"ठीक आहे.. It's Okay"- जीवनाचा सकारात्मक मंत
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/04/2025 : जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असे नाही. प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागेल असे नाही. ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होते, त्यावेळी आपलं मन नाराज होतं. "मी सर्वांच्या भल्याचा विचार करत असताना, माझ्याबाबतीतच असं का झालं?" असा प्रश्न आपल्याला पडतो. एखाद्या परीक्षेत अपयश आलं, की नैराश्य येतं. परंतु ज्यावेळी आपण आलेल्या परिस्थितीला स्वीकारतो, "जे झालं त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होणार असेल" असा विचार करतो, त्यावेळी आपल्या मनावरचा ताण कमी होत असतो. याकरता एक मंत्र तुम्हाला मी देणार आहे. तो मंत्र आहे- "ठीक आहे- इट्स ओके It's okay"
परिस्थितीचा स्वीकार करा
आता तुम्ही म्हणाल की परिस्थितीचा स्वीकार करायचा म्हणजे नक्की काय करायचं? परिस्थिती स्वीकारणे म्हणजे स्वतःला सांगणे की "जे घडलं आहे, ते ठीक आहे. मला यातून काहीतरी शिकण्याची आणि पुढे जाण्याची गरज आहे". उदाहरणार्थ- तुमची अपेक्षित बस किंवा ट्रेन चुकली, तर तुम्ही स्वतःला, ट्रॅफिकला किंवा घरातील मंडळींना तुम्हाला वेळेवर न पोहोचवल्याबद्दल दोष देता. त्याऐवजी, स्वतःला सांगा की "माझी बस किंवा ट्रेन अजून यायची आहे, पुढची गाडी माझी आहे. आत्ता गेलेली गाडी माझी नव्हती" ज्यावेळी तुम्ही असा विचार कराल, त्यावेळी तुमच्या मनावरचे दडपण कमी होईल, तुमचा ताण कमी होईल. तुमचे मन शांत होईल आणि पुढचा चांगला विचार करू लागेल.
🔸जोडीदाराशी मतभेद झाल्यास
कधी कधी आपले व आपल्या जोडीदाराचे काही विषयांवर एकमत होत नाही. अशावेळी आत्तापर्यंत आपण चिडचिड करत बसायचो, "तुला कसं सांगू? तुला समजत नाही का?" असं म्हणून त्रागा करायचो. परंतु आता तुम्हाला एक मंत्र मिळाला आहे "ठीक आहे- इट्स ओके". जेव्हा तुम्ही "ठीक आहे" असे म्हणता याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मतांचा आदर करता. तुम्ही स्वतःला सांगता की "त्याचेही/तिचेही मत योग्य आहे. कदाचित आत्तापर्यंत मला हे माहित नव्हते. आज मला एक नवीन दृष्टिकोन मिळालेला आहे, त्याबद्दल धन्यवाद". ज्यावेळी तुम्ही असा विचार करता, त्यावेळी तुमच्यातील संवादाला सकारात्मक वळण मिळते आणि तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतात.
मुलांशी संवाद
काही वेळेला आपण आपल्या मुलाला काहीतरी काम सांगतो. अशावेळी आपल्या मुलाने आपले काम ऐकले नाही, तर आपल्याला त्याचा राग येतो व आपण त्याला काहीतरी बोलतो किंवा त्याला मारतो. यातून आपल्या मुलाशी आपले नातेसंबंध दुरावण्याची शक्यता असते. जर तुम्ही तुमच्या मुलाला काम सांगितले व त्याने ते ऐकले नाही तर, अशावेळी "ठीक आहे- इट्स ओके"असे म्हणून त्याला समजून घ्या. तो अभ्यास करत असेल, म्हणून तुमचे काम नाही म्हणाला असेल किंवा इतर कोणत्यातरी महत्त्वाच्या कामात तो व्यस्त असेल, म्हणून त्याने तुमचे काम करणे टाळले असेल, अशावेळी "ठीक आहे, तू तुझे काम कर. मी ते काम करून येतो" असे म्हटल्याबरोबर तुमच्या मनातील राग निघून जातो. तुम्ही मुलाला समजून घेतल्याने मुलाला देखील चांगले वाटते, "माझे आई वडील माझी किती काळजी घेत असतात, ते मला समजून घेतात" अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते व भविष्यात तो तुमचं काम करायला नकार देत नाही.
