🟣 मोहिते पाटलांच्या चौथ्या पिढीतील शाही विवाह सोहळा
🔴 राजघराण्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/03/2025 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीच्या शुभ विवाह सोहळ्याची अकलूज मध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील राजघराण्यातील मान्यवर व्यक्ती , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग आदी क्षेत्रातील असंख्य मान्यवरांना तसेच सुमारे दीड लाख मित्र परिवारास निमंत्रित केलेले होते.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा विवाह सोहळा 17 में 1971 मध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला होता . राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही लक्ष भोजन घालून त्यांनी आलेल्या प्रत्येक निमंत्रित पाहुण्यांचे व कार्यकर्त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले . त्यावेळी विहीरीत बर्फ , साखर व लिंबू रस टाकून आलेल्या पाहुणे मंडळींना सरबत पाजल्याचीही चर्चा जगभर झाली . देशी व विदेशी वृत्तपत्रांनी त्याची दखल घेत या विवाह सोहळ्याला प्रसिध्दी दिली .
त्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विवाह 1 डिसेंबर 1995 मध्ये असाच मोठ्या थाटामाटात साजरा केला . या विवाह सोहळ्याची देशभर चर्चा झाली .लाखो निमंत्रित व्यक्तींसह राजघराण्यातील अनेक मान्यवर , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती या विवाह सोहळ्याला होती .
आता तब्बल 30 वर्षानंतर मोहिते पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील आ रणजितसिंह मोहिते पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव विश्वतेजसिंह यांचा विवाह विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील उदयसिंह सरनाईक यांची जेष्ठ कन्या चि सौ का शिवांशिका यांच्याशी शनिवार दि 8 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजून 27 मिनीटे या गोरज मुहूर्तावर अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे संपन्न झाला . या विवाह सोहळ्याच्या गेल्या दहा दिवसांपासून स्मृती भवन येथील महर्षी हॉलच्या प्रांगणात जेवणावळी सुरू होत्या. सकाळी 11 ते 2 व सायंकाळीं 6 ते 9 असे दोन वेळ सुमारे 15 हजार निमंत्रित गावकऱ्यांना भोजन दिले गेले .
माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा संकुलावर मध्यभागी पुण्याच्या धनिक प्रोडक्शन या कंपनीने 60 बाय 60 चा भव्य विवाह मंडप उभारला असून त्याला सुंदर कमळाचा आकार देण्यात आला होता . विवाह मंडपाच्या चारी बाजूनी निमंत्रीत, आमंत्रित पाहुणे मंडळी राजघराण्यासह राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग क्षेत्रातील असंख्य मान्यवरांना तसेच कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जवळपास एक लाख खुर्च्या मांडण्यात आल्या तर क्रीडा संकुलाच्या गॅलरी मध्ये पन्नास हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती . त्याशिवाय ज्यांना क्रीडा संकुलात जागा मिळणार नाही अशा व्यक्तींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी 10 बाय 10 चे 22 स्क्रिन संकुलात व महर्षी चौक येथे लावण्यात आल्या होत्या .
सायंकाळी 4 वाजता सदुभाऊ चौकातून वरदावा काढण्यात आला . वरदाव्याची संपूर्ण व्यवस्था माजी उपसभापती अर्जूनसिह मोहिते पाटील यांनी पाहिली . मुंबईचे 200 कलाकारांचे डान्स पथक , लेझीम पथक , ब्यांड पथक , डफडे , ढोली बाजा अशी मंडळी वरदाव्यात सहभागी होती.
🟡पार्किंग व्यवस्था
विवाह सोहळ्याच्या मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. सुमारे दहा हजार वाहनांची
पार्किंग व्यवस्था विजय मैदान , लक्ष्मी नारायण मैदान , नवीन बस स्थानक , जिजामाता कन्या प्रशाला येथे करण्यात आली होती .
🟢सहा हेलिपॅड
राजकीय , उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर हेलिकॉप्टरने येणार असल्याने सहा ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती . एकंदरीतच दीड लाखापेक्षा अधिक निमंत्रित मंडळी विवाह सोहळ्याला येणार असल्याने जय्यत तयारी करण्यात आली होती .
0 टिप्पण्या