🟣 खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 11/07/2025 : महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प अधिक कार्यक्षम, पारदर्शक व शेतकरी-केंद्रित बनवण्यासाठी GIS भौगोलिक माहिती प्रणाली आणि जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित प्रणाली तातडीने राबविणे आवश्यक आहे, असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. यासाठी खासदार मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री ( विदर्भ, तापी ,कोकण खोरे विकास) गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेतली व त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी नुकत्याच कर्नाटकमधील नारायणपूर लेफ्ट बँक कॅनॉल (NLBC) येथे यशस्वीपणे अंमलात आणलेल्या GIS आणि AI आधारित सिंचन व्यवस्थापन प्रणालीचा सविस्तर उल्लेख केला असून, अशा तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांमध्ये देखील अवलंब करावा अशी शिफारस केली आहे.
विशेषतः,पाण्याचा कार्यक्षम वापर, रिअल-टाईम मॉनिटरिंग, शेतकरी केंद्रित मागणी व्यवस्थापन, डिजिटल बिलिंग व लेखा सुलभता, आणि पाणी वापर संघटनांमधील पारदर्शकता यासाठी ही प्रणाली अत्यंत प्रभावी ठरते. याबाबत खा.धैर्यशील मोहिते-पाटील हे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास ) राधाकृष्ण विखे पाटील ,मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.
"उजनी सिंचन प्रकल्पात या प्रणालीचे पायलट प्रकल्प म्हणून अंमलबजावणी करण्यात यावी," अशी विशेष मागणीही खासदार मोहिते पाटील यांनी केली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत, याबाबत पुढील कार्यवाहीस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या