"गो-मूत्र : समज व वास्तव "
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : भाग्यवंत ल.नायकुडे, अकलूज दिनांक 18/05/2025 :
नवशक्ति(१७मे)मध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ता डाॅ.दीपक माने यांचा 'भ्रम-विभ्रम' सदरात व "गो-मूत्र : समज व वास्तव " या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला.या विचारप्रवर्तक लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
आपल्या भारतीय सिंधू संस्कृतीत गो-पालन फार पुरातन असल्याचे दिसते.त्याला अनेक मिथकांमध्ये, कथांमध्ये चर्चिले आहे. आपल्याकडे बहुतांश मंडळी,कोणी महान व्यक्ती सांगेल तेच खरे आणि ग्रंथ प्रामाण्य म्हणजे पुरातन ग्रंथात सांगितले आहे,तेच त्रिकाल सत्य मानणारे असतात.गो-मूत्र म्हणजे गो-वर्ग मूत्र यात बैल मूत्र असले पाहिजे;पण लिंगभेद,येथेही परंपरा, भेदाभेद वृत्तीमुळे फक्त गाईचे मूत्र हा समज प्रचलित आहे. विज्ञानानुसार,मूत्र,मल,घाम हे शरीरातील उत्सर्जित(टाकाऊ)घटक आहेत.हे आपण प्राथमिक शिक्षण स्तरावर शिकतो.गाय व म्हैस हे एकाच बोव्हाईन संवर्गात आहेत.शरीर रचना,चयापचय क्रिया, अन्नग्रहण,उत्पादनबाबत वशिंड,त्वचा प्रकारसारखे तुरळक फरक वगळता दोन्हींमध्ये बहुसाम्य आहे.भिन्न भौगोलिक रचनेनुसार खिलार, डांगी, लाल गंधार गाय व पंढरपुरी,नागपुरी,मुर्हा म्हैस,हे उपप्रकार गुणात्मक फरकाने आहेत.तुलनात्मक अभ्यास करता गायीच्या दुधापेक्षा म्हैस दूध पौष्टिक घटक,प्रथिने, स्निग्धांश व घनता यात सर्वोत्तम आहे.गो- पालनापेक्षा म्हैस पालन हे फक्त आशिया खंडात आहे.बहुधा जंगली वास्तव,उशिरा पाळीव स्वरूपात आल्याने वा उपद्रव मूल्यांक जास्त प्रमाणामुळे माणसाळणे उशिरा झाले म्हणून मिथके,दंतकथा यातून म्हैस वर्ग खलनायकी रूपात दिसतात.
गो-मूत्र उपयुक्तता ही प्राचीन 'चरक संहिता',मनुस्मृती ग्रंथात मांडलेली दिसते. गो-मुत्राचा वापर पंचगव्य,जीवामृत, आयुर्वेदिक उपचार,खत निर्मिती,पारंपारिक विधी,पारंपारिक शुद्धता यासाठी केला जातो.पण त्यावर आधुनिक विज्ञानानुसार निरीक्षण, तर्क,प्रयोग,अनुमान, प्रचिती याद्वारे चिकित्सा पुराव्यानिशी झालेली दिसत नाही.मात्र गो-मूत्र हे 'वाॅटर ऑफ लाइफ' व 'नेक्टर ऑफ गाॅड' म्हणजे अमृत समजण्यात येते. वैज्ञानिक परिभाषेत गो- मूत्र(गो-वर्गीय मूत्र) त्यातील घटकांचे प्रमाण: पाणी-९५ टक्के, युरिया- २.५ टक्के,क्षार,मिनरल इ.२.५ टक्के.मूत्रात नायट्रोजनचे प्रमाण जास्त व इतर सोडियम, सल्फर,मँगेनिज घटक असतात.ते खत निर्मितीस उपयुक्त व वनस्पती वाढीस योग्य पोषण पुरविणारे असतात.म्हशीच्या मूत्रातही सर्व घटक व प्रमाण जवळजवळ सारखेच आहेत;पण त्याला पारंपारिक धारणेची मान्यता नसल्यामुळे त्याची महती वर्णन करण्यास कोणी रक्षक,संघ इत्यादी यंत्रणा नाही.
भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या बरेली केंद्रातील डाॅ.भोजराज सिंग यांच्या सहकार्यांनी जून २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विविध ७३ प्रकारचे गाय,म्हैस,मानव यांचे ताजे मूत्र नमुने घेऊन त्याचे योग्य तपासण्यांद्वारे तुलनात्मक विज्ञाननिष्ठ अभ्यासाचा निष्कर्ष जाहीर केला आहे तो असा-गायीच्या मूत्रात ( गो-मूत्र) १४ प्रकारचे शरीराला घातक असणारे जीवाणू(बॅक्टेरिया) आहेत.गो-मूत्रात म्हशीच्या मूत्रापेक्षा कमी जंतुनाशक क्षमता आहे. म्हैस मूत्र हे गो-मूत्रापेक्षा अधिक जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.गो- मूत्र प्राशन मानवी आरोग्यास धोकादायक आहे.
विज्ञाननिष्ठ संशोधनानुसार,गो-मूत्रात घातक जीवाणू आढळले असून ते प्राशन करणे आरोग्यास अपायकारक आहे हे स्पष्ट झालेले असतानाही परंपरागत समजुतीमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन खुंटला असून भारतात व विदेशात वैज्ञानिक शब्द वापरून व काही प्रमाणात स्वअनुभूती दाखले देत प्रचंड मोठ्या प्रमाणात गो-मूत्र विकले जाते. कारण त्याचा असाध्य, दुर्धर आजार,कॅन्सर, संधिवात,विषाणू संसर्ग( कोरोनासारखे),श्वासाचे आजार,मेंदूचे आजार, यावर हमखास उपयोग होतो असे सांगून " लिबिडो सिंड्रोम" किंवा स्वयंसूचना स्वीकारल्यामुळे तात्पुरते समाधान मिळते;पण आजार बळावत जातो. जो पदार्थ टाकाऊ म्हणून शरीराबाहेर टाकला जातो,तो पुन्हा शरीरात रोग उपचारासाठी घेणे हे फक्त 'जुने ते सोनं ' मानून तर्कबुद्धी न वापरता दुष्परिणामांकडे डोळेझाक करून आत्मविचारांना तिलांजली ठरेल.संत तुकाराम म्हणतात तसे 'भेदाभेद भ्रम अमंगळ' सर्वच मूत्र हे घातक आहेत,हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.आता अवैज्ञानिक,अनिष्ट,द्रव (गो-मूत्र)प्राशन करणे टाळाणे क्रमप्राप्त ठरते. 'अंनिस'चे कार्यकर्ता डाॅ.दीपक माने यांनी आपल्या लेखातून गो-मूत्र संदर्भातील समज-गैरसमज व वास्तव यावर टाकलेला हा अभ्यासपूर्ण प्रकाशझोत व केलेले विवेचन-विश्लेषण खरोखरच उल्लेखनीय, विचारप्रवर्तक, संबंधित जबाबदार घटकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरते हे मात्र तितकेच खरे!———————पत्रकार अरूण दीक्षित.
१७/५/२०२५.
(८१६०१०५९४०/९४२२६९४६६६)
0 टिप्पण्या