🟡 "अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे परिक्षेत्र कार्यालय कोल्हापूरात स्थापन करावे"- संजय वाघमोडे
🔵 कुंभोज येथे घोंगडी बैठक संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 19/10/2025 : कोल्हापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे नवीन पैदास प्रक्षेत्र व लोकर वस्तू विणकाम केंद्र आवश्यक त्या निधी सहीत स्थापन करावे.अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली. ते कुंभोज येथे क्रांती संघटना शाखा कुंभोज च्या वतीने आयोजित पशुपालक मेंढपाळ यांच्या घोंगडी बैठकीत बोलत होते.
ते बोलताना पुढे म्हणाले कि चाळीस वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे महामंडळाचे प्रक्षेत्र मंजूर करण्यात आले होते परंतु सांगलीने राजकीय ताकद वापरून ते सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे स्थापन केले. गोट प्रकल्प ही रांजणी प्रक्षेत्रावर मंजूर करण्यात आला होता तोही सातारा जिल्ह्यात राजकीय इच्छाशक्ती अभावी हलविण्यात आला. कोल्हापूर जिल्हा हा विविधतेने नटलेला असून हा जिल्हा राज्यातील एक विकसनशील जिल्हा असून सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा आहे. कोल्हापूर हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले मोठे शहर आहे. श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. पंचगंगा येथील प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी तसेच धार्मिक क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील जोतिबा खोची येथील भैरवनाथ मंदिर इत्यादी प्रमुख ठिकाणे आहेत.कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. वर्षभरातील तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते. कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते. तापमान कमी असूनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते. कोल्हापूर पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबरच्या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से.च्या दरम्यान असते. कोल्हापुरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते.
कोल्हापूर जिल्ह्यात मेंढपाळ व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मेंढपाळांची संख्याही जास्त आहे. परंतु मेंढपाळांना कोणत्याही सोईसुविधा प्रक्षेत्र नसल्याने दुरापास्त आहे. किंवा रत्नागिरी,कोल्हापुर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना रांजणी ता. कवठेमहांकाळ येथे (२०० ते ३००कि. मी) जावे लागते. लोकरीस मागणी नसल्याने कचऱ्यात टाकून द्यावी लागते, कोल्हापूर येथून गोवा कर्नाटक या राज्यांमध्ये व्यापार करणे अत्यंत सोईस्कर आहे. कोल्हापुरी मेंढी, बाळूमामा यांच्या मेंढ्या तसेच पट्टणकोडोली येथील लोकर वस्तू विणकाम व विक्री या गोष्टी अत्यंत भारतभर प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यातील मेंढपाळांना, मेंढ्याना सोईसुविधा उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या लोकरीला बाजारपेठ मिळण्यासाठी या जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे पैदास प्रक्षेत्र व लोकर विणकाम केंद्र अत्याधुनिक सोई सुविधांयुक्त स्थापन करावे.
यावेळी संपर्क प्रमुख सुनील शेळके, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, संघटक पिंटू गावडे, हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे, तालुका महिला अध्यक्ष तेजस्विनी भानुसे, राधानगरी उपाध्यक्ष गंगाराम बोडके, बिरू अनुसे, संदीप बंडगर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कुंभोज शाखेच्या शाखाध्यक्ष पदी संदीप भानुसे,शाखा उपाध्यक्ष सहदेव पालखे, सेक्रेटरी सतिष बंडगर,खजिनदार मारूती पुजारी, शाखा संघटक अनिल गावडे, शाखा संपर्क प्रमुखपदी विष्णू पुजारी यांची नियुक्ती करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कुंभोज, नेज, खोची, बु. वठार, नरंदे, नेज शिवपुरी, हिंगणगाव, दानोळी परिसरातील पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

0 टिप्पण्या