🟪 भारताची पहिली गुप्तहेर महिला
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. ( केदारनाथ येथून)
दिनांक 18/05/2025 :
१८५७ ते १९४७ पर्यंत असंख्य देशप्रेमींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. अनेक आंदोलनं केली. युद्ध केले, ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. देशाला स्वतंत्र करण्यासाठी किती वीर अज्ञातवासात मरण पावले कोणास ठाऊक. अशीच एक धाडसी महिला म्हणजे नीरा आर्या, ज्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला गुप्तहेर मानलं जातं.
निरा आर्या एक अशा धाडसी वीरांगना होत्या, ज्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या पतीची हत्या केली. त्यानंतर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देखील भोगावी लागली. तुरुंगात त्यांच्यावर अनेकदा अत्याचार झाले. पण जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा कोणीही या धाडसी महिला बद्दल विचारलं नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात अनेक वाईट दिवस आले.
निरा आर्या आझाद हिंद फौज सेनेच्या पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म ५ मार्च १९०२ रोजी उत्तरप्रदेश मधील बागपत येथील खेकरा शहरात झाला. लहानपणा पासूनच त्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यात सामील होऊ इच्छित होत्या, आणि त्या आझाद हिंद फौजेच्या राणी झाशी रेजिमेंट मध्ये सामील झाल्या. निरा आर्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यात होत्या आणि त्यांचं लग्न श्रीकांत जय रंजन दास यांच्याशी झालं.
जेव्हा श्रीकांतला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यात उपस्थितीची माहिती मिळाली, तेव्हा त्याने त्यांची हेरगिरी करण्यास सुरुवात केली. श्रीकांत भारतात सीआयडी इन्स्पेक्टर होता, पण त्याचे आणि नीराचे विचार पूर्णपणे वेगळे होते. एकदा नीरा बोस यांना भेटण्यासाठी गेल्या, तेव्हा श्रीकांतने सुभाषचंद्र बोस यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण निरा यांनी पतीची हत्या केली. यासाठी निरा यांना अंदमान मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण तरी देखील निरा यांनी कोणाला काहीही सांगितलं नाही.
सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल खरी माहिती दिल्या नंतर आम्ही सुटका करू, असं देखील निरा यांना सांगण्यात आलं. पण निरा यांनी तुरुंगात अत्याचार सहन केला, पण कोणाला काहीही सांगितलं नाही. त्यांना तुरुंगात सतत नेताजी यांच्या बद्दल विचारण्यात यायचं. तेव्हा त्या उत्तर द्यायच्या की, नेताजी यांचं प्लेन क्रॅश मध्ये निधन झालं आणि ही माहिती सार्वजनिक आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांना छळण्यात आलं.
एके दिवशी निरा आर्या रागाने म्हणाल्या की, नेताजी माझ्या हृदयात आहेत. यावर जेलर म्हणाला की, जर नेताजी त्यांच्या हृदयात असतील तर त्यांना बाहेर काढा. यानंतर एका जेलरने निरा यांचे कपडे फाडले आणि ब्रेस्ट रीपरने त्यांचे स्तन कापले. अखेर तुरुंगात असलेल्या निरा यांना स्वातंत्र्या नंतर सोडण्यात आलं. यानंतर त्यांनी स्वतःचं उर्वरित आयुष्य फुले विकण्यात घालवलं. २६ जुलै १९९८ मध्ये हैदराबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सौजन्य : TV9 मराठी
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या