🟩 मन इंद्रधनू 🟦 नाते जुळले मनाशी मनाचे

🟩 मन इंद्रधनू

🟦 नाते जुळले मनाशी मनाचे 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 04/06/2025 :

नमस्कार राम राम सुप्रभात मंडळी....!!!

अलीकडे रेडिओवर तशी मराठी गाणी छान लागतात.

काल देखील १९६६ मध्ये जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत नकळत मनाचा ठाव घेऊन गेले ...

नाते जुळले मनाशी मनाचे

फुले गीत ओठी, अनोख्या सुरांचे

या गाण्यावर विचार करत व्हाट्सअप पहात होते आणि पुढील संदेश वाचला...

"दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका- मनाचं 'बालपण' आणि अंतःकरणातलं 'देवपण' हे संपलं की माणूस संपला.."

खूप खूप खरं आहे हे. तर मंडळी, आपण स्वतःच स्वतःसाठी सर्वात सुंदर, चांगले, शांत आणि अमूल्य सोबती असतो. जन्माला आल्यापासून माणूस या जगात अनेक नात्यांत गुंतत जातो,पण सर्वात महत्त्वाचं नातं हे स्वतःशी असतं ही गोष्ट तो विसरुन जातो. खरं तर स्वतःला समजून घेतल्यावरच खऱ्या अर्थाने इतरांशी संबंध चांगले ठेवता येतात. किंबहुना स्वतःबरोबर थोडाफार वेळ घालवणं,स्वतःच्या भावना समजून घेणं आणि स्वतःशी प्रामाणिक असणं ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. बरोबर ना..? 

जेव्हा बाहेरच्या जगात गोंधळ असतो, तेव्हा आपलं मनच आपल्याला शांततेचा आधार देऊ शकतं.

तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात..शांतता ही आपल्या आतच असते.

आत्मस्वीकृती आणि आत्ममूल्य या दोन गोष्टी मानसिक स्थैर्याचे मूलभूत घटक आहेत. जेव्हा आपण स्वतःला जसे आहे तसे स्वीकारतो, तेव्हा कुणाच्या मान्यतेची गरज राहत नाही.अशा वेळी आपणच स्वतःसाठी एक विश्वासू मित्र,समजूतदार सल्लागार आणि प्रेमळ सोबती ठरतो. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही,तर मानसिक समतोल राखण्याचं एक महत्त्वाचे पाऊल आहे. म्हणूनच स्वतःची संगत ही नेहमीच सर्वात सुंदर,शांत आणि अनमोल असते. अन् हे देखील लक्षात घ्या की जेव्हा कोणीच सोबत नसते तेव्हा आपले मनच निर्विवाद पणे आपली सोबत करत असते.माझिया मना, जरा थांब ना 

पाउली तुझ्या माझिया खुणा 

तुझे धावणे अन् मला वेदना

माझिया मना, जरा बोल ना 

ओळखू कसे मी हे तुझे ऋतू

एकटी न मी, सोबतीस तू 

ओळखू कशा मी तुझ्या भावना*

माझिया मना, जरा ऐकना 

सांजवेळ ही, तुझे चालणे 

रात्र ही सुनी, तुझे बोलणे 

उषःकाल आहे नवी कल्पना

आशाताईंनी गायलेले हे गीत याच गोष्टी सांगून जाते.

डॉ. राजीव शारंगपाणी म्हणतात, "नियमांपेक्षा नियमबाह्य वर्तन जास्त मजा आणते. आयुष्य जर नियमांनी करकचून बांधलं, तर आनंद संपलाच. आला क्षण पूर्णपणे जगूनच आयुष्यात आनंद मिळवायचा असतो."

अशोक सराफ यांचा एक उनाड दिवस हा सिनेमा पाहिला आहे का...? पाहिला नसेल तर अवश्य बघा.

माणूस एकटा असो वा दुकटा... ज्याला आनंद लुटायचा असेल तर तो त्याला हव्या त्या पद्धतीने लुटणारच...!!

म्हणूनच मंडळी, भले तुमचे केस पांढरे होऊ द्यात, तुमच्या शरीरावर सुरकुत्या येऊ द्यात.. पण मनावर मात्र सुरकुत्या येऊ देऊ नका. तुमचे मन देव आनंद सारखे चिरतरुण राहू द्या... म्हणजे एव्हरग्रीन..!!! 

अशा वेळी जगजीत सिंग यांनी गायलेलं हे गीत ओठांवर आलं नाही तरच नवल....

ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन

जब प्यार करे कोई तो देखे केवल मन

नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो

आकाश का सूनापन मेरे तनहा मन में

पायल छनकाती तुम आ जाओ जीवन में

सांसें देकर अपनी संगीत अमर कर दो

फोटो सौजन्य गुगल 

राजश्री (पूजा) शिरोडकर 

एम ए मानसशास्त्र 

कोल्हापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या