(भाग-8) आजचा कळीचा प्रश्नः जातीअंत की जाती पुरूज्जीवन?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 24/5/2025 :
(चेन्नई, तामीळनाडू येथे 1मे 22 रोजी संपन्न झालेल्या सामाजिक न्याय परीषदेत निमंत्रित वक्ते प्रा. श्रावण देवरे यांचे भाषण झाले. या भाषणावर आधारित प्रदिर्घ लेख आपण सात भागात वाचला. या प्रदिर्घ लेखातील काही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणे आवश्यक असल्याने लेखाचा हा अंतिम भाग आम्ही प्रकाशित करीत आहोत. -संपादक)
1. कांशिरामसाहेबांनी ब्राह्मण जातीशी व त्यांच्या संघ-भाजापाशी एकतर्फी दोस्ती केली. बहुजन समाज पक्षाचा मुख्य पाया ब्राह्मणविरोध हाच होता. परंतू मुलायमसिंग यांच्याशी दुरावा निर्माण होताच कांशीराम यांनी संघ-भाजपाशी एकतर्फी दोस्ती करून राज्य-सत्ता मिळविली. एकतर्फी दोस्ती म्हणजे लढाई सुरू असतांना अचानक यु-टर्न घेत तहाची भाषा करणे, म्हणजे पूर्णपणे लोटांगण घालीत शरणागती पत्करणे. अशा प्रकारच्या तहामध्ये शत्रूपक्ष अपमानास्पद अटी घालीत असतो व तुमचा मुख्य पायाच उखडण्याचा प्रयत्न करतो. संघ-भाजपाशी एकतर्फी दोस्ती केल्यानंतर कांशिरामसाहेबांनी बसपाचा मुख्य पाया असलेल्या मातृ-संघटन सॅडो बामसेफची बरखास्ती केली व बहुजनांचे ब्राह्मणवादविरोधी प्रबोधन करणारे ‘‘बहुजन संघटक’’ साप्ताहिक कायमचे बंद केले. कांशीरामसाहेबांनी एकतर्फी शरणागतीची पायाभरणी केल्यानंतर त्यावर कळस चढविण्याचे काम बहन मायावतींनी केले. मायावतींनी बाबासाहेबांच्या हत्तीला गणेश बनविले व बसपाला फुले-शाहू-आंबेडकरांपासून तोडून ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या गोठ्यात नेऊन ठेवले. ब्राह्मण जातीशी एकतर्फी दोस्ती करून मिश्रा नावाच्या ब्राह्मणाला बसपाच्या सर्वोच्च पदावर बसविले. या मिश्राने बसपातील बहुतेक सर्वच ओबीसी नेत्यांना पक्षाबाहेर काढले व त्यांना भाजपाचा रस्ता दाखविला.
2. कॉम्रेड शरद पाटील- कॉ. शरद पाटील हे मुळचे मार्क्सवादी! 1945 पासून कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी चळवळीत सामील झालेत. गोवा मुक्ती आंदोलनात तुरूंगवास व छळ सहन केला. 1962 साली विभाजित झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आलेत. नंदुरबार-धुळेच्या आदिवासी भागात पक्ष उभा करीत असतांना त्यांना आलेले अनुभव, त्यांचे निरिक्षण व त्यातून निघत असलेले निष्कर्ष त्यांना अस्वस्थ करीत होते. आपल्या मनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी संस्कृत, अर्धमागधी, पाली या भाषांवर प्रभुत्व मिळवित प्राच्याविद्या पारंगत झालेत. सिंधु संस्कृती, वैदिक वाङमय, बौद्ध-जैन-सांख्य तत्वज्ञान यांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना मार्क्सवादप्रणित जगाचा एकप्रवाही (शूद्ध वर्गवादी) विकास अपूरा वाटू लागला. जगात शासन-शोषणाची संस्था एकमेव ‘वर्ग’ नसून जात, वंश व लिंग अशा