एप्रिल महिन्याचा लेखाजोखा

 

एप्रिल महिन्याचा लेखाजोखा  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 05/05/2025 :

नाकी डोळी छान, साडेपाच फूट उंच, वर्ण गोरा, स्वयंपाकात निपुण, अत्यंत सोज्वळ, डबल ग्रॅज्युएट, सासू-सासरे घरात चालणार आहेत, नवऱ्याला सरकारी नोकरी नसली तरी चालेल, फक्त निर्व्यसनी हवा... इतके गुण असलेली मुलगी, लग्न होत नाही म्हणून दहा वर्षे घरात बसलेली... 

काही कारणाने तिला कोणी पसंत करत नाही किंवा तिला तो पसंत पडत नाही.... 

असं न सांगता येणारं दुखणं...  

अशा या मुलीच्या बापाला जो काही त्रास असेल, तोच मला त्रास !

भीक मागणारे आमचे वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील, आजी-आजोबा यांना काम करण्याची इच्छा आहे परंतु कोणी काम देत नाही, यांच्या पुनर्वसनासाठी रोजगार केंद्र निर्माण करावे यासाठी जागा *(स्थळ)* शोधतो आहे, परंतु गेली दहा वर्षे कोणी "स्थळ" देत नाही. 

काहींनी आम्हाला रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी "स्थळे" पाठवली, पण ती स्थळे आम्हाला पसंत नव्हती.

जी "स्थळे" आम्हाला पसंत होती... त्यांनी काही ना काही स्वरूपात माझ्याकडे बराच "हुंडा" मागितला... !

नोकरी सोडून वर संशोधन करणारा मी बाप... इतका हुंडा या "स्थळांसाठी" देणं मला कसं परवडेल ?

याच परिस्थितीत श्री दानिश भाई धावून आले आणि *मध्यरात्रीचे सूर्य* या नावाचे रोजगार केंद्र नव्हे, आमची मुलगी त्यांनी आपल्या पदरात घेतली... 

बिबवेवाडी येथील *स्थळ* दिले, नववधूचा विवाहापूर्वी करतात तो मेकअप करून दिला, इथे टीव्ही, फ्रिज, कार्पेट अशा सर्व बाबींचा इंतजाम केला. तोरणे लावली, हार फुले माळा लागल्या, "संसाराला" लागतील त्या सर्व गोष्टी दिल्या... ! 

खऱ्या अर्थाने त्यांनीच कन्यादान केले...! 

मी माझ्या डोक्यावरची पगडी त्यांच्या पायाशी ठेवली... त्यांनी ती उचलून परत माझ्या डोक्यावर घातली... 

नावातच "दान" आणि "इश" असलेल्या माणसा पुढे पगडीच काय, संपूर्ण आयुष्य बहाल केले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत... ! 

तर 30 एप्रिल 2025 रोजी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, हा सोहळा संपन्न झाला. 

दहा वर्षांपूर्वी भीक मागणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व रोजगार केंद्र सुरू करायचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले. आमच्या वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील आणि आजी आजोबा यांच्यामार्फत या रोजगार केंद्रात अक्षय तृतीयेच्या दिवसापासून प्रोडक्शन सुरू झाले. 




या सोहळ्याविषयी पुढे लिहिलेच आहे, परंतु मला एवढीच एक "मुलगी" नाही... इतरही अनेक मुलींची अर्थ प्रकल्पांची ... जबाबदारी बाप म्हणून माझ्या डोक्यावर आहे. 

त्या विषयी अगदी थोडक्यात सांगतो,  : 

- अत्यंत गंभीर अवस्थेतील 5 रस्त्यावर पडलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांचे जीव वाचले आणि त्यांना आपापल्या गावी स्वखर्चाने पाठवले.

- एक धडधाकट (भीक मागणारा) मुलगा, याला श्री भाटे यांच्या वृद्धाश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. तिथल्या आजी आजोबांची तो सेवा करेल. मी श्री आणि सौ भाटे यांचा ऋणी आहे. 

- रस्त्यावर पडलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पातून रोज जेवण दिले आहे. 

- अनेक आजा मावश्या यांच्याकडून (खराटा पलटण) सार्वजनिक स्वच्छता करून घेऊन त्यांना किराणा (Grocery) दिला आहे. 

- या महिन्यात जवळपास 900 लोकांना वैद्यकीय सेवा, लॅब टेस्ट तसेच वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. 

