भाग-7) आजचा कळीचा प्रश्नः जातीअंत की जाती पुरूज्जीवन?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 24/5/2025 :
महाराष्ट्राला ‘अब्राह्मणी राष्ट्र’ बनविण्यात फुले अनुयायी कमी पडलेत, कारण ऐन मोक्याच्या वेळी ते गांधीवादाला भूलून कॉंग्रेसी ब्राह्मणवादाला शरण गेलेत. मात्र त्याचवेळेस 1925 ला सामी पेरियार ब्राह्मणी कॉंग्रेसला लाथ मारून बाहेर पडतात व ब्राह्मणी संस्कृतिच्या विरोधात युद्ध पुकारतात. परिणामी तामीळनाडू (मद्रास) प्रांत हा ‘अब्राह्मणी राष्ट्र’ बनतो. ब्राह्मणांचा पहिला व सर्वात शेवटचा अड्डा मंदिर असतो. या अड्ड्यातून ब्राह्मणांची कायदेशीर हकालपट्टी करणारे तामीळनाडू हे एकमेव राज्य आहे. एवढ्या एका पुराव्यावरून सिद्ध होते की, तामीळनाडू हे ‘अब्राह्मणी राष्ट्र’ आहे.
======================
(चेन्नई, तामीळनाडू येथे 1मे 22 रोजी संपन्न झालेल्या सामाजिक न्याय परीषदेत निमंत्रित वक्ते प्रा. श्रावण देवरे यांचे भाषण झाले. या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद लेखस्वरूपात देत आहोत. कार्यक्रमात वेळेचं बंधन असल्याने भाषण संक्षिप्तच करावे लागते. मात्र अनेक हिचिंतकांनी विनंती केली की, हे भाषण लेखस्वरूपात सविस्तर लिहावे. त्यांच्या विनंतीवरून हे भाषण विस्तारीत केले असून आपल्या वाचकांसाठी सादर करीत आहे. - भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, संस्थापक संपादक.)
======================
मात्र याचा अर्थ असा नाही की, तामीळनाडुमधील जातीव्यवस्था नष्ट झालेली आहे. भारतातील जातीव्यवस्था कायम ठेवून एकट्या तामीळनाडूमधून जातीव्यवस्था नष्ट करणे शक्य नाही. त्यासाठी तामीळनाडूच्या ओबीसी नेतृत्वाला देशपातळीवरच्या जातीअंताच्या लढ्याचे नेतृत्व करावे लागेल. तामीळनाडूच्या ओबीसी नेतृतवाला देशपातळीवरील पुढील कृतीकार्यक्रम ताबडतोब हाती घ्यावे लागतील.
1) उत्तरभारतात ब्राह्मणावादाने पुर्ण कब्जा केलेला असला तरी दक्षिणेकडच्या राज्यात अजुनही ‘अब्राह्मणवाद’ थोड्याफार प्रमाणात जीवंत आहे. त्याला पुर्ण ताकदीने उभे करण्यासाठी तामीळनाडूच्या ओबीसी नेतृत्वाखाली ‘‘सीता, शंबुक, एकलव्य, रावण व बळीराजा गौरवयात्रा’’ दक्षिणेकडील राज्यातून निघाली पाहिजे.
2) तामीलनाडूमधील सामी पेरियार यांच्या विचार-कार्यावर आधारित पुस्तकांचे भाषांतर देशातील सर्व भाषांमध्ये करून त्या-त्या राज्यांमध्ये पाठवीले पाहिजे.
3)आम्ही 27 वर्षांपासून ‘फुले आंबेडकर विद्यापीठ’ स्थापन करुन महाराष्ट्रात फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर परीक्षा आयोजित करीत आहोत. त्याच धरतीवर ‘‘सामी पेरीयार फुलेआंबेडकर विद्यापीठाची स्थापना’’ करून देशभरात विविध भाषांमध्ये राज्यस्तरीय परीक्षा आयोजित केल्यात तर तरूण पिढीला सामी पेरीयार यांचे विचार व कार्य माहीत होईल.
4) प्रत्येक राज्यात काही ओबीसी कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र विविध राजकीय पक्षातील ओबीसी नेते त्यांच्या कार्यात अडथळे आणीत असतात. अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तामीळनाडू सरकारने त्यांना गौरवान्वीत केले पाहिजे व त्यांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे.
5) प्रत्येक राज्यातील अशा प्रामणिक ओबीसी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देश पातळीवर ओबीसींच्या नेतृत्वाखाली नवा ‘अब्राह्मणी पक्ष’ स्थापन करता येईल.
6) हिंदी भाषेच्या अभावात तामीळनाडू देशापासून तुटलेला आहे. आता हिंदी भाषेचा सदुपयोग करीत तामीळनाडूने देशाशी जोडून घ्यावे व जातीअंतक अब्राह्मणी क्रांतीचे नेतृत्व करावे.
उपरोक्त कृतीकार्यक्रम ताबडतोबीने हाती घेऊन देशपातळीवरच्या जातीअंताच्या चळवळीचे नेतृत्व करावे व देशात खर्या अर्थाने समतावादी ‘बळीराष्ट्र’ स्थापण्याची मुहुर्तमेढ रोवावी. धन्यवाद!
वक्ते- प्रा. श्रावण देवरे,
नाशिक, महाराष्ट्र
संपर्क – 75 88 07 28 32
0 टिप्पण्या