🟡 शेळी मेंढी महामंडळाने कोल्हापुरी दख्खनी जातीच्या मेंढीचे संगोपन व संवर्धन करावे - संजय वाघमोडे,
🟠 "यशवंत क्रांती" चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/10/2025 : कोल्हापुरी मेंढी/कोल्हापूर दख्खनी, नावाने ओळखले जाणारे विशेषता जादा पावसाच्या प्रदेशात टिकून राहणारी, दुधात औषधी गुणधर्म असलेली कोकण पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील मेंढपाळांच्याकडे मोठ्या संख्येने असलेली ही कोल्हापूरी-दख्खणी नावाने ओळखली जाणारी मेंढीची जात काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने पुढाकार घेऊन या मेंढीचे संगोपन, जतन व संवर्धन पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर करण्यात यावे. अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली. तशा आशयाचे निवेदन यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने
संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व्यवस्थापकीय संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळ पुणे प्रक्षेत्र व्यवस्थापक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ रांजणी तालुका कवठेमंकाळ यांना ही ई-मेलने पाठवण्यात आल्या आहेत.
शिष्टमंडळात जिल्हा संपर्कप्रमुख सुनील शेळके राधानगरी भुदरगड तालुका संपर्कप्रमुख राम देवणे जिल्हा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शहरी हेमंत बोडके उपाध्यक्ष दादासो गावडे शाहुवाडी युवक अध्यक्ष संजय डफडे पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष अतुल धनगर शाहुवाडी तालुका अध्यक्ष सुभाष वगरे इत्यादींचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की राज्यामध्ये मेंढीपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात धनगर व इतर समाजाकडून करण्यात येत आहे. हा व्यवसाय धनगर समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. देशातील मटणाची वाढती मागणी व त्या मागणीच्या तुलनेत होणारा पुरवठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे मटणाचे दर हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मटणाची मागणी आणि पुरवठा यामधील दरी कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेगवेगळ्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या योजना राबवीत आहे. राज्यात सर्वाधिक मेंढपाळ संख्येने जास्त असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ हा सध्यस्थितीत पारंपारिक पद्धतीने मेंढीपालन करीत आहे. या मेंढपाळांकडे सध्या काळी, लाल/तपकिरी रंगाच्या, मध्यम आकाराच्या, मजबूत बांध्याच्या, मध्यम उंचीच्या, शिंगे विरहित, आखूड कान, आखूड शेपटी, कमी लोकरीच्या मेंढ्या पाळतात. कोल्हापुरी मेंढ्या / देशी मेंढ्या या काळ्या किंवा काळ्या रंगावर पांढरे ठिपके असणार्या आहेत. या मेंढीची रोगप्रतिकार क्षमता अतिशय उत्तम असून स्थालांतर करण्यासाठी अतिशय काटक जात आहे. साधारणपणे मेंढ्या या दुष्काळी किंवा कमी पावसाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तग धरतात परंतु कोल्हापूर सारख्या अतिपावसाच्या ठिकाणी तग धरणारी कोल्हापुरी मेंढी हि राज्यातीत एकमेव मेंढीची जात असून हे त्या मेंढीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्य आहे. प्रतिकूल वातावरणात उत्तम उत्पादन देण्यासाठी हि मेंढी प्रसिद्ध आहे. या मेंढीमध्ये जुळे तिळे कोकरे देण्याची सुद्धा क्षमता आहे. मटणाला चव असल्याने या मेंढीच्या कोकरांना बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून सदर कोकरांच्या विक्रीमधून मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात अर्थार्जन होत आहे. मेंढीच्या दुधात असलेल्या औषधीय गुणधर्मामुळे कर्करोगासारखे दुर्दर आजारही बरे होऊ शकतात हे अलिकडे झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
कोल्हापुरातील दख्खनी काळी मेंढी चे दूध कॅन्सर पेशंट साठी वरदान आहे, दख्खनी काळी मेंढ्याचे सध्याचे दुधाचे प्रमाण अल्प असले तरी त्यामध्ये असणारे अत्यंत लाभदायक औषधी गुण कॅन्सर पेशंट साठी विशेष वरदान ठरणार आहे रानावनात चरताना सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतीं खाल्ल्याने या मेंढ्यांच्या दुधामध्ये त्या सर्व वनस्पतींचे औषधी गुणधर्म आढळतात, दुधात असणाऱ्या पौष्टिक घटकांचा अभ्यास करता इतर प्राण्यांच्या दुधातील घटकांपेक्षा मेंढीच्या दुधातील सर्व घटकांचे प्रमाण दुपटीने आढळते, शारीरिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या व्यक्तींसाठी मेंढीच्या दुधात असणारी विशेष प्रथिने आणि स्निग्धता वरदान ठरणारी आहे.