आणखी सुद्धा बरंच काही आहे ...

पण सध्या आमच्या मुलीचा नवीन संसार सुरू झाला आहे... त्याचं कौतुक यावेळी जास्त आहे, म्हणून त्याविषयी जास्त सांगतो...

तर, आपणा सर्वांच्या मदतीने शुभाशीर्वादाने, भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले "प्रशिक्षण व रोजगार केंद्र" अक्षय्य तृतीयेला सुरू झाले

*आता नेमका काय आहे हा प्रकल्प ते सांगतो... 

याचना करत; भिक मागत जगणाऱ्या लोकांना कोणताही रोजगार उपलब्ध होत नाही, या कारणामुळे त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून काही प्रॉडक्ट तयार करून घेऊन, त्यांच्या "हाताला काम" आणि "पोटाला अन्न" सन्मानाने देण्यासाठी हा प्रकल्प निर्माण केलेला आहे. 

या प्रशिक्षणा दरम्यान कोणालाही इजा होऊ नये, प्रदूषण कमीत कमी व्हावे किंबहुना प्रदूषणाला आळा बसावा आणि कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे

या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू असतील 

1. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण)

डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक फार्मा कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर (Natural/ Organic)हवी असते.

*धार्मिक स्थळांमध्ये किंवा रस्त्यावर पडलेल्या अशा फुलांचे निर्माल्य / कचरा आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून आम्हास देतील, किलोच्या भावाने आपण त्या विकत घेऊन त्यांना पैसे देऊ.*

*वृद्ध आणि दिव्यांग लोक बैठ्या स्वरूपात रंगानुसार या फुलांचे वर्गीकरण करतील.

* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून, विशिष्ट तापमानात सुकवून फुलांची पावडर (चूर्ण / फाईन पावडर) केले जाईल.*

* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल.

आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना, तयार झालेली फुलांची ही नैसर्गिक पावडर आपण देणार आहोत.

आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत.... 

रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल... (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) 

कचरा आणि निर्माल्या मधून तयार होणारी लक्ष्मी... कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल... भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल ! 

*2. शोभेचा बुके

तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. आपण कोणालाही तो भेट दिला तरी ती व्यक्ती, पुन्हा कचऱ्यात फेकून देते. 

माझी आई, जो बुके बनवते, तो दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं... ! 

आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते. 

आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना घेण्याची विनंती करू, देणगी म्हणून ते जे काही मूल्य देतील ते आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पगार म्हणून दिला जाईल. 

*3. लिक्विड वॉश

कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस,  आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत. 

यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे. 

हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी  घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत, 

यातून मिळणारा निधी, पगार देण्यासाठी वापरणार आहोत. 

4. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे... प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे

ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. 

अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत. 

समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी भिक्षेकर्‍यांच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत. 

या सर्वातून जे देणगी मूल्य मिळेल तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.

तर असे या प्रकल्पाचे... आमच्या संसाराचे प्राथमिक स्वरूप आहे... ! 

भविष्यात हळूहळू आणखीही प्रकल्प या माध्यमातून सुरू करण्याचे डोक्यात आहे बघूया कसं जमतं ते...! 

*ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे ते लोक दुसऱ्यांनी दिलेल्या उसन्या प्रकाशावर आतापर्यंत चालत होते, या प्रकल्पाच्या माध्यमातून, स्वतःच्या काळ्याकुट्ट आयुष्याच्या मध्यरात्री, ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील... स्वयंप्रकाशित होतील... स्वयंपूर्ण होतील... आणि स्वतःच्या प्रकाशात चालायला सुरुवात करतील आणि म्हणून या प्रकल्पाचे नाव  *'मध्यरात्रीचे सूर्य...!!!"

आपल्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ...

1. प्रत्येक व्यक्तीस रुपये 200  प्रतिदिन देणार आहोत 

2. सकाळचा चहा नाष्टा आणि दुपारचे जेवण. 

3. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा इ. काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस देणार आहोत. 

आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छा यामुळे हा प्रकल्प भरभराटीस येईल असा विश्वास आहे ! 

माझ्यासाठी हा प्रकल्प नव्हेच, ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या जगण्याचा हा सोहळा आहे. 

