🟧 शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार जाहीर
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 13/05/2025 :
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती चौथ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल दि. ०१ मे २०२५ रोजी कामगार दिनाच्या दिवशी जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृतीदिनानिमित्त चौथ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- ७८ , कथा संग्रह-२२, कादंबरी -१६ आणि ललित लेखसंग्रह- २२ व इतर ५ अशा एकूण १४३ विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एक कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
निकाल पुढीलप्रमाणे - कवितासंग्रहासाठी वाळवा जि सांगली येथील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या “जामिनावर सुटलेला काळा घोडा”, कथासंग्रहासाठी वणी, जि यवतमाळ येथील लेखक डॉ अनंता सूर यांच्या “कोंडमारा, आणि कादंबरीसाठी वैजापूर जि. छ. संभाजीनगर येथील लेखक डॉ. भीमराव वाघचौरे यांच्या “घरंगळण” आणि हिंगणा रोड, नागपूरच्या लेखिका मा वर्षा किडे कुळकर्णी यांच्या “काळीजफुल” या ललित लेख संग्रह कलाकृतीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्व कलाकृती पुरस्कार निवडीसाठी परिक्षक अनुक्रमे कवितासंग्रहासाठी प्रा. रामप्रसाद वाव्हळ- परभणी, कथासंग्रहासाठी प्रा. सुवर्णाताई चव्हाण, येवला, आणि कादंबरीसाठी मा. डॉ. भाऊसाहेब गमे, प्राचार्य येवला महाविद्यालय, तर ललित लेखसंग्रहासाठी मा डॉ धीरज झाल्टे, नाशिक यांनी परीक्षण केले. प्रतिष्ठानने परिक्षकांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले आहे.





0 टिप्पण्या