लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : सुजाता गोखले
माळशिरस दिनांक 29/04/2025 :
भारतातील महान समाज सुधारक आणि लिंगायत धर्माचे धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज (जन्म २५ एप्रिल ११३१) यांच्या ८९४ वी जयंती निमित्त विशेष लेख - संस्थापक संपादक
इ.स.बाराव्या शतकात २५ एप्रिल ११३१, वैशाख शुद्ध अक्षय्य तृतीया यादिवशी विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे बसवेश्वरांचा जन्म झाला.बसवण्णा हे मादिराज आणि मादलंबिका यांचे तिसरे संतान होते.त्यांच्यापूर्वी देवराज आणि अक्कनागाई ही दोन रत्ने त्यांना प्राप्त झाली होती.त्यांच्या घरी शिव उपासनेची भक्ती असल्याने बसवेश्वरांवर जन्मतःच शिवभक्तीचे संस्कार झाले होते.त्यामुळे त्यांना यज्ञोपवित शरीरावर धारण करुन मुंज करुन घेण्यास विरोध केला.परंतु घरचे लोक त्यांचे मत मानत नाहीत, असे वाटल्याने त्यांनी घराचा त्याग करुन कृष्णा-मलप्रभा संगमावर कुडलसंगम येथे येऊन १२ वर्षे विद्याभ्यास व शिवसाधना केली.कुडलसंगम येथे मंदिरात शिवआराधना, पूजा परिपाठ करीत असताना वेद पुराणांचा अभ्यास केला.त्यातून त्यांना ज्ञान झाले की, मनुष्य प्राणी हा त्याच्या जन्माने मोठा होत नसून कर्माने मोठा होतो.कोणतेही काम हे कमी दर्जाचे नसते.मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिवभक्ती होय.श्री बसवेश्वर म्हणतात "कायेकवे कैलास" म्हणजेच कर्म करण्यातच स्वर्ग आहे.असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.या विचारावर त्यांनी लिंगायत धर्म स्थापन केला.धर्मात कुठल्याही जातीच्या व धर्माच्या लोकांस येण्यास बंधने ठेवली नाहीत. कोणत्याही व्यक्तीने गळ्यामध्ये ईष्टालिंग धारण करुन लिंगायत व्हा व शिवशरण म्हणून जगा, असा संदेश दिला.
बसवेश्वरांचे मामा बलदेव हे बिज्जल राजाचे दरबारी मंत्री होते.कालांतराने बसवेश्वरांनी आपल्या मामाच्या मदतीने मंगळवेढा प्रांतातील बिज्जल राजाच्या प्रशासनात प्रवेश केला.बिज्जल राजाही शिवभक्त होता.बसवेश्वरांची कामावरील श्रध्दा व भक्ती पाहून त्यांना प्रधानमंत्रिपद दिले.साधारणत इ.स.११३२ ते ११५३ पर्यत २१ वर्ष त्यांनी मंगळवेढा प्रांताचे प्रधानमंत्री म्हणून सत्तासुत्रे सांभाळली.तत्कालीन परिस्थितीत अंधश्रध्दा, अति कर्मकांड, अस्पृश्यता, स्त्रिदास्य याबाबतीत गरीब आणि अस्पृश्यांचा होत असलेला छळ या विरोधात 'स्वातंत्र्य, समता आणि बंधूता' या मानवतावादी आंदोलनाची', कर्मकांड, उच्च-नीच, स्पृश-अस्पृश्य, जातीपाती नष्ट करण्यासाठी व सर्वांना समानतेचे शिक्षण देण्यासाठी शिवभक्त म्हणजेच शिवशरणार्थी एकत्र करुन अनुभवमंटप नावाने एक संसद स्थापन केली.त्याद्वारे सर्वांना आपले मत मांडण्यासाठी मुभा दिली व सर्व धर्मातील लोकांना प्रवेश देऊन चर्चा करुन सर्वासाठी 'समता, बंधूता, श्रमप्रतिष्ठा' ही सुत्रे तयार केली.अनुभवमंटपात स्त्री-पुरुष, जात-धर्म-पंथ, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव नव्हता.त्यांनी शिवभक्तातील शिवशरण हे कोणत्याही जातीपातीचे असोत.त्यांचे आंतरजातीय विवाह लावून देण्याचे क्रांतिकारक धाडस श्री महात्मा बसवेश्वरांनी केले व त्याद्वारे समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.तत्कालीन परिस्थितीत भारतातील पहिली सामाजिक क्रांती हरळ्या व मधुवय्या या ब्राम्हण व चांभार हा आंतरजातीय विवाह घडवून आणला.
