'शेती सोडा' म्हणणाऱ्या विचारवंतां (?) साठी

'शेती सोडा' म्हणणाऱ्या विचारवंतां (?) साठी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 1 जानेवारी 2025 :

एखादी घटना घडल्यानंतर वरकरणी दिसणाऱ्या तत्कालीन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न होत असतानाच मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ नये.पुण्यामध्ये वाघोली परिसरात मद्यधुंद डंपर चालकाने पदपथावर झोपलेल्या नऊ शेतकरी व मजुरांना चिरडले. त्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला व सहा जण गंभीर जखमी झाले होते. मी ससून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना भेटून चौकशी केली असता कळाले की ते फासेपारधी (एसटी) आदिवासी जमातीचे लोक असून नुकतेच काम धंदा मिळवण्यासाठी पुण्यामध्ये आले होते. काहीजण गावाकडे पिढी जात शेती करून सुद्धा शेती अजून त्यांच्या नावाने झालेली नाही. तर काहींची शेती सावकाराकडे गहाण आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतमजुरी पण मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने शहराकडे यावे लागले. 

संगमनेर मधून पण एक जण नोकरीसाठी आले होते. हे सर्व 40 जण राहायची सोय नसल्यामुळे फुटपाथ वर झोपले होते. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईहून एक जण रात्री आले तर रिक्षा चालकांनी दोघांच्या मदतीने त्यांचे सहा हजार रुपये व मोबाईल चोरला. त्यांची रीतसर तक्रारही पोलिसांनी व्यवस्थित लिहून घेतली नाही. ना पुढे तपास केला. 

हे सर्व सांगितल्यानंतर श्री. मयूर बागुल व हमाल पंचायतचे श्री. नितीन पवारांनी त्या नातेवाईकांची संस्थे मार्फत राहण्याची व जेवणाची सोय केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की ह्यांचा सर्व औषध पाण्याचा खर्च शासनातर्फे होईल. तरी सुद्धा ससून तर्फे नातेवाईकांना औषध आणण्यासाठी सांगितले जात होते. त्यामुळे आम्ही ससूनचे डीन डॉ. एकनाथ पवार गावी गेले असल्यामुळे डॉ. दाभाडे मॅडमना भेटलो व औषध मोफत देण्याची सोय केली.   

जखमी लोकांचे तातडीने उपचार, भरधाव जाणाऱ्या अनाधिकृत डंपर चालकांवर कारवाई हे जरी विषय बातम्यात असले तरी मूळ प्रश्न हा आहे की शेती परवडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागते.


सतीश देशमुख, B. E. (Mech).

अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स

9881495518


एकच ध्यास-शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या