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत क्रांती संघटनेच्या  शिष्टमंडळाने त्यांची सर्किट हाऊसमध्ये  भेट घेऊन संघटनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा केली. शिष्टमंडळात संजय काळे, संपत रूपने, जगन्नाथ माने, सचिन लांडगे, डॉ विजय गोरड, राजु पुजारी, दिपक माने, शुभम वाघमोडे, प्रदिप खोत, ज्ञानदेव फाले उत्तम तांदळे इ. पदाधिकाऱ्याचा समावेश होता. 

 संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि शेळ्या मेंढ्याचे पालन करणे हा धनगर समाजाचा पारंपारिक व्यवसाय आहे व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. सद्यस्थितीत शासनाच्या जाचक अटी, चराईसाठी क्षेत्र कमी झाल्यामुळे शेळ्या मेंढ्यांची संख्या झपाट्याने कमी होऊन मटणाचा मागणी तसा पुरवठा होत नसल्याने  राज्यातील मटणाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याचे कारण म्हणजे धनगर समाजातील जे मेंढपाळ आहेत ते आपल्या शेळ्या मेंढ्या विकून मोलमजुरी करणे पसंत करत आहेत. 

     मेंढपाळांना शेळ्या मेंढ्या पालन करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असून पशुपालक शेतकरी व मेंढपाळ यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मेंढपाळ हा जास्तीत जास्त दिवस भटकंती करत रानावनात वस्ती करून राहत असतो. शेळ्या मेंढ्या आजारी पडल्यावर सर्व कळप घेऊन सरकारी दवाखान्यात जाणे शक्य होत नाही. पशुवैद्यकांना भेटीस बोलवून घ्यायचे तर त्यांचे भेटीचे दर व उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे रोगराईमुळे शेळ्या मेंढ्याचे संपुर्ण कळपच मृत्यू मुखी पडून मेंढपाळांना नुकसान सहन करावे लागत आहे. तरी आपणास विनंती कि  शेळ्या मेंढ्यांच्या पशुवैद्यकांची भेट व संपूर्ण उपचार मोफत करण्यात यावेत यासाठी  आपण लक्ष घालावे जेणेकरून पशुपालक मेंढपाळ यांच्यासाठी फायदेशीर ठरेल…

    शेळ्या मेंढ्यांचा व मेंढपाळ यांचा विमा काढण्यात यावा तसेच सर्व मेंढपाळांना ओळखपत्र देण्यात यावीत. धनगर समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून समाजातील बेरोजगार युवक युवतींना शेळी मेंढ्यांच्या व्यवसायाबरोबर इतर कोणताही व्यवसाय करण्यासाठी महामंडळाकडून ५० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी ही करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या