🟩 संचेती हॉस्पिटल आता स्ट्रोक रेडी सेंटर
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/09/2025 : अस्थिरोग व पुनर्वसन क्षेत्रातील आघाडीची संस्था असलेल्या संचेती हॉस्पिटलला “स्ट्रोक रेडी सेंटर” म्हणून मान्यता मिळाली आहे. हा आपत्कालीन व मेंदूविकार उपचार क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या यशामुळे संचेती हॉस्पिटलचे वेळेवर, तज्ज्ञ व सर्वसमावेशक स्ट्रोक उपचार देण्याचे वचन अधोरेखित झाले आहे, ज्यामुळे रुग्णांना योग्य वेळी अत्यावश्यक उपचार मिळणार आहेत. ही माहिती संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती, विपणन व संपर्क विभागाच्या संचालक सौ.रूपल संचेती, रुग्णालय प्रमुख डॉ.यशवंत शिवण्णा यांनी दिली.
डॉ.पराग संचेती म्हणाले की, या स्ट्रोक रेडी युनिटमुळे स्ट्रोक सारख्या तातडीच्या परिस्थितीमध्ये जीवनदायी उपचार मिळण्यास मदत होईल.रक्तप्रवाहात अडथळा आल्यामुळे (इस्केमिक स्ट्रोक) किंवा रक्तस्त्राव झाल्यामुळे (हेमोरेजिक स्ट्रोक) होणाऱ्या स्ट्रोकसाठी उपचार उपलब्ध होतील. एका आठवड्यात समर्पित कॅथलॅब सुरू होण्याची अपेक्षा असून आधुनिक फिजिओथेरपी विभागाचे पाठबळ या गोष्टींमुळे तातडीच्या परिस्थितीपासून ते पुनर्प्राप्ती पर्यंत सर्वसमावेशक उपचार सेवा उपलब्ध आहेत.
स्ट्रोक हा एक आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग आहे ज्यामध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. जागतिक स्तरावर हे मृत्युचे दुसरे व अपंगत्वाचे तिसरे मोठे कारण मानले जाते (वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन, 2023). जर स्ट्रोक रुग्णाचा उपचार पहिल्या 60 मिनिटांत “गोल्डन अवर” मध्ये झाला, तर त्याच्या जगण्याची संधी मोठ्या प्रमाणात वाढते व दीर्घकालीन अपंगत्व कमी होते.
संचेती हॉस्पिटलने हा पुढाकार एंजेल्स इनिशिएटिव्हच्या अपूर्व सहकार्याने उचलला आहे. या उपक्रमांतर्गत वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन मान्यताप्राप्त निकषांनुसार 40 हून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्टची सेवा, अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान व उच्चस्तरीय उपचार सुविधा यांच्या माध्यमातून संचेती रुग्णालय आता रुग्णांना जलद निदान, तत्काळ उपचार व उच्च दर्जाचे पुनर्वसन उपलब्ध करून देईल.
एंजेल्स इनिशिएटिव्हचे कंट्री हेड विल्यम मसीह, म्हणाले की“एंजेल्स इनिशिएटिव्ह हा जागतिक उपक्रम आहे जो रुग्णालयांना स्ट्रोक उपचारात उत्कृष्टता साध्य करण्यासाठी सक्षम करतो. हा उपक्रम वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनसह विविध संस्थांच्या सहकार्याने रुग्णालयांना स्ट्रोक रेडीनेससाठी मार्गदर्शन करतो, वेळेवर उपचार व सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करतो. यामुळे जागतिक स्तरावर स्ट्रोक उपचार क्षमता वाढते आणि रुग्णांचे प्राण वाचवले जातात.”

0 टिप्पण्या