मेंढीच्या दुधाचे उत्पादन वाढविल्यास त्याचा उपयोग कॅन्सर पेशंट , खेळाडू यांच्या विशेष आहारासाठी तर नक्कीच होईल तसेच लहान मुलांसाठी दूध पावडर, आणि विविध प्रकारची त्वचेसाठी उपयुक्त असलेली सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात करता येईल.
मेंढपाळांच्या जीवनात अमुलाग्र असे परिवर्तन घडविण्यासाठी त्यांच्याजवळ असणाऱ्या या मेंढ्यांच्या जातीचे संगोपन, जतन व संवर्धन करून दुधाचे व्यवसायिक उत्पादन आणि विक्री करणे गरजेचे आहे.
माडग्याळ जातीच्या मेंढ्यांच्या लोकप्रियतेमुळे सध्या हा मेंढपाळ वर्ग आपल्या कोल्हापुरी मेंढ्यांच्या कळपात माडग्याळ जातीच्या नरांचा पैदाशिकरिता वापर करत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या मेंढपाळांकडे असलेल्या मुळच्या कोल्हापुरी मेंढ्यांमध्ये माडग्याळ जातीचा संकर होवून संकरीत मेंढ्यांची पैदास होवू लागली आहे. त्यामुळे कोल्हापुरी मेंढ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कोल्हापुरी मेंढी व माडग्याळ यांच्या संकराचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत असून या जातींच्या मेंढ्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे व हि जात कायमस्वरूपी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापुरी मेंढी व माडग्याळ मेंढी यांच्यात संकर होवून नवीन निर्माण होणाऱ्या मेंढ्या या कोल्हापूर सारख्या अतिपावसाच्या व अतिथंड वातावरणामध्ये तग धरत नाहीत. तसेच कोल्हापुरी मेंढ्या व कर्नाटकातील लाल किंवा तपकिरी रंगाच्या मंड्या जातीच्या मेंढ्या सोबत मोठ्या प्रमाणात संकर होत आहे. या संकरित मेंढ्याच्या कोकारांमध्ये मोठ्या प्रमाणात मरतुक आढळून येते, रोगप्रतिकारक क्षमता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे जर कोल्हापुरी मेंढीचा अशा पद्धतीने संकर होत राहिला तर कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढीपालन व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणात नकारार्थी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हि जात वाचविण्यासाठी तत्काळ व ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी महामंडळ हे मेंढ्या व शेळ्यांच्या संगोपन, पैदास, जतन व संवर्धनासाठी काम करीत आहे. त्यामुळे कोल्हापुरी जातीच्या उच्च वंशावळीच्या मेंढ्या व नरमेंढे महामंडळाच्या वेगवेगळ्या प्रक्षेत्रांवर ठेवून तत्काळ त्यांचे जतन व संवर्धन करावे. तसेच या जातीच्या मेंढ्यांना देश पातळीवर कोल्हापुरी मेंढी किंवा कोल्हापुरी दख्खनी मेंढी या नावाने नोंदणीकृत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या