सासू-सासरे नको????
तर मग अनाथ मुलाशी लग्न करा!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 14/8/2025 : माझा अनुभव, निरीक्षण आणि वास्तवावर आधारित परखड विचार)
लग्न हा एक सुंदर शब्द आहे, पण त्याचं वास्तव समजून घेणं फार कमी लोक करतात. मी स्वतः अनेक संसार, कुटुंबं आणि नाती पाहिली आहेत. काही नाती पहिल्या वर्षातच मोडताना पाहिली, तर काही नाती पन्नास वर्षं टिकताना पाहिली.
या सगळ्यातून मला जाणवलं — नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम नाही, तर समज, आदर आणि समतोल या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
मुलींनो, तुम्ही तुमच्या आईबापाच्या डोळ्यांतला मोती आहात, पण तसाच तुमचा नवरा त्याच्या आईबापाचा अभिमान आहे. संसार म्हणजे दोघांचं जगणं एकत्र गुंफणं, एकाला दुसऱ्यावर लादणं नव्हे.
माझे निरीक्षणातून आलेले मुद्दे:
१. जसं तुम्ही लाडाकोडात वाढल्या, तसाच तुमचा नवरा देखील आईबापाच्या प्रेमात वाढलेला असतो. तो कुठूनतरी उचलून आणलेला नसतो.
२. लग्नाआधी तोही त्याच्या शिक्षण, करिअर, मित्रांमध्ये गुंतलेला असतो. संसाराचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरू होतो.
३. तुमचा आईबापाच्या संसारातला सहभाग जितका कमी, तितकाच त्याचाही असतो. त्यामुळे सुरुवातीला दोघांनाही बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात.
४. पाळीच्या वेळी तुम्हाला हवं तेव्हा मदत मिळावी असं असेल, तर स्पष्ट बोला. न सांगता त्याने ओळखावं ही अपेक्षा ठेवल्यास निराशा मिळेल.
५. आर्थिक लायकी काढताना स्वतःच्या घरचं पार्श्वभूमी आणि स्वतःची क्षमता यांचाही विचार करा.
६. तुम्ही जशा उंची, शिक्षण, पगार, घर बघता, तसाच तो रूप, रंग, फिगर बघतो. दोन्ही बाजूंना आपापल्या अपेक्षा असतात.
७. त्याच्या आयुष्यात त्याची आई नेहमीच महत्त्वाची राहील. त्याबद्दल अस्वस्थ होऊ नका.
८. जर सासूसासरे नको असतील, तर मग अनाथ मुलाशी लग्न करा.
९. तुम्ही तासन्तास आईशी बोलाल आणि तो दहा मिनिटं बोलला तरी जळफळाट होऊ देऊ नका.
१०. मित्र-मैत्रिणींचं महत्त्व नात्यात कायम राहील, ते पचवायला शिका.
११. घरकाम, अर्थकारण, प्रवास, स्वच्छता यात परफेक्ट नवरा हवा असेल तर विधुर/घटस्फोटीताशी लग्न करा.
१२. आपलं म्हणणं स्पष्ट बोला. मनातलं ओळखण्याचे गेम्स पुरुषांना येत नाहीत.
१३. लग्न म्हणजे दुसऱ्याला बदलणं नाही, तर दोघांनी शिकणं आहे. बदलाची सुरुवात स्वतःपासून करा.
१४. त्याच्या स्वप्नांना आणि ध्येयांना तितकंच महत्त्व द्या, जितकं स्वतःच्या स्वप्नांना देता.
१५. पतीची दुसऱ्यांशी तुलना करू नका. तुलना नात्यात जखमा करते.
१६. थोडी वैयक्तिक मोकळीक ठेवा. श्वास घेण्याइतकं स्पेस नात्याला लागते.
१७. तो घरकाम शिकताना चुका करेल, तेव्हा टोमणे न मारता साथ द्या.
१८. स्वतःच्या चुका मान्य करणं नात्यातला आदर वाढवतं.
१९. संसार फक्त जबाबदाऱ्या आणि खर्चापुरता मर्यादित ठेवू नका. हसणं, फिरणं, छोट्या गोष्टींचा आनंद — हेच नात्याचं खत आहे.
२०. पती-पत्नी हे एकमेकांचे सहकारी आहेत. आदर हरवला की प्रेमही हरवतं.
अजून व्यापक दृष्टिकोन — दोन्ही बाजूंसाठी:
🔹 पालकांसाठी:
लग्नानंतर मुलं मोठी झालीत हे मान्य करा. मुलगा किंवा मुलगी, दोघांनाही त्यांचं नातं आपल्या पद्धतीने घडू द्या. सतत हस्तक्षेप केल्यास संसार तणावग्रस्त होतो.
🔹 नवऱ्या साठी:
बायकोच्या भावना समजून घ्या, तिच्या आईवडिलांचा आदर ठेवा. “माझं घर” असं न म्हणता “आपलं घर” असं म्हणायला शिका.
🔹 बायकोसाठी:
नवर्याच्या कुटुंबाला परके न समजता तुमचंही म्हणून स्वीकारा. त्याची आई तुमच्याशी जशी वागते, तशीच तुम्ही तुमच्या शब्दांनी वागा.
निष्कर्ष:
मी हे लिहितोय कारण मला माहित आहे — संसार जिंकायचा असेल, तर दोघांनी एकत्र जिंकावं लागतं.
एकाला जिंकवण्यासाठी दुसऱ्याला हरवावं लागत असेल, तर तो संसार नव्हे — ती रोजची कोर्ट-कचेरी आहे.
आणि कोर्ट-कचेरीत जिंकणं कुणाचंच खरं नसतं.
✍🏻 विनायक भिकाजीराव वाडकर (सर) (पुणे/कोल्हापूर, 9039625999)
(समाज आणि नातेसंबंधातील वास्तव अनुभव मांडणारा परखड आवाज)
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
0 टिप्पण्या