एका निष्पाप व्यक्तीमत्वाचे पुण्यस्मरण
वृत्त एक सत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 15/4/2025 :
आज 15 एप्रिल दिवस विशेष लक्षात राहावयाचे कारण म्हणजे आजपासून चार वर्षांपूर्वी म्हणजे 15 एप्रिल 21 ला इचलकंरजीचे सुपुत्र माननीय मल्लय्या स्वामी यांना देवाज्ञा झाली. शेतकरी कुटुंबातून आलेल्या व स्वकर्तृत्वावर कापड उद्योगात आपला ठसा उमटवणारी व्यक्ती म्हणजे मल्लय्या स्वामी.
स्वतःबरोबर अनेक यंत्रमाग कामगारांना व छोट्या यंत्रमाग धारकांना त्यांनी कारखानदारी शिकवली त्याला स्वतंत्र कारखाने सुरू करण्यास मदत केली.
गौरवर्ण, घारे डोळे, हसतमुख चेहरा व निष्पाप बोलणे हे मल्यया स्वामींचे वैशिष्ट्य होते. आम्ही सर्वजण त्याना दादा म्हणत असू.
माझा व दादाचा ऋणानुबंध होता. माझे वडील कै एस व्ही कुलकर्णी यांचे ते विद्यार्थी. दादाना आपण एस व्ही सरांचे विद्यार्थी आहोत याचा प्रचंड अभिमान होता. माझा त्यांचा परिचय कै वसंत वास्कर उर्फ फर्नांडिस सर यांच्यामुळे दृढ झाला.
दादा एका सूत गिरणीचे संस्थापक चेअरमन होते. सूतगिरणीतील अग्निशामक यंत्रणेत काही तांत्रिक दोष राहिले होते ते तपासणीत दिसून आल्यावर दादाच्या वर फौजदारी दाखल झाली. याच वेळी नदीवरच्या वरदविनायकमंदिराचे ते प्रमुख ट्रस्टी होते. (आज जे नदीवरील गणपतींच्या मंदिराचे भव्यदिव्य स्वरुप आहे ते दादाचे कष्टाचे प्रतीक आहे)
कर्मधर्म संयोगाने ज्या न्यायाधीशांच्या पुढे यांचे काम होते ते न्यायाधीश गणपती दर्शनास गेले असता दादानी आपल्या भाबड्या स्वभावानुसार न्यायाधीशांच्या पुढे सुत गिरणीतील कामातील त्रुटी सांगून टाकल्या व यथा अवकाश काम चालले.
माझे व त्या न्यायाधीशांचे तितकेसे बरे नव्हते. त्यांचा माझ्यावर राग होता म्हणून मी ते काम निम्म्यातून परत केले व माझ्यावरील रागामुळे दादाच्य सारख्या देवमाणसाला त्रास होऊ नये हा विचार पण केला.
दुर्दैवाने कामात निकाल उलटा आला.
दादाना जिल्हा व सत्र न्यायालयात
अपील दाखल करावे लागले. अर्थातच अपिलात एक नामवंत वकील होते. अपील चालावयास आले. वकिलांनी दादाना त्याची कल्पना दिली त्यावेळी दादानी त्या वकिलांच्याकडून काम मागून घेतले व त्यांना सांगितले मी रुईकर वकिलांना अपीलाचे काम देणार आहे. रुईकर वकील माझ्या सरांचे चिरंजीव आहेत.
त्यावेळी त्या वकिलानी माझ्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांना हे अपील झेपणार नाही असे दादाना सांगितले.
त्यावर दादानी माझ्या सरांच्या मुलाने माझे काम चालवून मला फाशी झाली तरी चालेल पण माझे काम रुईकर वकीलच चालवणार असे ठामपणे सांगितले.
एवढी मोठी जबाबदारी पडल्यावर मी पण कसून अभ्यास करून ते काम चालवले. सुदैवाने अपील मंजूर होऊन खालच्या कोर्टाचा निकाल रद्द झाला.
त्यानंतर चार-पाच दिवसांनी मला दादाचा सकाळी दहाच्या दरम्यान फोन आला व म्हणाले वकील साहेब अपील चालवलेत फी कोण घेणार? मी म्हणालो आपणास योग्य वाटेल ती पाठवून द्या.
साडेअकराच्या सुमारास मी कोर्टात असताना दादा कोर्टाच्या आवारात भरभर चालत आले.
माझे एक मित्र ॲड. मोती इंग्रोळे, हे पण दादाना ओळखत होते ते म्हणाले काय दादा एवढ्या जोरात पळत पळत कुठे चालला आहात. त्यावर दादा म्हणाले आमचा वकील आमच्यासाठी धावपळ करतो मग आम्ही सुद्धा पळत पळत येऊन त्यांची फी द्यायला नको काय?
माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम माझ्या खिशात कोंबून दादानी माझा निरोप घेतला.
दादा माझे पक्षकार होते याचे मला माझे कधीच कौतुक नाही पण मला त्यानी वकिल नेमले होते याचा नम्र पणे गर्व आहे.
कारण त्यांच्यातील अनेक गुण व मनाचा मोठेपणा, उमदेपणा, पारदर्शकपणा आज पर्यंत मी कोणाही राजकिय व्यक्तीत पाहिला नाही.
आज दादाना त्यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त शतशः वंदन.
"वकिली कथा व व्यथा"
या आगामी पुस्तकातील
"असे पक्षकार व अशा कथा"
या प्रकरणातील संक्षिप्त भाग
ॲड. अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी.

0 टिप्पण्या