वडाचे झाड / Banyan tree (Ficus benghalensis)

 वडाचे झाड / Banyan tree  (Ficus benghalensis)

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 10/06/2025 : मराठीत 'वटवृक्ष' किंवा 'वड' असेही म्हणतात. वडाच्या झाडाचे समानार्थी शब्द म्हणजे बरगद, न्यग्रोध. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. हा एक मोठा आणि दीर्घायुषी असलेला वृक्ष आहे. हा वृक्ष दक्षिण आशियात आढळतो. विशेषतः भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि भूतानमध्ये. वडाचे झाड धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. 

उपयोग:

औषधी: वडाची पाने, साली, मुळ, फुल आणि चिक यांचा उपयोग अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो, जसे की मधुमेह, रक्तदाब, त्वचेचे विकार आणि मासिक पाळीच्या समस्या. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात. वडाची पाने मोठी आणि चमकदार असतात. वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी आणि द्रोण बनवतात. 

धार्मिक:  हिंदू धर्मात वडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले. चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आढळतो. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होमहवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे आणि भगवान शिवांचेही ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे.

पर्यावरणीय: वड एक उत्तम हवामान शुद्ध करणारा,सर्वात जास्त प्रमाणात आक्सिजण देणारा, नैसर्गिक व्हेंटिलेटर आहे. हवेतील घातक वायु शोषून घेणारा वृक्ष आहे. वडाचे झाड ही एक पूर्ण परिसंस्था आहे. अनेक प्राणी, पक्षी किटकांचे आश्रय स्थान असते, जसे की खरोटया, उदमांजर, वटवाघुळे, बुलबुल, सातभाई, भारद्वाज. जवळ जवळ 28 प्रकारचे जीव अनेक लहान कीटक, सूक्ष्मजीव यांचा अधिवास असतो.

सामाजिक: वडाच्या झाडाखाली लोक एकत्र येतात, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमही येथे होतात. इंग्रजांच्या काळात वडाच्या झाडाखाली बाजार भरत असे. 

सांस्कृतिक: वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली, म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात. वड मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. 

वडाच्या झाडावरील 'हडळ' म्हणजेच पारंब्या (aerial roots) होत. वडाच्या झाडाला फांद्यांवरून खाली येणाऱ्या पारंब्या असतात, त्या जमिनीपर्यंत पोहोचतात आणि त्या रूजतात. त्यामुळे झाडाला आधार मिळतो आणि तो मोठा होतो. या पारंब्यांनाच हडळ असे  म्हणतात. 

भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. 

1) मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष 5 एकर भूमीवर पसरलेला आहे. हा 400 वर्ष जुना असलेला वृक्ष आहे, मुघल काळी तिथे शेकडो घोडे बांधले जायचे. 

2) बिहारमधील कमिटी मध्ये गोपालगंज गावतील वड 150 वर्ष आयुष्य असलेला आहे. 

3) भडोच, गुजराथ मधील नर्मदेच्या मुखाजवळील 15 व्या शतकातील म्हणजे कवि कबीर यांच्या काळातील वड सध्या 4.5 एकर वर पसरलेला आहे. त्याला फार धार्मिक महत्व आहे. 

4) कलकत्त्याच्या जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मधील वडाचा विशालकाय वृक्ष 1785 मध्ये लावला गेला. खास 13 लोकांची टीम या वृक्षाची देखभाल करते. यात वनस्पती तज्ञहि आहेत.  या वृक्षाचा पसारा 3.6 एकर परिसरात पसरला आहे. झाडाला 3,000 च्या वर परंब्या आहेत. लांबून या झाडाकडे पहिले तर ते जंगल वाटते. वृक्ष छायेत चार-पाच हजार लोक बसू शकतात. 

5) सातारा जिल्ह्यातील म्हसवे (ता. जावळी) गावाजवळच पाचवड-कुडाळ रस्त्यावर, एक प्रसिद्ध आणि मोठा वटवृक्ष आहे. या वटवृक्षाला "वडाचे म्हसवे" म्हणून ओळखले जाते. हा वटवृक्ष आशिया खंडात दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा वटवृक्ष मानला जातो. ह्या झाडाच्या परंब्या पासून 100 च्या वर झाडे तयार झाली आहेत.  350 वर्षांपूर्वीचे हे झाड 5.5 एकर क्षेत्रात फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी पसरलेलं आहे.  

6) तसेच अकोला जिल्ह्यातील पातूरजवळ अंबाशी गावात असलेला वटवृक्षही सुमारे 1.5 एकर परिसरात पसरलेला आहे.

दीर्घायुषाचे प्रतीक आणि भारतीयांच्या संस्कृतिशी, मनामध्ये घट्ट रुजलेला हा “वटवृक्ष” प्रत्येकाने जपला पाहिजे, पूजला पाहिजे, लावला पाहिजे.

डॉ. सौ. माणिक फाटक, 

महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या