🟪 रूम नंबर १०२ ‼️

 संपादकीय...........✍️

🟪 रूम नंबर १०२ ‼️

 वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 23/5/2025 : विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती शासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेण्याकरिता तीन दिवसांच्या धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता, येथील शासकीय विश्रामगृहातील गुलमोहर रूम नंबर १०२ मधून एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांची रोकड आढळून आली आहे. त्यामुळे या रूम नंबर १०२ चे गूढ वाढले आहे. हे घबाड नेमके कोणाचे, ते येथे कशासाठी आणले गेले, याबाबत अद्याप खुलासा झाला नसला तरी विधिमंडळ आमदारांच्या अंदाज समितीला वाटण्यासाठी है पैसे आणण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. योगायोग म्हणजे (?) ज्या रूम नंबर १०२ मध्ये हे घबाड सापडले, ती रूम शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने बूक करण्यात आली होती. दुसरा योगायोग म्हणजे अर्जुन खोतकर या अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे खोतकरांचे पाय या प्रकरणावरून अधिक खोलात जाताना दिसत आहे. विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती शासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी धुळे जिल्हा दौऱ्यावर येणे व शासकीय विश्रामगृहात एवढी मोठी रक्कम सापडणे हा योगायोग म्हणता येणार नाही. शिवाय, या रकमेवर हक्क सांगण्यासाठी कोणी पुढे येऊ नये म्हणजे ही रक्कम आमदारांना खूश करण्यासाठीच येथे आणण्यात आल्याचा अनिल गोटे यांनी बांधलेला 'अंदाज' खरा ठरताना दिसत आहे. अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपानुसार ही रक्कम पाच कोटी रुपये होती. त्यामुळे उर्वरित रकमेचा शोध घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असल्याने आतापर्यंत उर्वरित रकमेची योग्य विल्हेवाट लावण्यात आली असावी. अनिल गोटे यांनी धुळे जिल्ह्यातील विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार तसेच त्यातील अधिकाऱ्यांचा सहभाग उघडकीस येऊ नये म्हणून हा मलिदा आमदारांना वाटला जात होता, असा गंभीर आरोप केला आहे. अनिल गोटे केवळ आरोप करूनच थांबले नाहीत, तर या रूम नंबर १०२ बाहेर त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह रात्रभर ठिय्या दिला. जिल्हा प्रशासन, अँटी करप्शन ब्युरो यांना याबाबतची कल्पनाही दिली. एका माजी आमदाराकडून गंभीर आरोप होत असताना, स्थानिक प्रशासनाची मात्र कारवाई करण्यास चालढकल सुरू होती. स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवली असती तर कदाचित उर्वरित साडेतीन कोटींची रक्कमदेखील हस्तगत झाली असती. अनिल गोटे यांनी या रूम नंबर १०२ बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या खोलीचे कुलूप तोडण्यात येऊन तपासणीत एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांची रोकड सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी जप्त केली. गुरुवारी (दि. २२) पहाटेपर्यंत ही रक्कम शासकीय विश्रामगृहावर मोजण्याचे काम सुरू होते. महाराष्ट्र विधिमंडळातील अंदाज समितीचे नेतृत्व करणारे आमदार अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले असून, विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच सबंध नसल्याचा दावा केला आहे. हे सर्व प्लांट केले गेले असल्याचा आरोपही केला आहे. खोतकरांनी आरोप फेटाळले असले तरी माजी आमदार अनिल गोटे यांना खबऱ्यांकडून मिळालेली माहिती पक्की होती. त्यामुळेच त्यांनी या घटनेचा भांडाफोड होत नाही तोपर्यंत या रूम नंबर १०२ च्या बाहेर ठिय्या दिला होता. भाजपने केलेला खोक्यांचा खेळ पाहता, अंदाज समितीला भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी देण्यात येत असलेले हे पैसे महाराष्ट्र लुटीचाच भाग आहेत का? सरकार, प्रशासनाने त्वरित आपली भूमिका जाहीर करावी, असे आव्हान दिले आहे. विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती ही राज्यात शासनातर्फे राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून यांचा अहवाल सादर करते. वेळप्रसंगी काही सूचना व सल्लेदेखील देते. मात्र या विविध विधिमंडळ समित्या प्रशासनासाठी फार्स ठरत आहे. या समित्यांनी शासनातर्फे मंजूर झालेली कामे योग्य प्रकारे झाली आहेत की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक असताना, समिती सदस्यांसाठी हे पाहणी दौरे म्हणजे पर्यटन व तीर्थाटन ठरत आहेत. वातानुकूलित गाडी व रूममध्ये बसून हे पाहणी दौरे पूर्ण केले जातात. विशेष म्हणजे, या दौऱ्यातील आमदार कोठे भेट देणार, याची प्रशासनासह माध्यम प्रतिनिधींनादेखील माहिती दिली जात नाही. हा पाहणी दौरा गोपनीय असू शकतो, मात्र तीन-चार दिवसांच्या या दौऱ्यात या आमदारांनी कोणत्या ठिकाणची पाहणी केली. त्यांना कोणत्या त्रुटी आढळून आल्या, या संबंधाची माहिती दौऱ्याच्या शेवटी तरी जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र गोपनीयतेच्या नावाखाली आमदारांच्या या दौऱ्यात अनेक बेकायदेशीर गोष्टींवर पांघरूण घातले जाते. समितीने आपल्या अहवालात 'ऑल इज वेल' शेरा द्यावा म्हणून त्यांना खूश करण्याचे काम केले जाते. त्यासाठी प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी पदरमोड (?) करून स्वनिधी जमा करतात. हा भरघोस जमा निधी बक्षीसरूपात समिती सदस्यांना दिला जातो. धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. एखाद्या चांगल्या कामगिरीसाठी रोख रकमेचे बक्षीस दिले जाते. धुळ्यात गेलेल्या अंदाज समितीनेही अशी काही देदिप्यमान कामगिरी केली असेल का? आणि म्हणून त्यांना 'बक्षीस' देण्यासाठी कोट्यवधी रुपये जमा केले असतील का? हा संशोधनाचा विषय आहे. पण अवकाळी पावसाप्रमाणे आ. अनिल गोटेसाहेब त्या १०२ क्रमांकाच्या खोलीत अचानक हजर झाले आणि त्यांच्यामुळे अंदाज समितीच्या 'देदिप्यमान कामगिरी'वर आणि 'बक्षीस' म्हणून मिळणाऱ्या रकमेवरही पाणी फेरले गेले, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या आमदार समित्या शासकीय कामांच्या दर्जा तपासणीसाठी नाही तर अधिकाऱ्यांचे खिसे रिते करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचे विरोधी पक्षांतील आमदार आता बोलू लागले आहेत. कारण आरोप करणारे हेच आमदार या अगोदर सत्तेत होते. त्यामुळे अशा विधिमंडळ समित्या कशासाठी स्थापन केल्या जातात, याचा त्यांना चांगलाच अंदाज आहे. रूम नंबर १०२ मध्ये सापडलेले घबाड पाहता, आता सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र आज ज्याच्यावर आरोप झाले ते जात्यात (की गोत्यात) आहे व आरोप करणारे सुपात आहे हे विसरून चालणार नाही. पुढील काही दिवस तरी महाराष्ट्रातील राजकारण या रूम नंबर १०२ भोवतीच फिरत राहणार असे दिसते.

चंद्रशेखर शिंपी

सहसंपादक, दैनिक गावकरी

9689535738

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या