🔵 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शैक्षणिक साहित्य देणारी सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज ही पहिली शाळा
🟢 विद्यार्थ्यांकडून १५०० वह्या, १०० दप्तरे, १०० कंपास संच व शालेय साहित्याचे संकलन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई
दिनांक 01/10/2025 : अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्ह्यात महापुरात नुकसान झालेल्या गावातील शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. खरे तर महाराष्ट्रात अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. धाराशिव, सोलापूर परिसरातील अनेक वाड्या, वस्त्या पाण्यात गेल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी राजा उघड्यावर पडला आणि त्याच्यासोबत त्यांच्या लेकरांचे शालेय दप्तर, वही, पेन, कंपाससारखी शैक्षणिक साधनेही वाहून गेली. या संकटसमयी या बांधवांसोबत उभे राहण्याची जबाबदारी ओळखून शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सदाशिवराव माने विद्यालयाचे सभापती सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या प्रेरक मार्गदर्शनातून विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या कल्पक संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्तुत्य उपक्रम राबविला.
या उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यालयाकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक २०० पानी वही व यथाशक्ती आपणास जमेल ते शालेय साहित्य शाळेत घेऊन येत या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मदतीचा ओघ दिला. सामाजिक भावनेतून विद्यार्थ्यांनी तब्बल १५०० वह्या, १०० दप्तरे, १०० कंपास संच व तसेच पाणी बॉटल, खाण्याचा डबा, पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्य संकलित झाले. तसेच शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी देखील आर्थिक हातभार लावला.
संकलित झालेल्या या शालेय साहित्याचे माढा व करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यामध्ये मुंगसी अंगणवाडीतील ८९, प्राथमिक शाळेतील १२३, रोपळे नाडी ५५, शिंगेवाडी ५७, चव्हाणवस्ती लव्हे २७, काशीद आवताडे वस्ती व बारलोणी वस्ती १५ अशा एकूण ३६६ विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटण्यात आले. या वेळी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू आणि अकलूजच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, हा खऱ्या सामाजिक ऐक्याचा आणि जबाबदारीचा हृदयस्पर्शी अनुभव ठरला. यावेळी संबंधित गावातील सरपंच, रोपळे गावचे माजी सरपंच तात्या घोडगे, पिंपळनेर शाळेतील शिक्षक राजेंद्र देवकर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, प्रशाला समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शैक्षणिक साहित्य देणारी सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज ही पहिली शाळा आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी आधार देण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाने ती उचलणे आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला. आजच्या पिढीतील विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर समाजाभिमुख कार्यातही सक्रिय सहभाग घेत आहेत, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. खरं तर, ही मदत वस्तुरूपात लहान असली तरी तिचा भावनिक आणि सामाजिक परिणाम अत्यंत मोठा आहे. "विद्यार्थ्यांनी दाखवलेली ही कृतिशीलता म्हणजे समाजमनाला दिलासा देणारी नवी उर्जा आहे," अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी, पालकांनी व शिक्षकांनी व्यक्त केली. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी दिली.


0 टिप्पण्या