🛑 मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय

 💜 मन इंद्रधनू

🛑 मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 4/8/2025 :

आपले मन हे एखाद्या बँकेसारखे असते. तुमच्या या 'मन बँकेत' रोज काही नवनवीन विचार तुम्ही टाकत असता. या विचार ठेवी वाढत जातात आणि त्यांनी तुमची स्मरणशक्ती बनते. शांत बसून विचार करताना किंवा एखाद्या समस्येवर विचार करताना प्रत्यक्षात तुम्ही या बँकेला, 'याबाबतीत मला काय काय माहिती आहे?', (जसे आपण सध्या गुगलला प्रश्न विचारत असतो) असा प्रश्नच विचारत असता. मग या परिस्थितीसंदर्भात पूर्वी तुम्ही जमा केलेल्या माहितीचे भाग ही स्मरणपेढी तुम्हाला आपोआप पुरवते. अशा प्रकारे तुमच्या नव्या विचाराला लागणारा कच्चा माल पुरवणारा मूलभूत पुरवठादार म्हणजे तुमची स्मरणशक्ती.

तुमच्या स्मरणपेढीतला पैशांची देवाण-घेवाण करणारा कारकून अगदी विश्वासार्ह आहे. तो तुम्हाला कधीच निराश करत नाही. तुम्ही जर त्याच्याकडे जाऊन म्हणालात, 'मी इतर कुणाहीपेक्षा कमी दर्जाचा आहे हे सिद्ध करणारे काही विचार मी माझ्या खात्यात टाकले होते, ते जरा मला काढायचे आहेत', तर तो लगेच म्हणेल, 'होय साहेब, पूर्वी दोन वेळा जेव्हा तुम्ही हे काम करायचा प्रयत्न केला होतात, तेव्हा तुम्हाला अपयश आलं होतं, जरा आठवा. तुम्ही शाळेत असताना तुमचे शिक्षक एकदा, 'तुझ्या हातून काहीही होणार नाही' असं म्हणाले होते, आठवतं? तुमच्याबद्दल तुमचा एक सहकारी एकदा म्हणत होता... आठवा... आठवतं?'

अशा प्रकारे तो कारकून तुमच्या मेंदूतून, तुम्ही कमी पडता हे सिद्ध करणारे विचारांमागून विचार खोदून खोदून काढत राहतो.

पण  तुम्ही जर'माझ्यापुढे एक पेचप्रसंग उभा राहिलाय. माझा धीर वाढवणारे कुठलेही विचार देऊ शकशील का?' अशी विनंती तुम्ही या कारकुनाला केलीत.. तर तो म्हणेल, 'होय साहेब'...!!  पण यावेळेस मात्र तो तुमच्या यशस्वी होऊ शकण्यासंबंधी तुम्ही जमा केलेले विचार काढून देईल. 'अशाच परिस्थितीत तुम्ही जी उत्तम कामगिरी केली होती ती आठवा. श्री अमुक यांनी तुमच्यावर कसा विश्वास टाकला होता. आठवतंय?.. तुमचे चांगले मित्र तुमच्याबद्दल काय म्हणाले आठवतंय?'

तर मंडळी, नेमकं काय होतं की नकारात्मक अशा आयुष्यात घडलेल्या गोष्टी अयशस्वी लोक मनाला लावून घेत असतात.अप्रिय प्रसंग ते मनात सारखे घोळवत राहतात आणि त्यांना आपल्या स्मरणशक्तीत मोक्याची जागा बहाल करतात. आपलं ध्यान ते त्या प्रसंगांपासून ढळूच देत नाहीत. रात्री झोपताना देखील याच विचारांच्या संगतीत ते झोपतात.

तर दुसरीकडे, आत्मविश्वासपूर्ण आणि यशस्वी लोक 'त्यावर पुन्हा विचार नको' असे म्हणतात. यशस्वी लोक त्यांच्या स्मरणपेढीत सकारात्मक विचार जमा करत राहण्यामध्ये प्रवीण असतात.

रोज सकाळी कामाला जाण्यापूर्वी तुम्ही गाडीच्या इंजिनमध्ये ओंजळभर माती टाकलीत, तर ती कशी चालेल असं तुम्हाला वाटतं? ते चांगलं चालतं इंजिन लवकरच घाण होईल आणि बंद पडेल. अगदी अशीच अवस्था नकारात्मक, अप्रिय विचार सतत भरत राहिल्यानं तुमच्या मनाची होत असते. नकारात्मक विचारांमुळे तुमच्या मनाच्या इंजिनाची निष्कारण झीज होत राहते. असे विचार आपल्या मनात चिंता, निराशा आणि न्यूनत्वाची भावना निर्माण करतात. इतर लोक वेगानं पुढे जात असताना, अशा विचारांमुळे तुम्हाला मात्र रस्त्याच्या कडेला थांबून राहावं लागतं.

हे सर्व घडू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. उदाहरणार्थ

तुम्ही जेव्हा एकटेच असता आणि स्वतःशी विचार करत

असता- गाडी चालवताना, एकटे बसून जेवताना- तेव्हा तुम्हाला आलेले सुखद, सकारात्मक अनुभव आठवा. तुमच्या स्मरणपेढीमध्ये चांगले विचार जमा करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो. किती छान वाटतंय अशी भावना जागृत होते. यामुळे तुमचं शरीर देखील योग्य कार्य करत राहातं.

आता ही एक छानदार योजना पाहा. झोपण्याच्या थोडेसे आधी तुमच्या स्मरणपेढीमध्ये चांगले विचार भरा. आपल्याला लाभलेल्या गोष्टींबद्दल समाधान माना. तुम्ही ज्याबद्दल कृतज्ञ असायला हवं, अशा अनेक गोष्टींचं स्मरण करा- तुमची पत्नी किंवा पती, तुमची मुलं, तुमचे मित्र-मैत्रिणी, तुमचे आरोग्य वगैरे वगैरे. दिवसभरात इतरांनी केलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी तुमच्या नजरेस पडल्या होत्या, त्या गोष्टींचं स्मरण करा. तुमचे छोटे छोटे विजय आणि उद्दिष्टे यांचं स्मरण करा. आपण जिवंत असल्याचा आनंद आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे मिळतो, त्या आठवा. हे सर्व केल्यानंतर काहीच दिवसात तुम्हाला तुमच्यात प्रचंड सकारात्मक बदल घडलेला जाणवेल तुमचं मन प्रचंड ऊर्जेने भरलेलं आहे असं तुमच्याच लक्षात येईल.

आणि त्यामुळेच हा लेख लिहिताना आपोआपच डोळ्यासमोर "तोरा मन दर्पण कहलाए" हे गाणं दिसायला लागले..!!!

फोटो सौजन्य गुगल 

राजश्री (पूजा) शिरोडकर 

एम ए मानसशास्त्र 

कोल्हापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या