🟩 जुने जाऊ द्या मरणालागुनी

मन इंद्रधनू

🟩 जुने जाऊ द्या मरणालागुनी 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 06/05/2025 :

महाविद्यालयीन काळात देवदास बघितला होता. जुना देवदास बर का.. त्यावेळी शाहरुखचा देवदास आलेला नव्हता. प्रेमभंग झाला म्हणजे सगळंच संपलं.. आयुष्य संपलं ..असं मानणारी एक पिढी किंवा एक जमात त्या काळात निर्माण झाली होती. असो.

If an egg is broken by an outside force, life ends.

If it is broken by an inside force, life begins.

Great things always begin from within.

अंड फुटून गेलं म्हणजे ते संपलं नाही.. त्यातून पुन्हा एका नवीन जीवनाचा प्रारंभ झाला..!! (अर्थात ते बाहेरून फोडलं की आतून फुटलं त्याला महत्त्व आहे.)

खरंतर हे मी परवा म्हणजे दोन दिवसापूर्वीच माझ्या लेखात लिहिलं होतं. अर्थात आत्ताचा विषय वेगळा आहे. पण त्याच मुद्द्यावरून तो सुरू झाला आहे एवढेच.

अंतः अस्ति प्रारंभ: याचाच अर्थ  "शेवट म्हणजेच सुरुवात"

आपल्या या जगात कधीच काहीही संपूर्णपणे "संपत" नाही. *ज्या क्षणी आपल्या साठी अनेक दरवाजे बंद होतात, त्या क्षणी कुठेतरी अजून एखादा दरवाजा आपल्या साठी उघडला गेलेला असतो.*

एक क्षण संपतो, तेव्हा दुसऱ्याचा आरंभ होतो.‌ जर एक नातं तुटलं, तर अजून  एक नवीन नातं जुळून येतं. शिशिर ऋतू मध्ये झाडांची पान गळती होते तर वसंत ऋतु मध्ये पुन्हा त्यांना नवी पालवी फुटते. नवी फुलं बहरायला सुरुवात होते. वहीतील एखादं पान फाटलं गेलं तरच त्याखालचं कोरं पान उघडलं जातं.

आणि म्हणूनच *अंतः अस्ति प्रारंभ: !   

अंतातच प्रारंभ लपलेला असतो. असे म्हटले गेले आहे.

आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट संपली की आता सर्वकाही संपलं. आपल्या जीवनात सर्वत्र अंधार पसरला आहे आणि आता पुढे काहीच उरलेले नाही. अगदी "डेड एंड" झाल्यासारखं वाटतं..!!!

पण नीट विचार केलात तर कळेल की "शेवट हाच आपल्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर असा थांबा आहे." आपल्याला आयुष्यातील पुढल्या प्रवासाच्या दिशेने एक वेगळे वळण देणारा.., म्हणजे "टर्निंग पॉईंट"....!! मला वाटतं की अशी एक स्टेज प्रत्येकाच्या जीवनात येत असते. आपण ती अनुभवत असतो.

जशी सकाळ सुंदर असते तशीच संध्याकाळ देखील रम्य व सौंदर्यपूर्ण असते. आपल्या दुनियेत उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे. पण आपण हे लक्षात घेत नाही की "प्रत्येक संध्याकाळ ही दुसऱ्या दिवशी येणाऱ्या उगवत्या सूर्याची तयारी करत असते." नुकतंच गळालेलं फूल जमिनीला सुगंध देऊन जातं आणि त्याच फुलाच्या ठिकाणी झाडाच्या फांदीवर नवीन पालवी फुटते.

आपल्याबाबतीत आपण जेवढा जास्त विचार करु तेवढे आपल्या मनातील अंतरंग अधिकाधिक स्पष्ट होऊ लागतात. तेव्हाच आपल्या असं लक्षात येतं की 'शेवट' या शब्दाला आपण घाबरत असतो... कारण तो आपल्याला हवं असणारं असं काहीतरी आपल्यापासून हिरावून नेतो. "The End is the Beginning" हे केवळ एक तत्त्वज्ञान नाही, तर ती जगण्याची दिशा आहे. 

अशावेळी कवी केशवसुत यांची "तुतारी" कविता आठवते आणि त्यातील या ओळी जास्त भावतात.

"जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका सडत न एक्या ठायी ठाका सावध ! ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवुनी"

हे जीवनच चक्राकार आहे . 

"संपणं" आणि "सुरूवात" यामध्ये असणारी सीमारेषा ही अस्पष्ट असते... पटकन ओळखता येत नाही अशी...!!कधी कधी आपण स्वतःसुद्धा ओळखत नाही, की आपण मागचे जुने काही सोडून नवीन काहीतरी स्वीकारत आहोत.

"कवी केशवसुत" यांनी लिहिलेल्या या ओळी म्हणूनच आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.

प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामे त्यावरती नोंदा बसुनी का वाढविता मेदा ? विक्रम काही करा, चला तर

फोटो सौजन्य गुगल 

राजश्री (पूजा) शिरोडकर 

एम ए मानसशास्त्र 

कोल्हापूर

           संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या