महात्मा बसश्वेर हे क्रांतीकारी संत होते.त्यांचे प्रत्येक कार्य, विचार, तत्वज्ञान, वचन व कृती विलक्षण क्रांतीकारक होते.त्यांनी लेखनापेक्षा प्रत्यक्ष जनजागृतीला व सामाजिक कार्याला महत्व दिले.भक्ताला जातीपातीचे बंधन नसते.त्याची भक्ती, भाव, समर्पण व सदाचरण महत्वाचे हा क्रांतीकारी संदेश बसवेश्वरांनी दिला.
'येथ जातिकुळ अवघेची अप्रमाण' माऊलेचेही हेच सांगणे होते.आपल्या 'वचन' साहित्यातून संत बसवेश्वरांनी 'कायकवे कैलास' याचे मर्म आपल्या कृतीतून पटवून दिले.परिश्रम, उद्योगशिलता, प्रामाणिकता, स्त्रीशक्तीचा पुरस्कार आध्यात्मिक लोकशाही व मनाची शुचिर्भूतता याला प्राधान्य दिले.
'उळ्ळवरू शिवालयव माडवरू
नानेन माडुवे बडवनय्या
एन्न काले कंब देहवे देगुल
शिरवे होन्न कळसवय्य
कुडलसंगम देव केळय्या'
देह म्हणजे देवाचे मंदिर आहे.हे देहरूप मंदिर शुध्द राहू दे.हे कुडलसंगम देवा हा देह सत्कारणी लावण्याचे सामर्थ्य दे.असे संत बसवेश्वरांचे वचनामृत आहे.ते पुढे म्हणतात मनाची प्रसन्नता, मनाचे समाधान व मनाची तृप्ती सर्वश्रेष्ठ धन आहे.म्हणून शुध्दाचरण कर भेदाभेद अमंगळ आहे.विशुद्ध भक्ती करतांना श्रम विसरू नकोस.
'कायकवे कैलास
इदु सत्य कुडलसंगम देवा'
आपल्या श्रमावर, प्रयत्नावर निष्ठा ठेव व भक्तीला श्रमाची जोड दे.प्रामाणिक कष्टातूनच जे काही निर्माण होते तेच 'कैलास' आहे.
समाजातील सनातनी लोकांना हे मान्य नसल्याने बसवेश्वरांविरुध्द बिज्जल राजाकडे अनेक तक्रारी करुन राजाची कानभरणी केल्यामुळे राजाने त्या नवविवाहितांना देहान्त शासन फर्माविले.त्यावेळी महात्मा बसवेश्वरांनी प्रधानमंत्रिपदाचा त्याग केला.त्याप्रसंगी धर्माधवादी विरुध्द सुधारणावादी असा भयानक संघर्ष सुरू झाला.याच वातावरणात राजा बिज्जलाची हत्या झाली.याचे खापर सर्व वीरशैव लिंगायत शरणबांधवांवर फोडून त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्यात आले.बसवेश्वरांना अत्यंत दुःख झाले व त्यांनी बिज्जल राजाची नोकरी सोडून ते पुन्हा कुडलसंगमास परत आले.कालांतराने त्यांनी मलप्रभा संगमावर ११६७ मध्ये समाधी घेतली.
संसदेत तसेच साता-समुद्रापार लंडन येथे ही बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आले आहे.बसवेश्वरांच्या कार्याची विचारांची आजही समाजाला गरज आहे.त्यांचे चरित्र साहित्य विपुल असून त्यांची वचनेही समाजास प्रेरणादायक आहेत.संत बसवेश्वरांच्या वाणीची सत्यता आजही मनाला पटते यात काही शंका नाही.
✍ प्राचार्य वाय.व्ही.गुजरे
श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज, माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर
0 टिप्पण्या