🔵 मन इंद्रधनू
🟡 मनाच्या सौंदर्याचे रंग
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 28/5/2025 : फिल्म "धर्मात्मा" मधलं "तेरे चेहरे में वो जादू है बिनडोर खींचा जाता हूं" हे गाणं स्रीच्या अप्रतिम सौंदर्याचं सुरेख वर्णन करते. या गाण्याच्या वेळी हेमामालिनी अक्षरशः अमेझिंग दिसली आहे.आपण सगळेजण बाहेरून सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतो...!! त्या साठी स्त्रिया पार्लर मध्ये जातात..पुरूष मंडळी सलोन मध्ये जातात. हे नक्कीच चालेल , कारण तोही आपल्या व्यक्तिमत्वाचाच भाग आहे. पण त्याचबरोबर आपण आपल्या अंतर्गत गुणांच्या म्हणजेच अंतर्गत सौंदर्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे..... कारण या दोन्हीची गोळा बेरीज म्हणजे आपले व्यक्तिमत्व असते.
तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की, हजार सौंदर्यपूर्ण चेहऱ्यांपेक्षा एक सुंदर हृदय जास्त महत्त्वाचे आहे. छोटा गंधर्व यांनी गायलेले "संगीत सौभद्र" मधील "नच सुंदरी करु कोपा मजवरी धरी अनुकंपा" हे नाट्यगीत घ्या किंवा "ती पाहताच बाला कलिजा खलास झाला" हे "लग्नाची बेडी" मध्ये असलेले नाट्यगीत ऐका.. ही सर्व स्त्रियांच्या सौंदर्याचं वर्णन करणारी गीते आहेत. त्याचप्रमाणे "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" हे पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं गीत किंवा "मला मदन भासे हा मोही मना" हे "संगीत मानापमान" मधलं पद म्हणजे पुरुषांच्या सौंदर्याची वर्णने आहेत. आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टींचे प्रचंड आकर्षण वाटत असते. काही गोष्टींचा, वस्तूंचा, माणसांचा आपल्याला मोह पडत असतो. अशा या मोहात पाडणाऱ्या गोष्टीपासून वेळीच दूर होता आलं नाही तर आपल्याला मिळालेला आजचा आनंद उद्याच्या दुःखाचं कारण बनतो. पण आपलं मन मात्र प्रचंड वेड असतं हो...!! आपल्याला जे मिळत नाही ते दुसऱ्याला मिळालेलं आपल्याला बघवत नाही.. बरोबर ना? आणि मग आपल्याला मिळाले नाही म्हणून ज्याला ते मिळाले आहे, त्याला आपण मत्सराने उगाचच बदनाम करत असतो. एकदा का मनात मत्सर, तिरस्कार, द्वेष इत्यादी अवगुणांनी जागा घेतली की मनाच्या सौंदर्याला ग्रहण लागते.
"दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर स्वतःची स्मारके उभारण्यापेक्षा स्वतःची वेगळी अशी उजळ प्रतिमा तयार करुन चांगल्या विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमीच अभेद्य राहील...!!! मनाचे सौंदर्य वाढेल आणि चिरकाल टिकेल".
नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं...! आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कोणताही चुकीचा नसतो, फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्द करण्याची आपल्यात जिद्द हवी...! जिद्दी असलेली माणसे मनाने ही सुंदर असतात हो...!!
तर मंडळी, आता चक्क पावसाळा सुरू झाला आहे. परवाच झालेल्या वादळी पावसामुळे आमच्या कोल्हापूर मध्ये अनेक झाडे कोसळली. एखादं वादळ आलं, की झाडांची मुळे किती घट्ट आहेत हे आपल्याला कळतं. आपण हे लाखवेळा ऐकलंय ! पण आपण किती घट्ट आहोत, खंबीर आहोत, हे पाहिलंय का कधी ? कसे पाहणार ? मात्र एखादं संकट आलं, की आपले आणि आपल्या मित्रांचेही पाय किती घट्ट आहेत हे मात्र निश्चितपणे उमगतं.
व.पु. काळे म्हणतात की, "समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसन्याचं आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो.
आपण फक्त एकच लक्षात ठेवायला हवं की आयुष्य म्हणजे केवळ गुलाबाच्या फुलांची मऊ पायवाट नव्हे,आपल्या वाटेवर त्यांच्या काट्यांचाही अधिकार आहे. या काट्यांवर चालणे सुखावह व्हावे यासाठीच आपले मन सुंदर असले पाहिजे. विचार सुंदर तर मन सुंदर.. आणि मन सुंदर तर आयुष्य सुंदर...!!!
अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात की,
There comes a point in your life
when you need to stop reading other people's books and write your own - Albert Einstein
फोटो सौजन्य गुगल
राजश्री (पूजा) शिरोडकर
एम ए मानसशास्त्र
कोल्हापूर
0 टिप्पण्या