एक धागा सुखाचा

मन इंद्रधनू 

एक धागा सुखाचा 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 05/05/2025 :

सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम्। 

एतद् विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः॥

अर्थात जे जे दुसऱ्यावर अवलंबून असतं ते ते सर्व दुःख (देणारं) आणि जे जे आपल्या स्वतःच्या आधीन असते ते ते सर्व सुख (देणारं). असं सुख आणि दुःख यांचं थोडक्यात लक्षण समजावं.

तर नमस्कार मंडळी, सकाळी फेसबुक उघडलं आणि हे संस्कृत सुभाषित अर्थासह माझ्या वाचनात आलं. "एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे , जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे" हे गाणं चटकन मनात डोकावून गेलं. खरंच आहे हे... आयुष्यात सुख कमी सुख आणि दुःख जास्त असंच घडत असतं.

अतीव आनंदाने आता दोन मिनिटांपूर्वी असं हसावं  आणि क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं असं देखील घडतं. कधी कधी मनाला फक्त दुःखाबद्दलच विचार करण्याची सवय लागते. आपण स्वतःला सतत दुःखी समजायला लागतो आणि एक प्रकारचा न्यूनगंड मनात येऊन सर्वत्र वावरायला लागतो. त्यामुळे बऱ्याचदा नैराश्याच्या काळोखात  स्वतःला ढकलून देतो. त्यामुळे आपलं मन डळमळीत होतं, अस्थिर होतं आणि शरिराचे सगळे अवयव ठीकठाक असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं, तेव्हा त्या माणसाला या जगातील‌ कुठलीच सर्जरी वाचवू शकत नाही.

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधी ही कायमस्वरूपी नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. म्हणून जीवन कधी तणावपूर्ण करू नये.  हसण्यासाठी नेहमी थोडा वेळ काढायला हवा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही,परंतु वर्षांतील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल.

सुख पहाता जवापाडे | दुःख पर्वता एवढे ।।

असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. "सुख बिंदुएवढे व दुःख सिंधूएवढे" असा भयंकर विपरीत प्रकार जगात सर्वत्रच आढळतो. जर मानव जातीचा इतिहास अभ्यासला तर असे दिसून येईल की, जगातील माणसे सर्वसामान्यपणे  सतत दुःखाचेच चिंतन करीत असतात, आपली दुःखच एकमेकांना सांगत असतात (ज्याला आपण दुःख उगाळत बसणे असे म्हणतो) व दुःख निर्मितीसाठीच सदैव प्रयत्नशील असतात.  प्रत्यक्षात मात्र म्हणजे वरकरणी जगातील सर्व माणसे सुखासाठीच नित्य धडपडत असताना दिसतात. 

माणसाचा स्वभावच असा आहे की, त्याला जे कांही प्राप्त झालेले असते त्याच्याकडे दुर्लक्ष करणे व त्याला जे प्राप्त झालेले नाही त्यासंबंधी चिंता करीत बसणे. अप्राप्य गोष्टी प्राप्त होईपर्यंत तो सतत काळजी, चिंता, दुःख करीत असतो. गंमत म्हणजे अप्राप्य गोष्टी प्राप्त झाल्याने त्याला तात्कालिक समाधान प्राप्त होते; परंतु मनाच्या चंचल स्वभावामुळे ते समाधान चिरकाल टिकत नाही, परिणामी तो पुन्हा दुसऱ्या अप्राप्य गोष्टींच्या पाठीमागे पळत राहतो. 

थोडक्यात काय तर सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितले आहे त्या प्रमाणे हाव आणि धाव या कात्रीत माणूस सापडतो. माणसे आपले दुःख सदैव दुसऱ्यांना सांगत असतात. एकमेकांना भेटल्यावर  ती सामान्यपणे कोणाची स्तुती किंवा कौतुक अथवा गौरव करीत नाहीत. उलट इतरांबद्दल निंदा-नालस्ती, चेष्टा-कुचेष्टा करीत बसतात व इतरांच्या दोषांचे वारेमाप वर्णन करीत असतात. तसेच अधूनमधून इतरांना शिव्या शाप देणे सुद्धा चालूच असते. त्याचप्रमाणे प्रकृती बिघडलेली माणसे त्यांना भेटणाऱ्या सर्व लोकांना प्रकृती बिघडल्याचे रडगाणे सारखे सांगत सुटतात. मुले अभ्यास करीत नसतील तर ही माणसे त्यांना भेटणाऱ्या सर्व लोकांना 'मुले अभ्यास करीत नाहीत,' हे रडगाणे न चुकता सांगतात. थोडक्यात भोगायला लागलेल्या सर्व दुःखांची उजळणी ही माणसे आलेल्या गेलेल्या सर्व लोकांकडे नित्य करीत असतात. या सर्व प्रकारच्या बोलण्यातून ही सर्व माणसे कळत-नकळत दुःखाचे सातत्याने चिंतन करीत असतात व एकमेकांना दुःखाचेच इंजेक्शन देत असतात. 

माणसे सामान्यपणे दुःख निर्मितीसाठीच सदैव प्रयत्नशील असतात. याचे मुख्य कारण असे की, प्रत्येक माणूस स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करीत असताना इतरांचा विचारच करीत नाही. 'इतरांचे काय वाटेल ते होवो, आपण सुखी झालो म्हणजे झाले' असा विचार माणसे करतात व त्याला अनुसरून सुखी होण्याची धडपड करीत असतात. या प्रकारच्या अनिष्ट विचार पद्धतीतून संकटे निर्माण होतात. स्वत:लाच  सुखी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांतून माणसा-माणसामध्ये संघर्ष निर्माण होतो. आपले इच्छित ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी माणसे इतरांवर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार करू लागतात व त्यातूनच दंगेधोपे, युद्ध लढाया व रक्तपात होऊन अखिल मानव जात दुःखाच्या खाईत लोटली जाते. 

निसर्गाचा असा नियम आहे की, 'माणूस जे करतो तेच तो मागत असतो आणि माणूस जे मागतो तेच त्याला मिळत असते.' निसर्गाचा हा नियम अत्यंत महत्त्वाचा असून माणसांना जीवनात त्याचा प्रत्यय सुद्धां नेहमी येत असतो.

थोडक्यात विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही प्रकाराने माणसे दुःखालाच आमंत्रित करीत असतात, किंवा निसर्ग देवतेकडे दुःखच मागत असतात. "मागणी तसा पुरवठा" या नियमाप्रमाणे माणसाच्या वाट्याला दुःखच येत राहते.

"उदास होने के लिए सारी उम्र पडी है 

नजर उठाओ और देखो दोस्तों 

सामने जिंदगी खडी है"

राजश्री (पूजा) शिरोडकर 

एम ए मानसशास्त्र 

कोल्हापूर

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या