मन इंद्रधनू
🟡 मैत्र मनाचे
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 28/04/2025 : मैत्री हा आपल्या मनाचा एक अलवार असा पैलू आहे. "मैत्र मनाचे" म्हणजे आपल्याच मनाशी आपली घट्ट मैत्री होणे. ही खरोखरच अशी घट्ट मैत्री झाली तर किती छान होईल नै का मंडळी...!! सध्याच्या या काळातले कमालीचे धकाधकीचे बनलेले हे जीवन, रोजचा जगण्यासाठी चालू असलेला संघर्ष, दोन वेळच्या भाजी भाकरी साठी करावी लागणारी प्रचंड यातायात, असंख्य चिंता, प्रश्न, ताण तणाव ..याने खरंतर एकविसाव्या शतकातल्या माणसाला भंडावून सोडलेले आहे. म्हणजे खरंच आपण गांजलो गेलो आहोत. संपत्ती आहे, भौतिक सुख सुद्धा आहे काही जणांकडे.. तरीसुद्धा स्वास्थ्य नाही, समाधान नाही.. हव्यास वाढत चाललेला आहे आणि मग यांची मने कुठेतरी शांतीच्या शोधात भटकत आहेत.
हा खरं तर खूप मोठा विरोधाभास आहे मध्यंतरी एक पोष्ट वाचली. पूर्वी माणूस कष्ट करून पैसे मिळवण्यासाठी सायकल चालवत होता. कष्ट करून भरपूर पैसे मिळवले. मग त्याने गाड्या घेतल्या आणि त्यानंतर असा एक क्षण त्याच्या जीवनामध्ये आला की त्याला स्वास्थ्यासाठी सायकल पुन्हा चालवणे आवश्यक ठरले.
एकंदरीत हा सगळा विरोधाभास आहे. म्हणजे मी अशाही काही लोकांना बघते की अक्षरशः त्यांचे चेहरे सुतकी असतात किंवा जागतिक बँकेचे कर्ज उचलल्यासारखा त्यांचा चेहरा असतो आणि हे लोक फक्त अर्धा तास बागेमध्ये किंवा अन्यत्र कोठे तरी हसत असतात. नैसर्गिक नसतं ते हास्य..!! "नैसर्गिक हसू ही फार मोठी देणगी आहे. ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं, कुठलंही काळेबेरे नसते, कपट कारस्थाने नसतात अशीच माणसं खरच निर्व्याज व खळखळून हसतात. स्वतः हसतात, आनंद घेतात आणि दुसऱ्यांनाही आनंद देतात."
तर मंडळी ,आपण मैत्रीबद्दल बोलत होतो. आपल्या या सध्याच्या विरोधाभासामधील जे जगणं आहे या पार्श्वभूमीवर "गुज मनीचे" सांगण्यासाठी एक हक्काची जागा आपल्या आयुष्यात असावी असे आपल्याला वाटणं अगदी साहजिकच आहे, नाही का..!!! आणि ही जागा कुठली तर ती म्हणजे आपले अत्यंत जिवलग असे मित्र होत.
असे जिवलग मित्र कमावणे किंवा मिळवणे म्हणजे चेष्टा नाही. मैत्रीचे एक अतिशय महत्त्वाचे सूत्र आहे. ते म्हणजे "राखावी बहुतांची अंतरे". जी माणसे इतरांच्या मनाचा विशाल दृष्टिकोनातून विचार करतात, तीच माणसे अजात शत्रू म्हणून ओळखली जातात आणि ही अशी शत्रू नसणारी माणसं सर्वदूर लोकप्रिय ठरतात.
ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या "पसायदान" या विश्वप्रार्थने मध्ये म्हटले आहे
जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मे रती वाढो
भूतां परस्परे जडो
मैत्र जिवाचे
मंडळी, तुम्हीच सांगा मित्र किंवा मैत्रीविषयी इतका सुंदर उल्लेख तुम्ही दुसरीकडे कुठे कधी ऐकला आहे का..? आपण मित्राला दोस्त, सखा किंवा सखी, सवंगडी, स्नेही असे म्हणतो. जेव्हा आपण अशा रीतीने आपल्या मित्राला संबोधित करतो त्यावेळी मनाच्या अनेक अवस्था त्यामध्ये अंतर्भूत होतात. मैत्रीमध्ये काय नाही ते विचारा. मैत्रीमध्ये विश्वास आहे, प्रेम आहे, स्नेह आहे, एवढेच काय तर भक्ती देखील आहे. मैत्री जात, धर्म, लिंग इत्यादी कुठलाही भेद पाहत नाही. अशी उदाहरणे आपल्या पुराण कथांमध्ये देखील आढळतात, इतिहासात आढळतात. उदाहरण द्यायचं झालं तर कृष्ण अर्जुनाची मैत्री, कृष्ण द्रौपदीचे सख्य, कर्ण दुर्योधन यांची मैत्री, तेनालीरामन आणि कृष्णदेवराय यांची मैत्री, अकबर व बिरबल यांची मैत्री..अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
लहानपणी "शेजारी" नावाचा एक पिक्चर पाहिला होता. ते शेजारी म्हणजे खरंतर प्रचंड घनिष्ठ असे असे मित्र होते.
कवी अनंत राऊत यांनी मित्रत्वाच्या मित्रत्वाची महती व्यक्त करणाऱ्या या ओळी लिहिलेल्या आहेत
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
वाट चुकणार नाही जीवनभर कोणी
एक तू मित्र कर आरशासारखा
तर मंडळी, मैत्री हा एक मनाचा पदर आहे. याच्या विषयी बोलायचं किंवा लिहायचं तर एक पुस्तकच लिहावे लागेल. टप्प्याटप्प्याने मैत्रीचे अलवार पदर अलगद उघडावे लागतील. मैत्रीचे धागे म्हणजे रेशीम धागे असतात. मनाच्या एका कप्प्यात या रेशमाच्या लडी अलगद ठेवलेल्या असतात आणि सक्तीच्या नात्यांपेक्षा ही मैत्रीचीच नाती शेवटपर्यंत मनापासून टिकतात.
अशा वेळी हे गाणं आठवतं....
तेरे जैसा यार कहां कहां ऐसा याराना
याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना
राजश्री (पूजा) शिरोडकर
एम ए मानसशास्त्र
कोल्हापूर
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,मुंबई


0 टिप्पण्या