एक सत्यकथा...........
कालबेलिया नृत्यांगना गुलाबो
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/05/2025 : मुलगी झाली म्हणून जन्मानंतर तिला पुरलं. काही वर्षानंतर ती मोठी झाली. आणि तिने तिच्या परिवाराचं नाव 'रोशन' केलं.फिल्मी वाटणारी ही सत्यकथा आहे राजस्थानमधील पुष्कर गावातील. वडील गारुडी असलेल्या एका गरीब परिवारात धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी एक मुलगी जन्माला आली. वडील घरी नव्हते. आधीच तीन मुली झालेल्या. ही चौथी होती. समाजात अमान्य होती म्हणून तिच्या घरी कोणतीही कल्पना न देता आयांनी तासाभरातच त्या नवजात पोरीला जवळच्या जंगलात जीवंत गाडलं..! आई शुद्धीवर आली. मृत पोरीला एकवेळ स्पर्श तरी करू द्या म्हणून टाहो फोडला. शेवटी ती आणि तिच्या बहिणीने ५ तासानंतर जेंव्हा गड्डा उकरला तेव्हा ती पोरगी चक्क जीवंत होती..! वडिलांनी मुलीला जवळ केलं म्हणून समाजाने त्यांच्या परिवाराशी संबंध तोडले. त्यांच्या मते मातीत गाडलेली मुलगी जिवंत असूच शकत नाही. ती चुडेल आहे. वडिलांनी मात्र खंबीर भूमिका घेतली. धरतीतून धरतीमाताच निघू शकते, असं म्हटलं खरं पण आपल्या मुलीला कोणी मारू शकतं या भीतीने ते सापांसोबत पोरीलाही सोबत नेऊ लागले.
दोन वर्षाची ही बालिका सापाच्या बीनवर नृत्य करू लागली. तिला स्टेजवर नाचताना पाहून समाजाने बहिष्कृत करण्याची धमकी दिली. नाईलाजाने सहा वर्ष वयात तिचा ३५ वर्षांच्या गृहस्थाशी विवाह ठरवण्यात आला. पण मुलगी दिवसभर नृत्य करते पाहून वराने लग्न मोडलं आणि इकडे समाजाने तिच्या परिवाराला टाकलं! जे होतं ते भल्यासाठीच, हळूहळू मुलगी मोठी झाली तशी कालबेलिया नृत्यात निपुण झाली. तिच्या नृत्यकलेकडे पाहून तिला देश विदेशात नृत्यप्रदर्शनच्या संधी मिळू लागल्या. एवढंच नव्हे तर तिला काही चित्रपटात काम मिळालं. ती 'बिग बॉस ५' या कार्यक्रमात देखील सहभागी झाली होती.
कालबेलिया नृत्य हे राजस्थानमधील गारुडी (सपेरा) जमातीचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. हे नृत्य केवळ स्त्रिया करतात, पुरुष इकतारा किंवा तंदूरा घेऊन नृत्यांगनांना साथ देतात. वर्ष २००० मध्ये युनेस्कोने या नृत्याला अमूर्त सांस्कृतिक विरासतचे प्रतिनिधी सुचित सहभागी केलंय. या नृत्यावर एक डाक तिकीट देखील निघालंय!
कालबेलिया नृत्यांगना गुलाबोने राजस्थानच्या ग्रामीण भागात विनामूल्य शिक्षण, नृत्यशाळा सुरु केली आहे. डेन्मार्कमध्ये देखील तिने नृत्यशाळा सुरु केली आहे. राजस्थान लोककलेच्या प्रचारासाठी तिने जवळपास १६५ देशांची यात्रा केली आहे. तिच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. कला आणि संस्कृती क्षेत्रातील तिच्या अतुलनीय योगदानासाठी वर्ष २०१६ मध्ये गुलाबोला पद्मश्रीने तर वर्ष २०२१ मध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी अयोध्येला रामलला प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी पीएम व इतर मान्यवरांसमोर गुलाबोला तिचं नृत्य सादर करायची संधी मिळाली!
जे वडील तिच्यासाठी, तिच्यातील कलेसाठी समाजाच्या विरोधात गेले, दुर्दैवाने तिच्या पहिल्याच विदेशी यात्रेच्या पहिले त्यांचं देहावसान झालं! पण वडिलांनी तिच्यासाठी पाहिलेलं स्वप्न तिने पूर्ण केलं!
ज्या समाजाने तिला व तिच्या परिवाराला अत्यंत हलाखीचे दिवस दाखवले, त्याच समाजाची ती भूषण झाली. देशाची गौरव झाली! आज तिच्या समाजात मुलींना मारत नाही तर मुलीच्या जन्मानंतर आमच्या घरी 'गुलाबो आली' म्हणतात! किती हे जबरदस्त परिवर्तन !!
राजस्थानी कालबेलिया लोककलेला देशविदेशात मानाचं स्थान मिळवून दिलेल्या गुलाबोचं मनःपूर्वक अभिनंदन. पण त्याहीपेक्षा अभिनंदनास आणि कौतुकास जास्त पात्र आहेत ते तिचे आईवडील..!! आईने जीवनदान दिलं आणि वडिलांनी तिच्यात खऱ्या अर्थाने जीव ओतला!! .. निःशब्द आणि नतमस्तक आहे मी त्याच्यापुढे!! __/\__
लेखिका- आसावरी इंगळे ©®
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.


0 टिप्पण्या