हातभर फाटल्यावर ठाकरे व पवार गट दाभण शोधतायत ?
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 20/01/2025 : शिल्लक शिवसेना आणि त्याहूनही अती शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत इतकी हातभर फाटली की काय विचारू नका. त्यामुळे आता बैल गेला आणि झोपा काढत बसताना त्यांनी आता फाटलेली शिवण्यासाठी दाभण शोधाशोधीचा मार्गक्रम सुरू केला आहे. सत्ता असताना मगर मस्तीत राहून शासकीय तिजोरीतून मोठ्या प्रमाणात डल्ला मारला त्यावेळी शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्याहूनही अती शिल्लक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांना कधीतरी आपल्या पक्षावर असली आपत्ती येऊ शकते याचा साधा मागमूस सुध्दा लागला नाही याचा अर्थ यांच्या डोळ्यावर ' सत्तेचा सुरमा ' असा काय ठासून भरला होता परिणामी आता ते गळक्या छपराची डागडुजी करण्यासाठी दाभण शोधायला निघालेत पण छप्पर इतक्या ठिकाणी आरपार फाटलय की ते काही केल्या दाभणाने शिवता येणारच नाही हे वास्तव आहे .
' कशात काय अन् फाटक्यात पाय ' अशी केवीलवाणी दुरावस्था या दोन्ही राज्यव्यापी पक्षांची झाली आहे त्यात शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब हे मात्र अजूनही बेभान होऊन स्वतःला राष्ट्रीय पक्षाचे सर्वोच्च पर्यायाने स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात. हे सर्व अनाकलनीय आहे कारण यांच्या दोन अडीच जिल्ह्यांच्या पक्षीय दुकानाला वाढत्या कर्जामुळे मतदारांनी कायमचे टाळे ठोकून त्याची चावी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुपूर्द केली आहे. तरीही पवारसाहेब या बंद पडलेल्या दुकानाची मरम्मत करून पुन्हा एकदा त्याला ऊर्जितावस्था आणण्याचा वयाची पंच्याऐंशी उलटल्यानंतर त्याच दुकानच्या पायरीवर बसून प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीवर दिवसा अंधार आणि रात्री विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचा लखलखाट पाहून ' भिऊ नकोस पण कुत्रं आवर ' असं साकड घालत कोकणचे अर्थात रत्नागिरीचे नवनिर्वाचित आमदार भास्कर जाधव यांची अवस्था निवडून येऊन सुध्दा फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे तर त्याच ठाकरे गटाचे ईडीच्या घरट्याच्या आजूबाजूला गटांगळ्या खात असलेले राजापूरचे पडीक आमदार राजन साळवी यांनी तर आपल्या पराभवाच सारं खापर त्यांचेच पुर्वा श्रमीचे साथी पडीक खासदार विनायक राऊत यांच्यावर फोडले असून ठाकरेंच्या या दोन राऊतांनी शिवसेनेच दूध कोजागिरी पौर्णिमेच्या कित्येक वर्षे अगोदर उतू घातलं म्हणून अक्षरशः टाहो फोडत आहेत .आता या पक्षांना राजकारणातून बेघर होण्याची वेळ आली आहे इतकेच नाही तर त्यांना मतदारांनी बेघर करून महाराष्ट्रातून अक्षरशः हाकलून दिले आहे त्यामुळे उशिरा का होईना पण सावध झालेल्या शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी पुढाकार घेऊन आज शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा एकदा काॅंग्रेस पक्षाबरोबर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जुळवाजुळव करण्याची धडपड सुरू केली आहे खरी पण याला आता फारच उशीर झाला आहे , कारण शिवसेनेचा खरा शिलेदार कधीच त्या त्या शाखांमधून कोसभर दूर गेला आहे म्हणण्यापेक्षा विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत व कधीतरी ' आई बसली , आई बसली ', अशा कुत्सितपणे आई भवानीची क्रुरपणे चेष्टा करणाऱ्या सुषमाताई अंधारे यांना दिवसाढवळ्या आपण किमान पक्षी विधान परिषदेत जाऊ असा स्वप्न दोष झाल्यावर जसा आशावाद पडत असतो तसा तो आजही पडत आहे , पण त्यात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत त्यांची थरथरणाऱ्या हाताची नक्कल करत या हाताला तलवार पेलवणार आहे का ॽ असा चित्रविचित्र हावभाव करून जो सवाल केला होता तो आजही जातीवंत शिवसैनिकांच्या काळजाचा ठाव घेतोय त्याच काय ?
अशा एक ना अनेक बारा भानगडीत हे दोन्ही पक्ष पुरते अडकलेच नाही तर गाडले गेलेले असताना ते आणि त्यांचे नेते आता कसली लयाला गेलेल्या पक्षांची डोंबलाची डागडुजी करणार आहेत हे देवच जाणो , हां शरदचंद्र पवारसाहेब हे कधीच कोणताही राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून हरलेल युद्ध जिंकलो असल्याचा किमान भास तरी निर्माण करतात कारण त्यांनी यापूर्वी हारलेले डाव पुन्हा एकदा आपल्या पारड्यात टाकण्याची अभूतपूर्व किमया केली आहे पण नशीब सतत साहेबांच्या पदरात पडेल याची अजिबात आणि तितकीच किंचित सुध्दा सुतराम शंका नाही कारण कारण त्यांचा राजकीय जुगार आता अगदी लोऐस्ट तीन पानी पत्यात पुरता अडकला आहे , त्यात त्यांना तीन राजाची पाने आपसूकच आपल्या हाती येण्याची स्वप्ने पडतात हेच मुळी हास्यास्पद आहे ! त्यामुळे त्यांनी आता आपला पक्ष काॅंग्रेस पक्षात कायमचा विलीन करून बारामतीच्या बागायतदार शेतीत नवनवीन प्रयोग कसे करता येतील याची चाचपणी करावी अर्थात तिथे सुद्धा त्यांच मन लागेल असे नाही तरीही हळूहळू त्याची त्यांना सवय करून घ्यावी लागेल .
आता शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महापालिका निवडणुकीत पुरता अडकला आहे कारण हातची महापालिका गेली तर शिल्लक शिवसेनेचा उरलासुरला डोलारा अर्थ कारण नसताना चालवायची कसा ? कारण सगळी सोंग करता येतील पण पैशाचं सोंग कसं करणार परिणामी आजपर्यंत महापालिकेच्या तिजोरीतून जी मलई मिळत होती तीच जर कायमची बंद झाली तर ' तेल तर अगोदरच गेलं आहे अन् तूपही गेल ' तर मात्र मातोश्रीवरचा थयथयाट काही औरच असेल , पण काय करणार सत्ता असताना नको इतकी पाप केलीत त्यामुळे त्याची परतफेड सव्याज तर करावी लागणार त्यावेळी आताचे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत हे कुठे आणि कुठवर कोणत्या कुंपणावर जाऊन सकाळचा भोंगा वाजवणार हा खरा प्रश्न आहे म्हणून म्हणतात की ' एकेला देवेंद्र क्या करेगा ', यापेक्षा आता महापालिकेच्या निकालानंतर ' एकेला संजय राऊत क्या करेगा ' ! याचीच तुम्हा आम्हाला चिंता नसून उत्सुकता मात्र निश्चित आहे त्यामुळे ही महाविकास आघाडीची गाजराची पुंगी यापुढे कधीच वाजणार नाही कारण ती मर्कटलिला करणाऱ्या नेत्यांनी कधीच मुख्यमंत्रीपद तुला की मला या नादात तोडून मोडून खाल्ली आहे हे वास्तव नाकारता येणार नाही.
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

0 टिप्पण्या