बहुप्रवाही संस्थाही आहेत, असा निष्कर्ष त्यांनी काढला. हे जगत्मान्य मार्क्सवादाला दिलेले फार मोठे आव्हान होते व आहे. भारतातील बहुतांश मार्क्सवादी नेते व विद्वान ब्राह्मण जातीतून आलेले असल्याने त्यांनी जातीव्यवस्थेचं अस्तित्व कधीच मान्य केले नाही. ‘‘जात म्हणजेच वर्ग व वर्ग म्हणजेच जात’’ असा ब्राह्मणवादाला सुरक्षित ठेवणारा सिद्धांत ब्राह्मण-मार्क्सवादी सोयिस्कररित्या मांडत असतात. कॉ. पाटलांनी अनेक बहुखंडी ग्रंथ व लेख लिहून ब्राह्मणी कम्युनिस्टांना निरूत्तर केले. कम्युनिस्ट पक्षात त्यांचा प्रचंड छळ झाला. शेवटी त्यांना 1978 साली पक्षातून बाहेर काढण्यात आले. परंतू त्या आधीच त्यांनी ‘’ सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची’’ स्थापना केली व जातीअंताचा लढा हाती घेतला. जातीअंताचा लढा जातीच्या पक्ष-संघटनांनी केला तर त्यातुन जातीव्यवस्था अधिक मजबूत होते, म्हणून जातीअंताचा लढा हा वर्गीय संघटनांनीच लढला पाहिजे, हा त्यांचा मुख्य सिद्धांत आहे. फुले-आंबेडकर व बौद्धवाद यांची मार्क्सवादाशी सांगड घालत त्यांनी ‘सौत्रान्तिक मार्क्सवाद’ हे नवे तत्वज्ञान मांडलेले आहे. प्राच्यविद्यापंडित (Indologist) म्हणून मान्यता पावलेल्या कॉ. शरद पाटलांनी भारताच्या दास-शूद्रांच्या गुलागिरीचा क्रांतिकारक इतिहास लिहीण्यासाठी अनेक खंडी ग्रंथ लिहिलेत.
3. कार्ल मार्क्स म्हणाले आहेत की ‘जगाचा इतिहास वर्गसंघर्षाचा आहे. म्हणजेच जगात शोषणाची एकमेव संस्था वर्ग आहे आणि त्याचा इतिहास एकप्रवाही आहे. पण हे खरे नाही. वर्गाव्यतिरिक्त, जात, वंश, रंग, लिंग देखील शोषणाच्या संस्था आहेत. तात्यासाहेब आणि कॉ. शरद पाटील यांनी जगाचा इतिहास बहुप्रवाही असल्याचे सिद्ध केले आहे. भारतीय कम्युनिस्ट मार्क्सच्या अंधभक्तीत लीन असल्याने ते वर्गवादी म्हणजे एकप्रवाही मार्क्सवादी आहेत. त्यामुळे जातीव्यवस्था ही शासन-शोषणाची वेगळी स्वतंत्र व्यवस्था आहे, असे ते मानित नाहीत. त्यामुळे ‘‘जाती म्हणजेच वर्ग व वर्ग म्हणजेच जाती’’ हा ब्राह्मणी छावणीला सुरक्षित ठेवणारा सिद्धांत ते मांडतात. या सिद्धांतामुळे वेगळा स्वतंत्र असा जातीविरोधी लढा करण्याची गरज नाही, असे ते मानतात. वर्ग लढ्यातून जाती आपोआप नष्ट होतील, या मार्क्सने सांगीतल्या मंत्राचा जप ते करीत असतात. भारतातील कम्युनिस्ट पक्षांचे संस्थापक व इतर मार्क्सवादी विचारवंत हे ब्राह्मण असल्याने भारतातील एकूण मार्क्सवादी तत्वज्ञानावर ब्राह्मणवादाचा प्रभाव आहे, त्यामुळे भारतीय मार्क्स जाणवेधारी असून त्याचा भारतीय मार्क्सवाद ‘ब्राह्मणीच’ आहे. ब्राह्मण मार्क्सवादी आपल्या स्वतःच्या ब्राह्मण्यावर मात न करू शकल्यामुळे जातीव्यवस्थेविरुद्ध लढण्याचे धाडस ते करू शकत नाहीत मार्क्सवादी पक्ष-संघटनेतील नॉन-ब्राह्मीण कॉम्रेड्स ब्राह्मणी मार्क्सवादाच्या प्रभावात असल्याने तेही जातीविरोधी लढा करु शकत नाहीत.