🔸शेतकऱ्याचा विचार
काबाडकष्ट करून, मेहनत करून चांगले पीक आलेले असते. परंतु अवकाळी पावसामुळे ते पीक नष्ट होते, शेतकऱ्याचे खूप नुकसान होते. अशावेळी "किती कष्ट करून मी पीक उभारले होते, माझ्याच नशिबी असे का आले?" असे म्हणून परिस्थितीला दोष देण्याऐवजी शेतकऱ्याने सकारात्मक विचार केला, तर लवकरच या दुःखातून तो बाहेर पडू शकतो. "काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसेच नैसर्गिक आपत्ती देखील माझ्या हातात नाही. ठीक आहे.. आता मला आहे या परिस्थितीचा स्वीकार करावाच लागेल"असे म्हणून शेतकऱ्याने सकारात्मक दृष्टीने विचार केला, तर त्याला पुढील मार्ग अवलंबता येतो. "ठीक आहे.. पुढील वेळी मी जास्त मेहनत घेईन व मला चांगले यश मिळेल" हे वाक्य शेतकऱ्याला नव्या उमेदीने उभे राह्यला मदत करते. हीच वृत्ती आपण आपल्या जीवनात देखील अंगीकारली पाहिजे.
विद्यार्थ्यासाठी उपयुक्त मंत्र
विद्यार्थ्याला एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर तो निराश होतो. मी एवढा अभ्यास करून देखील मला चांगले मार्क्स का मिळत नाहीत, असा विचार तो करतो. काही वेळेला स्वतःमध्ये काहीतरी कमी असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होते व त्याचा आत्मविश्वास कमी होतो. याच्या ऐवजी "ठीक आहे- आता मार्क्स कमी का मिळाले याचा मी शोध घेईन व पुढील वेळी चांगले मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करेन. कदाचित माझी अभ्यास करण्याची पद्धत चुकत असेल, तीही मी जाणून घेईन." असा विचार विद्यार्थ्यांने केला, तर त्याच्या मनात निराशा कधीच येणार नाही. तो स्वतःचे अवलोकन करू लागेल आणि त्याला "अभ्यास करण्याच्या काही शास्त्रीय पद्धती, लक्षात ठेवण्यासाठी काही तंत्रे किंवा अभ्यासा संबंधी इतर काही गोष्टी" त्याला शिकण्याची गरज आहे याचे ज्ञान त्याला होईल. ज्यावेळी आपण "ठीक आहे" असे म्हणतो, त्यावेळी आपण आलेल्या परिस्थितीला स्वीकारतो व त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो.
जीवनातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतो. नोकरीसाठी इंटरव्ह्यू मध्ये पास झालो नाही तर कमीत कमी हे तरी आपल्याला कळते की इंटरव्ह्यूमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याचा उपयोग आपल्याला अधिक चांगली तयारी करण्यासाठी होतो व आपला पुढील इंटरव्ह्यू चांगला जातो. त्यामुळे एखादे वेळी अपयश आले किंवा एखादी घटना आपल्या मनासारखी झाली नाही, तरी नाराज होऊ नका. "ठीक आहे- इट्स ओके"असे म्हणून सकारात्मक विचार करा, तुमचा दृष्टिकोन बदला.
❇️"ठीक आहे" -आशावादी दृष्टिकोनाचा पाया
"ठीक आहे" हे दोन शब्द, आपल्या मनाला मोठी ताकद देण्याचे काम करतात. ज्यावेळी कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत आपण "ठीक आहे" असं म्हणतो, त्यावेळी आपले मन शांत होत असते. यामुळे नव्या दृष्टिकोनाची दारे उघडली जातात व आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन जातो. त्यामुळे तुमच्या जीवनात कोणतीही अडचण आली की, स्वतःला सांगा "ठीक आहे.. यातून काहीतरी मार्ग निघेल. मी यातून शिकेन आणि पुढे जाईन".
तुम्हाला बाहेरचं खाण्याची सवय असते व तुम्हाला पित्ताचा त्रास होतो, त्यावेळी स्वतःला सांगा "ठीक आहे, आता मी बदलेन".
तुम्हाला नको असलेले काम तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला सोपवले, तर "ठीक आहे, मला यातून काहीतरी शिकायला मिळेल" असे म्हणून पुढे चला. असे केल्याने तुमची चिडचिड होणार नाही व तुमचा तुमच्या वरिष्ठांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील चुकीचा होणार नाही. याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील होईल.
जीवनातील प्रत्येक बदलाला सामोरे जा. तुमच्या बाबतीत जे काही घडत आहे, त्याचा स्वीकार करा. कोणत्याही प्रसंगात "ठीक आहे -इट्स ओके" असे म्हणून सकारात्मक दृष्टिकोन बाळगा.
"ठीक आहे- इट्स ओके, पुढे चला आणि यशस्वी व्हा"
0 टिप्पण्या