अंजली दमानिया व सुरेश धस यांच्याकडे जर ठोस माहिती पुरावे असतील तर धनंजय मुंडे विरोधात न्यायालयात जावे

अंजली दमानिया व सुरेश धस यांच्याकडे जर ठोस माहिती पुरावे असतील तर  धनंजय मुंडे विरोधात न्यायालयात जावे

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 10/02/2025 : 

गेंड्याची कातडं पांघरलेले निगरगट्ट महाराष्ट्र सरकार जर दोषी मंत्री धनंजय मुंडे यांना येन केन प्रकारे वाचवण्यासाठी पुढे सरसावत असेल तर सध्या महाराष्ट्रात नव्हे देशात बीड प्रकरण व संतोष देशमुख खून प्रकरणी आमदार सुरेश धस व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांसमोर टिका आरोप व दररोज नवनवीन माहिती यांचा रतीब घालण सुरू केलं आहे. जर आमदार सुरेश धस एवढ्या छातीठोकपणे व पुराव्यानिशी दररोज सकाळ संध्याकाळ माध्यमातून सनसनाटी निर्माण करून आकाचा आका वर दमदार टोलेबाजी करुन माध्यमांमधून संतोष देशमुख खून प्रकरणाची इत्यंभूत माहिती देत आहेत. त्यातून केवळ बातम्या चर्चा व एरंडाचे गुऱ्हाळ एवढेच होत आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागात कसा व किती सराईतपणे भ्रष्टाचार केला आहे हे आकडेवारी व काही कागदपत्रे यांचा पुरावा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला आहे. पण यांवर केवळ बातम्या व चर्चा या पलीकडे काही झाले नाही. महाराष्ट्र शासन याकडे गांभीर्याने पहात नाही. त्याची सत्यता पडताळून कारवाई करत नाही. म्हणजे असे आहे "हमाम मे सब नंगे होते है" त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचेवर जर शासनाने कारवाईचा बडगा उगारला तर कारवाई करणारे काही हितसंबधीत मंत्री नेते अधिकारी हे काचेच्या घरात आहेत त्यामुळे ते धनंजय मुंडे यांचेवर चुकुनही दगड मारतील याची सुतराम शक्यता कमी आहे नव्हे नाहीच. तेव्हा ही बाब लक्षात घेऊन आमदार सुरेश धस अंजली दमानिया यांनी दररोज सकाळी दुपारी माध्यमातून तोच विषय तेच आरोप तीच ती सणसणाटी भुमिका घेऊन वेळ घालवण्यापेक्षा त्यांचेकडे असलेले भक्कम पुरावे अधिकृत माहिती घेऊन न्यायालयात दाद मागावी. मंत्री धनंजय मुंडे हे कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देतील असे वाटत नाही. कारण भ्रष्टाचार करताना त्यांनी त्यांचे एकट्याचे हात बरबटून घेतलेले नाहीत. त्या बरबटलेल्या हाताने त्यांनी त्यांच्या पक्षातील अनेकांना शिवले असल्याने ते एकटे पाण्यात पडणारच नाहीत. नैतिकता साधन शुचिता हे शब्द अटलबिहारी वाजपेयी यांचे बरोबर केव्हाच संपले आहेत. मागे काही वर्षांपूर्वी जेव्हा राजकारण समाजकारण व नेत्यांकडे थोडीफार नैतिकता विश्वासाहर्ता व देशाभिमान होता तेव्हा ते त्यांचा थोडाही संबंध नसताना ही नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देऊन लोकांसमोर उजळ माथ्याने येत होते. कुठं रेल्वे अपघाताची जबाबदारी, कुठं जातीय धार्मिक दंगल व हिंसाचार या घटनेमुळे विचलित झालेले थोर समाजवादी विचारसरणी शाबूत ठेवलेल्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचा इतिहास ज्ञात आहे. मात्र हल्ली एवढे पुरावे माहिती देऊनही  पक्षाची स्वतः ची त्यांच्या नेत्यांची नाचक्की, बदनामी, छी थु होऊनही जर यांची नैतिकता डळमळीत होत नसेल तर आमदार सुरेश धस, अंजली दमानिया यांनी त्यांच्या कडील सर्व कागदपत्रे माहिती पुरावे घेऊन न्यायालयात जाऊन लोकशाही मार्गाने संबंधित अधिकारी, मंत्र्यांच्या विरोधात दाद मागावी. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानं व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना ताबडतोब पकडून फासावर लटकवून हे विषय संपणार नाहीत तर यातील मास्टर माईंड कोण आहेत हे न्यायालयात ठरू द्यात दुध का दुध पाणी का पाणी. कारणं देशात भाजपने असा ब्रांड तयार केला आहे तुम्ही तुमच्या पक्षात किंवा वैयक्तिक कितीही, काहीही करा भ्रष्टाचार करून देश लुटा पण आमच्या भाजप मध्ये या तुम्हाला चारित्र्य निष्कलंक व सहिसलामत वाचवण्याची राष्ट्रभक्ती चे सर्टिफिकेट दिलं जाईल.

बी टी शिवशरण 

ज्येष्ठ पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या