"सहकार महर्षि" कारखान्यामध्ये
कृत्रिम बुद्धीमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावरील ऊस शेती कार्यशाळा संपन्न
वृत्त एक सत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16/4/2025 :
शंकरनगर - अकलूज (ता.माळशिरस, जि.सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना मुख्य कार्यालयाच्या "उदय सभागृह" येथे आज दि.16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.00 वा. कृत्रिम बुद्धीमत्ता ए.आय. तंत्रज्ञानावरील ऊस शेती कार्यशाळेचे आयोजन केले होते. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यशाळा संपन्न झाली.
सुरवातीस कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सदर कार्यशाळेमध्ये ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर देशात सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे करण्यात आला असून सदर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सिझन 2024-25 मध्ये प्रती एकरी 30 ते 35% इतके उत्पादन वाढून मिळाले असून त्याचबरोबर 40% पर्यंत पाण्याची बचत होते. तसेच सदर तंत्रज्ञान वापरल्याने जमिनीचा ओलावा, सुर्यप्रकाश, वा-याचा वेग व दिशा, तापमान, पर्जन्यमान, कीड, रोग याची पुर्व कल्पना त्याच्या नियंत्रणाची माहिती, जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश यांचा समतोल राखण्यासाठी मार्गदर्शन व माहीती पुरविली जाते. त्यामुळे ऊस पिकास या गोष्टी समतोल प्रमाणात मिळून ऊस उत्पादन वाढीसाठी मदत होते असे सांगितले.
तसेच सदर तंत्रज्ञान घेण्यासाठी प्रति हेक्टर एका पिकासाठी रक्कम रु.25,000/- इतका खर्च येत असून त्यासाठी किमान 25 शेतकरी यांचा ग्रुप असणे आवश्यक आहे. यामध्ये 2 किलोमिटर अंतरासाठी एक वेदर स्टेशन बसविणे आवश्यक आहे, त्यासाठी 1 लाख इतका खर्च असून 25 शेतकरी यांचा ग्रुप झाल्यास सदरचा खर्च कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांचे मार्फत केला जाणार आहे. सदर तंत्रज्ञानापासून होणारे फायदे याविषयी सखोल मार्गदर्शन केले व ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन केले.
सदर कार्यशाळेसाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकराव माने-देशमुख, आजी व माजी संचालक, कारखाना कार्यक्षेत्रतील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व बिगर सभासद, पत्रकार, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या