🟦 विस्मरण की दुर्लक्ष्य
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 29/5/2025 : भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सलग 16- 17 वर्षे पंतप्रधान म्हणून या देशात कामगिरी केली आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून त्यांच्या अंतिम दिवसांपर्यंत त्यांनी देशाची सेवा नक्कीच केली आहे. नेहरूंचे तत्त्वज्ञान, पक्ष कार्य याबद्दल कोणी सहमत नसेल पण पहिले पंतप्रधान म्हणून त्यांची लोकप्रियता ही कोणीही नाकारू शकत नाही.
आज हे लिहिण्याचे कारण म्हणजे 27 मे ही पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी होती. आज काँग्रेस पक्ष व त्यांचे नेते हे गांधी नेहरूंचा वारसा सांगून सतत मते मागत असतात म्हणून हे लिहावे लागत आहे. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी पुण्यतिथी साजरी केली असेल असे मला वाटत नाही. अजूनही देशात प्रत्येक गावात काँग्रेस पक्ष व काँग्रेस कार्यालय अस्तित्वात आहे. देशातील अनेक राज्यात काँग्रेस व त्यांचे सहयोगी पक्ष यांचे राज्य आहे.
पहिलवानांचे आंदोलन असो अगर शाहीन बागेतील देशद्रोही धरणे असो. प्रियंका वाढ्रा, राहुल गांधी पळत जातात व आपली भाषणे करतात.
काँग्रेसचाच एक भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देशातील कोणत्याही घटनेबद्दल आपले मत ट्विट करून अगर मीडियासमोर व्यक्त करत असतात.
27 मे ला मी मुद्दाम म्हणून अनेक वृत्तवाहिन्यावर बातम्या अगर चर्चा ऐकल्या नेहरुचे नाव चर्चेत देखील नव्हते. नेहरुंच्या समाधीच्या दर्शनाला कोणीही काँग्रेसवाला, काँग्रेसच्या नेता अगर नेहरू गांधी वारसा सांगणाऱ्या कोणत्याही पुरोगामी नेता गेल्याचे पाहण्यात आले नाही. नेहरू पुण्यतिथीनिमित्त कोणीही काही कार्यक्रम ,शोभायात्रा, भाषणे, परिसंवाद आयोजित केले असे दिसून आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे मी समजू शकतो ते यशवंतराव चव्हाण यांना विसरलेले आहेत तर नेहरूंना काय लक्षात ठेवणार?
सुमारे दीडशे वर्षे वयाचा हा पक्ष. यामध्ये लोकमान्य टिळकांच्या पासून लालबहादूर शास्त्री पर्यंत अनेक महामानवानी आपले योगदान दिले, देशसेवा केली. यांच्या पक्षास जनाधार मिळवून दिला. या सर्वांना ही काँग्रेस पक्ष ,नेते विसरले आहेत.
त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी मोदी दिसत आहेत. रात्रंदिवस त्यांना मोदीच आठवत आहेत. ते विसरून गेले आहेत आपल्या पक्षाला भव्य परंपरा होती व अनेक महान नेते आपल्या पक्षात होऊन गेले. पण या सर्वांचे विस्मरण करणे हेच यांच्या नेत्याचे काम होऊन राहिले आहे. त्यांना आता राहुल गांधी यांच्याशिवाय अन्य तारणारा दिसत नाही. आपल्या परंपरा व आपली पूर्वज यांना जो विसरतो तो नष्ट होण्यास सुरू होतो.
मी जरी अन्य विचारसरणीचा असलो तरी माझे बालपण नेहरूंच्या कथा बातम्या ऐकण्यात गेले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर त्यांच्या विरोधकात सुद्धा कधी कमी होणार नाही. पण मोदींचे नाव पुसण्याच्या प्रयत्नात हे आपल्या नेत्यांचे नाव पुसत आहेत. मोदी विरोधाचे डोळ्यावर झापड बांधल्याने त्यांना आपला पक्ष, त्याचा पूर्वीच्या इतिहास, त्यातील दिग्गज नेते, त्यांचा त्याग हे सर्व विसरलेले आहेत याचेच वाईट वाटत आहे. आज जे आपल्याच नेत्यांना विसरत आहे तो देशाची परंपरा काय लक्षात ठेवणार.
हे विस्मरण नसून अहंकारापोटी करण्यात आलेले दुर्लक्ष असावे असे मला मनोमन वाटत आहे. मोदी अडवाणीना विसरले, मुरली मनोहर जोशींना विसरले म्हणून रात्रंदिवस ही नेते मंडळी कंठेशोष करत असतात पण आपण पंडितजीना विसरलो आहोत हे विसरून जातात.
ॲड. अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी

0 टिप्पण्या