🔰 औरंग्याला लंगडा करणारा सातारी पाऊस

 🔰 औरंग्याला लंगडा करणारा सातारी पाऊस 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 29/5/2025 :

यंदा मे महिन्यात झालेल्या प्रचंड पावसाचं कवित्व पाऊस ओसराला तरी सुरु आहे. गेल्या कशंभर वर्षांतलं रेकॉर्ड खंगाळून काढलं जातंय. मुळात सातारा प्रांतातला पाऊस हा असाच धडामधूम आहे, याचा भक्कम पुरावा की, साऱ्या हिंदुस्थानचा आलमगीर व्हायला निघालेल्या औरंगजेबाला या मराठी मातीनं गिळलं तसं त्याच्या आयुष्यातला अवघड अपघात इथंच झाला आणि याच सातारा प्रांतातील पावसाने औरंगजेबाला आयुष्यभरासाठी लंगडं बनवलं.

यंदाच्या पावसाने अनेकांना रोमँटिक बनवलं, कोणाला कविता सुचल्या, कोण भजी तळू लागलं, कोण वर्षानुवर्षे आधीच रेकॉर्ड शोधू लागलं...... सारेच आपापल्या ठिकाणी योग्य.

पण पावसाचा इतिहास धुंडाळताना आम्हाला औरंग्याला लंगडं बनवल्याची पानं आठवली. 

छत्रपती शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान आणि शाहूराजांची कैद..... असा तो काळ.

स्वराज संपवायला आलेल्या औरंगजेब मिरजेतील मुक्काम संपवून अंजिक्यतारा जिंकण्यासाठी निघाला. वाटेतले दुर्ग जिंकत त्यानं सज्जनगड आणि अजिंक्यतारा सुद्धा घेतला. त्यासाठी त्याला अनपेक्षितपणे आख्खा हिवाळा आणि पावसाळा याच भागात घालवावा लागला. 

प्रतापगड ( आत्ताचा महाबळेश्वर परिसर ) या भागातला प्रचंड पाऊस. या परिसरातील बहुतेक दुर्ग घेऊन औरंगजेब परतीला निघाला. 

आत्ताच्या सातारा जिल्ह्याचे दोन भाग पाहू. महामार्गाच्या पश्चिम भाग अतीपावसाळी आणि पूर्व भाग तूरळक पावसाचा. 

हो, पण या पश्चिम भागात परतीचा पाऊस मुबलक असतो. पश्चिम भाग ओसरतो तेंव्हा पूर्वेला भरतं येतं.

आता आत्ताच्या माझ्या मित्रांनी सातारा आणि सोलापूर असा वाद उभा करू नये. कारण घडलं ते आत्ताच्या सांगोला तालुक्यातील "खवासपूर" या ठिकाणी असं इतिहास सांगतो.

पण

मला आत्ताच्या तालुका - जिल्हा या सीमेमध्ये बांधू नये. माझं म्हणणं हे "माणदेश" आणि मराठी मुलुख असा आहे.

तर 

1700 साली तेच झालं. औरंगजेब परतीला जाताना. आत्ताच्या माणदेश हा माणगंगा, येरळा अश्या नद्यांचा परिसर.  पावसाळा होऊन गेला तरी या नद्यांना जेमतेम पाणी होतं. अश्या नैसर्गिक परिस्थिती औरंगजेबाचा नदीकडेला मुक्काम पडला. 

रात्रीत अचानक आसामंत ढगांनी भरून आलं, विजा कडाडून पाऊसाचं थैमान माजलं. उथळ आणि पसरट पात्र असलेल्या नद्यांना अचानक पूर आला. पाहता पाहता महापूरात त्याचं रूपांतर झालं.... मोघल सैन्याची त्रेधा उडाली.....

हे आस्मानी संकट गाठून मराठा सैन्याचा हल्ला होणारच हे जाणून मोघली सैन्यासह औरंगजेबाची जीव मुठीत धरून धावपळ झाली आणि याच धावपळीत औरंग्याचा पाय मुरगळला ( मोडला ). 

पुढं पूर ओसरला आणि औरंगजेब पालखीत बसून निघून गेला. पण त्याची आयुष्यभराची चाल ही लंगडी झाली.

शेवटी तो क्रूर औरंग्याच.

पाय मोडल्याची आठवण सुद्धा तो उर बडवून सांगत राहिला. लंगडायला लागलेला औरंगजेबाला आता "तैमूरलंग" आठवू लागला. आपण त्या लंगड्या तैमूरलंगचा वंशज असल्याचे तो आठवून आठवून सांगू लागला.

अखंड हिंदुस्थान जिंकू पाहणाऱ्या औरंग्या याच मराठी मातीत गाडला गेला तसाच याच आमच्या प्रांतातील पावसानं त्याला आयुष्यभरासाठी लंगडं केलं होतं......! गेल्या शंभर वर्षातील पावसाचं रेकॉर्ड शोधण्यापेक्षा बरोब्बर 325 वर्षांपूर्वीचा हा पुरावा इतिहासातील पानांमध्ये ठळकपणे नोंद आहे.

आम्ही आपलं,

पावसांत सुद्धा मराठा इतिहास धुंडाळणारे. 

- दीपक प्रभावळकर, सातारा 

- 9325403232

- 9527403232

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या