माय उंबर्‍याला बसे !!

 कविता विश्व..............

माय उंबर्‍याला बसे !!  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. (केदारनाथ येथून)

मुंबई दिनांक 16/05/2025 :


उंबर्‍याशी विसावलं

आता कसलीही नाही घाई ..

वय दाराशी अडकलं

हे म्हातारपण द्वाड बाई।१। 


घर खाया उठलेलं

सारं कसं चिडीचूप ..

दिसागणीक वाढते

लेकरांची याद खूप।२। 


भरलेला होता वाडा

ओसरीला आला-गेला ..

पायताणांचा राबता

सडा पडे गर्द ओला।३।


लेकरांनी माजघर

तिथं कालवा केवढा .. 

रडे हट्ट हाणामारी

शांत रातीस तेवढा।४। 


पाखरा इवं सारी पोरे

शिकूनियां दूर गेली ..

विसरोनी गांव खेडी

शहराची वासी झाली।५। 


धनी काळवासी झाले

आतां कोठला दरारा ..

म्हातारीच्या डोईवर

उभा रीता हा पसारा।६। 


फक्त उन्हाळ्याची सुट्टी

घालविण्या पोरे येती ..

म्हातारीच्या सोबतीला

फक्त मोकळ्याच राती।७। 


रस्त्यावर वाटसरूं

येतां जातां ख्याल पुसें ..

अवचित बोला साठीं

माय उंबर्‍याला बसे।८। 

माय उंबर्‍याला बसे !!


(छायाचित्रातील माईला वंदन 🙏)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या