पोट तुझं भरलं असेल तर.......

 

पोट तुझं भरलं असेल तर.......

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 21/7/2025 :

पोट तुझं भरलं असेल तर,

देवा माझ्यासाठी घेऊ का,

       तुझं राहिलेलं उष्ट,

माझ्या घरी मी नेऊ का.?


      देवा इथे मात्र तुमची,

मस्त अंगत पंगत रंगलीय,

       घरात पीठ नाही म्हणून,

सकाळीच आई बाबासोबत भांडलीय.


       मूठभर पिठासाठी,

आई सगळ्या गल्लीत हिंडली,

      सगळ्या शेजारच्यांनी,

तुझ्या नैवेद्याची सबब सांगितली.


      देवा आज सकाळी मला,

सडकून भूक लागली,

       अचानक तुला आठवून,

तुझ्या मंदिराकडे धूम ठोकली.


       देवा मला तुझा 

कधी कधी हेवा वाटतो,

     एका जाग्यावर बसून,

मस्त नैवेद्याचा मलिंदा लाटतो.


      दर्शनासाठी आलेल्या लोकांनी,

नारळाचा तुकडा हातावर ठेवला,

      तुला मात्र देवा त्यांनी,

अर्धा नारळचं वाहिला.


     माफ कर देवा मला,

तुझा घास हिसकावतोय,

      अर्ध्या कोर तुकड्यासाठी,

भाऊ माझा घरात रडतोय.


     देवा मी आता ठरवलंय,

तुझ्यासोबत बंड करायचं,

     माझ्या भाकरीच्या प्रश्नासाठी,

स्वतःच पेटून उठायचं!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या