🟣 शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

🟣 शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 05/06/2025 :

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित "शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथा साहित्य कलाकृती पुरस्कार" सोहळा आणि राज्यस्तरीय कवी संमेलन बुधवार दि. ४ जून २०२५ रोजी संपन्न झाले. या सोहळ्यात राज्यभरातील पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, व स्मरणिका देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सोहळ्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष  संजय वाघ यांनी सांगितले.

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.. या अनुषंगाने प्रतिष्ठानने माहे डिसेंबर २०२४ मध्ये राज्यभरातील साहित्यिकांकडून साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी मागविलेल्या कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी आणि ललित लेखन अशा विविध प्रकारच्या राज्यभरातून जवळपास १४६ कलाकृतींमधून अनुक्रमे काव्यसंग्रहासाठी वाळवा जि. सांगली येथील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे  यांच्या “जामिनावर सुटलेला काळा घोडा, ” कथासंग्रहासाठी डॉ अनंता सूर यांच्या “कोंडमारा”कादंबरीसाठी डॉ. भीमराव वाघचौरे यांच्या “घरंगळण या कादंबरीला तर वर्षा किडे-कुळकर्णी यांच्या ललित लेखसंग्रह “काळीजफूल” अशा विविध साहित्य कलाकृतींना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कलाकृतींचे परिक्षण ख्यातनाम परीक्षक अनुक्रमे कविता संग्रहाचे प्रा. रामप्रसाद वाव्हळ, कथासंग्रहाचे प्रा. सुनिता चव्हाण, कादंबरीचे परीक्षण डॉ. भाऊसाहेब गमे, तर ललित लेखसंग्रहाचे  प्रोफे. डॉ. धीरज झाल्टे यांनी परिक्षण केले होते. 

सोहळ्याच्या पहिल्या सत्रात काव्यवाचन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी नाशिक येथील प्रसिद्ध गझलकार मृणाल गिते यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर सोहळ्याचे उद्घाटक प्राचार्य लक्ष्मण बारहाते यांनी केले. या सोहळ्याचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमांना  प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पणाने झाले.. याप्रसंगी राज्यभरातील कवींनी कविता सादर केल्या. या काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक कवियित्री स्वाती ठुबे, प्रा. राम गायकवाड, प्रसिद्ध कवी तथा मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार, प्रा. डॉ. मंगल सांगळे यांनी परीक्षण करून उत्तेजनार्थ दोन क्रमांक अनुक्रमे तन्वी शरद कदम, निलेश दिगंबर तुर्के, यांना तर तृतीय क्रमांक पुण्याचे किरण वेताळ, व्दितीय क्रमांक सुनील बावणे यांना तर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार समाधान लोणकर, हिंगोली पोलीस विभाग यांच्या बाप या कवितेला स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र , रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारप्रदान सोहळ्याचे दुसऱ्या सत्रात डॉ माहेश्वरी गावित यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक डॉ कैलास दौंड यांच्या हस्ते रिबीन कापून, मान्यवरांच्या हस्ते साहित्य कलाकृतींवर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कलाकृतींवर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे उद्घाटन करणे हा अभिनव प्रयोग महाराष्ट्रात एकमेव उदाहरण या सोहळ्यात पहावयास मिळाले. त्यानंतर जेष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी कार्याक्रमचे प्रास्ताविक केले. यावेळी नाशिक येथून वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, जेष्ठ पत्रकार  भास्कर कदम, चित्रपट निर्माते संदीप राक्षे,  साप्ताहिक अकलूज वैभवचे  संस्थापक संपादक सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, प्रसिद्ध लेखिका  रिताताई जाधव आदींनी शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करून साहित्य संमेलन आणि पुरस्कार याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. 

याप्रसंगी  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीचे व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे, अशोक भालेराव, नारायण पवार,  प्रकाश शीनगर, प्रविण बनकर, जालिंदर नारळकर, सुरेश बनसोडे, विनायक भोरकडे, रंगनाथ भोरकडे, साप्ता. अभिनव खानदेशचे संपादक  प्रभाकर सूर्यवंशी, विक्रम गायकवाड  योगेंद्र वाघ, बाबासाहेब पगारे, सुवर्णलता गायकवाड, ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, शैलजा रोहम, तसेच विविध माध्यमाचे प्रतिनिधी पत्रकार, महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आलेले कवी, साहित्यक , ग्रामस्थ, या सोहळ्यासाठी उपस्थित होते. सुत्रसंचालन  कवी बाळासाहेब गिरी यांनी केले प्रतिष्टानचे उपाध्यक्ष यमुना अशोक नारळकर,खजिनदार अशोक नारळकर, सदस्य प्रणित वाघ, प्रणिल वाघ, प्रणिता वाघ, तेजस वाघ, सपना वाघ, नीता प्रशांत वाघ, जयश्री संजय वाघ यांनी परिश्रम घेतले अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ, सदस्य प्रशांत वाघ, यांनी सांगितली.

  🟥 "मराठी साहित्य समृद्ध करण्यामध्ये शिवाबाबा  वाघ प्रतिष्ठान आयोजित साहित्यविषयक  उपक्रमाचे निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान आहे .साहित्य आणि समाज यांना जोडणारा,माणसे जोडणारा, नवसाहित्यिकांना प्रेरणा देणारा, नवीन विचार रुजविणारा, समाजाचे अनारोग्य दूर करणारा, सामाजिक बांधिलकी, समूहमन जोपासून संघटनात्मकरीत्या कृतिशील असणारा सातत्यपूर्ण साहित्यिक उपक्रम. भारतीय संस्कृतीचे मूळ मातृसत्ताक समाजव्यवस्थेत आहे, हे लक्षात घेऊन मातोश्री अंजनाबाई यांच्या नेतृत्वात हा उपक्रम चालू आहे. यावेळी  माझी अध्यक्ष म्हणून केलेली निवड ही याचेच द्योतक म्हणावे लागेल. आजचे साहित्य हे जीवनवादी साहित्य आहे. भारतातील समृद्ध अशा बोली मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. भाषा म्हणजे संस्कृती. त्यामुळे एखादी बोली नष्ट होणे म्हणजे एक संस्कृती नष्ट होणे होय.या बोलींचे संवर्धन,जतन करणेही  आवश्यक आहे.- डॉ. माहेश्वरी गावित 

🟪 अत्यंत आत्मियतेने साहित्यकृती मागवल्या जातात आणि जबाबदारीने निःपक्षपातीपणे पुरस्कारासाठी निवडल्या जातात. आलेल्या सर्व साहित्यकृतींचा सन्मान केला जातो हे सगळे आदर्शवत आहे. माय मराठीची इतकी निस्सीम सेवा क्वचितच पाहायला मिळते. राज्यभरातून येणाऱ्या जेष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांच्या प्रवेशिका ह्या शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्काराची प्रतिष्ठा आणि पारदर्शकता अधोरेखित करणाऱ्या आहेत. - डॉ. कैलास दौंड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या