4. भारतातील बरेचसे सण-महोत्सव, रूढी-परंपरा व धारणा या कृषी संस्कृतिशी निगडीत आहेत. मातृसत्ताक व स्त्रीसत्ताक सिंधू संस्कृतीपासून आजतागायत हे सण-महोत्सव व रूढी परंपरा बहुजन समाजाने जतन करून ठेवलेले आहेत. आर्यांच्या आक्रमणानंतर व त्यांच्या घुसखोरीनंतर शांततामय सहअस्तित्वाच्या काळात त्यांनी एकतर्फी सांस्कृतिक आक्रमण सुरू ठेवले.ब्राह्मणांना मैदानी लढाईत पराभूत करणे जेवढे सोपे त्यापेक्षा जास्त कठीण त्यांची सांस्कृतिक लढाई समजून घेणे व त्याविरोधात लढणे. बहुजनांचे महापुरूष, बहुजनांचे सण-महोत्सव या सर्वांचे ब्राह्मणीकरण त्यांनी सुरू ठेवले. बहुजनांचे सण-उत्सव व रूढी-परंपरांमागील क्रांतिकारी विजयाचा इतिहास बदलुन त्यांनी त्याला बहुजनांच्या पराभवाचा इतिहास बनवला व तो बहुजनांच्या डोक्यात रूजवीला. आर्य-ब्राह्मणांच्या महापुरूषांना व देवी-देवतांना त्यांनी बहुजनांच्या माथ्यावर थोपविले.
भाद्रपद महिन्यात पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष नावाचा पंधरा दिवसांचा महोत्सव असतो. फार वर्षांपूर्वी आर्य-ब्राह्मणांच्या रानटी टोळ्या भारतात घुसखोरी करित होत्या व लुटमार करून पळून जात होत्या. त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी बळीराजाने आर्य-ब्राह्मणी टोळ्यांवदिरुद्ध युद्ध पुकारले. त्यावेळी आर्यांचा सेनापती वामन होता. भाद्रपदात पंधरा दिवस चाललेल्या या युद्धात बहुजनांचे अनेक सेनापती कामी आलेत, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी श्राद्धपक्ष साजरा करन्यात येतो. हे महायुद्ध बळीराजाने जिंकले. परंतु ब्राह्मणांनी पुराणांमध्ये लिहीतांना या इतिहासाचे विकृतिकरण केले. आर्य-वामनाच्या विरोधात बळीराजा लढलाच नाही. वामनाने बळीराजाला तीन पावलातच पाताळात गाडले असा पराभवाचा इतिहास पुरानात लिहून बहुजनांच्या पुढील सर्व पिढ्यांना पराभुत मानसिकतेत ढकलले. तामीळनाडू वगळता बाकी सर्व भारतातील बहुजन जनता आजही पराभुत मानसिकतेत जगत आहे. लढाई सुरू करण्याआधीच हा बहुजन आत्महत्त्या करून मोकळा होतो किंवा शरणगती पत्करून गुलाम होतो. ब्राह्मणी संस्कृतिच्या आक्रमणाचा हा एक ऐतिहासिक परिणाम आहे.
5. प्रत्येक समाजाची स्वतःची राज्यघटना असते. सरंजामशाही समाजव्यवस्थेचं नियमन करण्यासाठी मनुस्मृति नावाचे एक संविधान होते आणि हे संविधान ब्राह्मणांनी तयार केले होते. या राज्य-घटनेनुसार, राजा केवळ ब्राह्मण किंवा क्षत्रिय जातीतूनच होउ शकतो, असा कायदा होता. लोकशाहीमध्ये निवडणुकांद्वारे राजा निवडला जातो. परंतु आज, भारतात लोकशाही असूनही ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या हितासाठीच सत्ता राबविला जात आहे. आहे. कारण राजेशाही असो की लोकशाही, सत्ता लोकांकडून येत नाही तर, विचारांद्वारे सत्ता मिळते. कॉंग्रेसने गांधीवादाच्या नावाने ब्राह्मणवादासाठीच राज्य केले. आणि आज भाजप हिंदूत्वाच्या नावाने ब्राह्मणवादाचीच सत्ता आहे. गांधीवादाचा आदर्श ‘‘रामराज्य’’ होते व हिंदुत्ववादाचा आदर्श ‘रामच’’ आहे!
मात्र आधुनिक भारतात सामी पेरियार, लोहिया-चंदापूरी व कांशिराम या चार महान माणसांनी ब्राह्मणवादी राज्याला पर्याय देण्यासाठी प्रयत्न केला. या वैचारिक पर्यायामुळे, अल्पसंख्याक शूद्रादिअतिशूद्र जातीचे लोक सत्तेत आलेत आणि त्यांनी त्यांच्या शोषित समाजाच्या हितासाठी काम केले. चमार, नाई-सेन, परिट-धोबी सारख्या छोट्या आणि अल्पसंख्यांक जातीचे मुख्यमंत्री होऊ शकलेत.
(समाप्त)
वक्ते- प्रा. श्रावण देवरे,
नाशिक, महाराष्ट्र
संपर्क – 75 88 07 28 32
ईमेल- s.deore2012@gmail.com
0 टिप्पण्या