📙 जोसेफ मायस्टर कोण होता?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 09/04/2025 : जोसेफ मायस्टर हा फ्रान्समधील एक नऊ वर्षांचा कोवळा मुलगा होता. १८८६ च्या ४ जुलै या दिवशी खेळत असताना त्याच्यावर एका पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला केला. त्याला जमिनीवर उताणं पाडून कुत्र्यानं त्याला अनेक ठिकाणी दंश केला. आपला चेहरा जोसेफने हातानं झाकून घेतल्यामुळे त्याचा चेहरा मात्र बचावला. जवळच असलेल्या एका गवंड्यानं लोखंडाची सळी वापरून जोसेफची सुटका केली. तिथून हाकलला गेलेला तो कुत्रा आपल्या धन्याकडे, थिओडोर व्होनकडे गेला आणि त्यालाही चावला. त्या गवंड्यानं रक्तानं आणि कुत्र्याच्या लाळेनं माखलेल्या जोसेफला उचलून घेत त्याच्या आई वडिलांकडे पोहोचवलं. त्यांनी त्याला गावातल्या डॉक्टर वेबेरकडे नेलं. वेबेरनी त्याच्या जखमा धुऊन कार्बालिक आम्लानं शक्य तेवढ्या निर्जंतुक केल्या आणि पट्ट्या बांधल्या. त्याचबरोबर त्यांनी जोसेफला, पॅरिसला प्राध्यापक पाश्चर यांच्याकडे घेऊन जायला सांगितलं. पाश्चर होते शास्त्रज्ञ; पण त्यांनी रोगजंतूंपासून बचाव करण्याविषयी बरंच संशोधन केलं होतं.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या दंशापासून होणाऱ्या रेबीस या रोगावर उपकारी पडेल असं एक रसायन त्यांनी तयार केलं होतं. रेबीस झालेल्या सशाचा मज्जारज्जू अलग करून त्यांनी तो सुकवला होता आणि त्याची पूड तयार केली होती. हीच होती त्यांनी तयार केलेली लस.
अनेक मेंढ्यांवर त्यांनी तिचा यशस्वी प्रयोग केला होता. त्या लसीचाच वापर जोसेफवर करता आला असता; पण तोवर त्यांनी कोणाही माणसावर तसा प्रयोग केला नव्हता. तसं करण्यातले धोके पाश्चर जाणून होते. तो प्रयोग यशस्वी झाला असता तर अर्थात जोसेफचे प्राण वाचणार होते. पाश्चरच्या ख्यातीतही भर पडणार होती. पण जर काही कारणानं त्यात यश मिळालं नसतं तर त्यांना सर्वांनीच दोष दिला असता. तोवरच्या त्यांच्या साऱ्या तपश्चर्येवर पाणी पडणार होतं.
द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या पाश्चरने आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली; पण कोणीही त्यांना पाठिंबा दिला नाही. जोसेफची हालत तर दिवसेंदिवस बिघडत होती. त्याचा मृत्यू अटळ होता. सरतेशेवटी मनाचा हिय्या करून, कुत्रा चावल्यापासून साठ तासांनंतर पाश्चरनी जोसेफला त्या लसीचा पहिला डोस दिला. त्यानंतर सतत तेरा दिवस ते त्याला ती लस टोचत होते; आणि सतराव्या दिवशी त्यांनी रेबीसच्या जिवंत आणि रोगबाधा करणाऱ्या विषाणूंचाही एक डोस दिला.
जोसेफने त्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. त्याला दीर्घायुष्य लाभलं. त्या लसीकरणाचे कोणतेही दूरगामी अनिष्ट परिणाम दिसून आले नाहीत. जोसेफ आपल्या उपकारकाला विसरला नाही. पाश्चर इन्स्टिट्यूटचा दारवान म्हणून त्यानं आयुष्यभर इमानानं आणि निष्ठेनं काम केलं. जर्मन फौजांनी जेव्हा पॅरिस पादाक्रांत केलं, तेव्हा त्यांचे काही अधिकारी पाश्चरच्या समाधीवर फुलं वाहण्यासाठी आले. त्यांनाही जोसेफनं कडवा प्रतिकार केला. त्यात तो अयशस्वी झाला तेव्हा घरी जाऊन त्यानं स्वत:वरच गोळी झाडून घेऊन आत्महत्त्या केली. पाश्चरही जोसेफला विसरला नव्हता, कारण त्यानं आपल्या समाधीवर केवळ दोनच शब्द कोरून ठेवावयास सांगितले होते - मायस्टर जगला.
(📌डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कोण?' या पुस्तकातुन)
🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,
0 टिप्पण्या