🛑 देवेंद्रजी, आमदार नावाची बोकडं (काही) कुणाच्या जीवावर माजलीत ?

संपादकीय पान.........✒️

🛑 देवेंद्रजी, आमदार नावाची बोकडं (काही) कुणाच्या जीवावर माजलीत ?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे.

अकलूज दिनांक 5/8/2025 :

नुकतेच पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर किती चर्चा झाली ? लोकांचे प्रतिनिधी लोकांच्या प्रश्नावर किती भांडले आणि व्यक्तीगत मतभेदाचा तमाशा किती झाला ? याचा लेखाजोगा नक्की मांडायला हवा. हे अधिवेशन केवळ राडेबाजीत संपून गेले. विरोधक निष्प्रभ झालेत त्यामुळे सत्ताधा-यांना माज आल्याचे चित्र आहे. सत्तेतले आमदार, मंत्री म्हणजे एकेक नमुना आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या खालच्या दर्जाचे मंत्रीमंडळ कधीच नव्हते. काही अपवाद वगळता सत्तेतले आमदार आणि मंत्री महाराष्ट्राची लाज काढणारे आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा वारसा उज्वल आहे. यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, भाई उध्दवराव पाटील, एन डी पाटील, आचार्य अत्रे, एस एम जोशी, शरद पवार, गणपतराव देशमुख, विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे, आर आर पाटील अशा अनेक नामांकीत लोकांनी विधानसभेचा लाैकीक वाढवला. या विधानसभेत आजवर अनेक मान्यवरांनी आपल्या अभ्यासू वक्तृत्वाने, आपल्या जनतेप्रतीच्या तळमळीने विधानसभेची उंची वाढवली आहे. महाराष्ट्राच्या जनतेची छाती अभिमानाने फुलून यावी असे त्यांचे वर्तन होते. पण "जिथे फुले वेचली तिथं गोव-या वेचण्याची वेळ यावी" असे आजचे चित्र आहे. जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्यात झालेल्या राड्यावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आमदारांना माज आला असल्याचे वक्तव्य केले होते. पण आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सवाल आहे, देवेंद्रजी, ही आमदार नावाची बोकडं कुणाच्या जीवावर माजलीत ? याचं तुम्ही आत्मपरिक्षण करणार का ? 

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यात तथ्य आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता सत्तेतल्या आमदारांना माज आलाच आहे. काही आमदार नावाची बोकडं भलतीच माजली आहेत. होय ही बोकडंच. विधानसभेच्या लाैकीकाची ज्यांना पर्वा नाही, जनतेच्या प्रश्नाचे ज्यांना भान नाही. जे बेभान झालेत, बेफाम झालेत. कसेही बोलतायत, काहीही बोलतायत त्यांना काय म्हणावं ? कदाचित यांना बोकड म्हणणे हा त्या बोकडाचांही अवमान ठरावा असे टूकार आणि थिल्लर वर्तन या आमदारांचे आहे. त्यांचा मस्तवालपणा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या गाैरवाला कलंकीत करणारा आहे. संजय गायकवाड यांनी कॅंटीनच्या कर्मचा-याला ज्या पध्दतीने मारले तो प्रकार, आमदार बबन लोणीकर यांनी शेतक-यांना उद्देशून वापरलेली भाषा, संजय शिरसाट याची काही वक्तव्ये, मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेतील भाषा, कृषीमंत्री कोकाटे यांचा माज, पायाला छप्पन जणांना बांधून फिरण्याची भाषा करणा-या चित्राताई, रोज नवनवीन वादग्रस्त वक्तव्य करणारे नितेश राणे, गोपिचंद पडळकर ही यादी अजून मोठी होईल. हे सगळं भयंकर आहे. हा सर्व प्रकार लोकांची मान शरमेने खाली घालणारा आहे. हे असले टुकार लोकप्रतिनिधी आपले आहेत यावर विश्वास कसा ठेवायचा ? असा प्रश्न पडतो.

       आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्यातल्या राड्याने तर कहर केला. चक्क विधानसभेत गुंड आणले. पोलिस रेकॉर्डवरील गुंड विधानसभेत येतात आणि मारामारी करतात. हे चित्र जर विधानसभेतलं असेल तर राज्याची स्थिती काय असेल ? विधानसभेत गुंड पोहोचत असतील आणि गुंड नेणा-या लोकांच्यावर काहीच कारवाई होणार नसेल तर काय बोलायचं ? जर देवेंद्र फडणवीस यांच्यात काही विवेक जीवंत असेल तर त्यांनी याचा गांभिर्याने विचार करावा. आपण कशाला पाठबळ देत आहोत ? कुठल्या प्रवृत्ती, कुठल्या विकृतींना ताकद देत आहोत ? याचा विवेकाने विचार करावा. कोणतीही सत्ता शाश्वत नसते. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर खुप चांगले काम करण्याची संधी  काळाने देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. पण सत्तेच्या उन्मादात फडणवीसांचा विवेक मेला आहे. त्यांना याचे भान नाही. ते चेले-चपाट्यांच्या गराड्यात अडकले आहेत. त्यांनी ठरवलं तर ते महाराष्ट्राचे सोने करू शकतात. आपल्या कर्तृत्वाने राज्याच्या इतिहासात आपले स्थान शाश्वत करू शकतात. राज्याच्या विकासात खुप मोठे योगदान देवू शकतात. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून इतिहासाने यशवंराव चव्हाण यांची नोंद घेतली. पण महाराष्ट्राचे नवशिल्पकार म्हणून आपली ओळख निर्माण करण्याची संधी काळाने फडणवीसांच्या पुढ्यात आणून ठेवली आहे. महाराष्ट्राचे नवशिल्पकार व्हायचं की अनाजीपंत म्हणूनच रहायचं ? याचा विचार फडणवीसांनी जरूर करावा. सामान्य जनता त्यांच्याबद्दल काय बोलते आहे ? याचाही त्यांनी तटस्थपणे अभ्यास करावा. सत्तेसाठी हपापलेल्या, त्यासाठी कुणाचेही तळवे चाटणारांच्या कोंडाळ्यात देवेंद्र फडणवीस अडकले आहेत. ही गँग "देवाभाऊ देवाभाऊ" करते आहे. त्यांच्या अवतीभोवती राहून "देवाभाऊ देवाभाऊ"  करणारे गुप्तांगचोळे म्हणजे राज्याची जनता नव्हे याचे भान फडणवीसांनी ठेवावे. अजूनही वेळ गेली नाही. ते महाराष्ट्राला सावरू शकतात आणि विकासाच्या उंचीवर नेऊ शकतात. त्यांनी या माजलेल्या मस्तवाल बोकडांना जरूर चाप लावायला हवा. त्यांचा माज उतरवून त्यांच्या जबाबदारीेचे भान त्यांना द्यायला हवे. 

      विधानसभेतल्या राड्यावर विधानसभेच्या अध्यक्षांनी कठोर कारवाई करायला हवी. पण ते करतील असे वाटत नाही. विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहूल नार्वेकर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदावर बसवलेलं बुजगावणं आहे. त्यांना आत्मसन्मान नसेल पण आपण ज्या पदावर आहोत त्याचा सन्मान राखला पाहिजे याचे त्यांना भान आहे का ? गाैरवशाली वारसा असलेल्या ज्या सदनात आपण आहोत त्या सदनाच्या परंपरेची तर त्यांनी लाज बाळगावी. त्याची लाज आणि बूज बाळगून आव्हाड-पडळकरांच्या  राड्यावर कारवाई करावी. अशा प्रवृत्तीला पाठीशी घातले तर भविष्यात विधानसभेत मुडदे पडतील याचे त्यांनी भान ठेवावे.

दत्तकुमार खंडागळे  संपादक वज्रधारी, मो.9561551006

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या