आपली साथ आणि सोबत आजपर्यंत मिळाली तशीच ती इथून पुढे सुद्धा लागणार आहे, आपण नेमकी कशी मदत करू शकता हे येत्या दोन दिवसात पुन्हा कळवतो. 

मध्यरात्रीचे सूर्य पत्ता : 

Jayanti Apartments Hos Soc Swami Vivekanand Rd and Bibwewadi Kondhwa Rd/Sitaram Thakare Rd. Bibvewadi, Pune

लोकेशन मॅप खालील प्रमाणे :  https://maps.app.goo.gl/JrEKwyfs5zNfbyXb7?g_st=aw

(आमची काम करणारी मंडळी सोमवार ते शनिवार (रविवारी सुट्टी) 11 ते 4 या वेळात इथे असणार आहेत, सकाळची रस्त्यावरची कामे करून दुपारी दीड ते चार या दरम्यान मी तिथे असेन )

*नेमकं काय घडलं त्या दिवशी 

- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रोडक्शन सुरू झाले पाहिजेच हा माझा हट्ट होता. 

- या दिवशी प्रकल्पात करू इच्छिणारे 50 दिव्यांग आजी आजोबा यांनी येथे हजेरी लावली. 

- संपूर्ण एप्रिल महिन्यात, कोणत्या बस स्टॉप वर जायचे, कोणत्या बसमध्ये बसायचे, कुठे उतरायचे, कंडक्टरला काय सांगायचे, तिकीट कसे काढायचे, ते किती असते, कुठे उतरायचे याचे ट्रेनिंग झाले. 

- सेंटरवर आल्यानंतर माझे लोक काम करतील की नाही हे माझे चॅलेंज नाहीच, बसचा पास काढून देऊन सुद्धा, व्हीलचेअर घेऊन, ज्यांना दंडाला धरल्याशिवाय उभे राहता येत नाही अशा माझ्या माऊलींनी बस मध्ये कसे बसायचे, प्रवास कसा करायचा, सेंटरवर कसे पोचायचे हे माझे मुख्य चॅलेंज आहे, आणि यावर मला तोडगा सुचत नाही. 

- सर्वांसाठी एक प्रायव्हेट बस करायची म्हटलं, तर ते कमीत कमी महिन्याचे 80 हजार रुपये घ्यायचे म्हणतात... डोनेशन मधून मिळालेले पैसे फक्त बससाठी द्यायची माझी इच्छा नाही. 

बघू.... तर हे सर्व दिव्य करून 50 आजी आजोबा आणि दिव्यांगलोक अक्षय तृतीयेला कामासाठी हजर झाले. 

- फुलांचे वर्गीकरण करणे, पावडर करणे, गिफ्ट आर्टिकल तयार करणे अशी अनेक कामे अक्षय्य तृतीयेला सुरू झाली. 

-  अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आई-वडिल, ज्यांनी जागा दिली ते दानिश भाई, जे हा प्रकल्प चालवायला मदत करणार आहे ते विपुल भाई, लिक्विड वॉश चे सर्व तंत्रज्ञान देणारे मेहता भाई, आणि ज्यांनी सर्व मशीन दिले असे निलेश लिमये, सेंचुरी एन्का यांच्या हस्ते सर्व मशीनची पूजा केली. 

- इथे काम करणाऱ्या सर्वांना आपण आयडेंटीटी कार्ड आणि युनिफॉर्म दिला आहे. 

- काम केलेल्या सर्व वृद्ध आजी आजोबा आणि दिव्यांग यांना पुरणपोळी तूप आणि चितळे यांची लस्सी दिली आहे, कोरडा शिधा दिला आहे. 

लेख वाढत चालला आहे... आता थांबतो... 

30 एप्रिल... संध्याकाळी, सेंटरला कुलूप लावताना एका मान्यवरांनी विचारले, 'उद्या सुट्टी का मग ?' 

'का ? कसली सुट्टी ? उद्या काय आहे ?' मी म्हणालो. 

'उद्या एक मे... कामगार दिन... कामगारांना सुट्टी द्यायची असते..' ते म्हणाले. 

मी त्यांना म्हणालो, ' काम करायला आलेले आमचे भिक्षेकरी हे कामगार नाहीत, प्रकल्पाचे पार्टनर आहेत, सुट्टी कामगार घेतात... पार्टनर नाहीत...!' 

यानंतर सेंटरला कुलूप लागले आणि त्यांच्या तोंडालाही... ! 

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे

9822267357

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या