"तुळस"
एक प्रतिकारशक्ती वाढवणारी
औषधी वनस्पती.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 8 जानेवारी 2025 :
सध्या करोना व्हायरसमुळे (corona virus) सर्व जग त्रासलेलं असताना एक मात्र लक्षात येतयं ज्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली तो या धोक्यातून तरलाच म्हणून समजा तेंव्हा तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की, आपली रोगप्रतिकारक क्षमता अधिक असेल तर आपल्याला कोणताही रोग होऊ शकत नाही. या संकट काळात आपले एक सुदैव आहे आपण भारतीय आहोत.त्यामुळे सगळ्या ऋषी मुनीची संशोधन आपल्याला आज फायदेशीर होत आहेत. भारतात वेदांची ही मोठी परंपरा असल्यामुळे व आयुर्वेदा सारखे जगातील मोठे संशोधन याच मातीतून पुढे आल्याने आपण या पुर्वी ही मोठेमोठे साथीचे रोग परतवून ही लावलेत.विज्ञानाला आजवर न सापडलेल्या रोगांवर भारतात आजही यशस्वी इलाज झाले आहेत ते ही याच भारत भुमित तेव्हा कोरोनाला ही आपण भारतीय याच ताकदीचा जोरावर हरवणार आहोत.आपल्या देशात असलेल्या अनेक औषधींचा वापर आपण यासाठी करून आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो हे प्रत्येक भारतीयाने लक्षात घ्यायला हवे.
बऱ्याचदा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लागणा-या गोष्टी आपल्या घरातच असतात. त्यापैकी एक म्हणजे, तुमच्या घरातील बहरलेली पवित्र तुळस! आज आपण तुळशी बदल डिटेल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करुया.
तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; यातील ऑसिमम शब्दाचा अर्थ गंध असा आहे; तर सॅन्क्टम शब्द पवित्र या अर्थाने आला आहे.तर इंग्लिश:मध्ये ही तीला Holy Basil, होली बेसिल हे छान समर्पक नांव आहे ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिय युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. तिच्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते.
तुळशीचा आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे तुळस वनस्पतीचे औषधी वनस्पतींमध्ये अग्रगण्य स्थान आहे. तुळस वनस्पतीचे फक्त पानेच गुणकारी नसून या वनस्पतीची फुलेही तितकीच बहुगुणी आहेत. पुढील आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी तुळस वनस्पती हे उत्तम औषध ठरते.
औषधी महत्व सांगणारे काही श्लोक पाहीले की तीचे गुण व उपयोग समजणे सुलभ होईल.
तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत।.
तुळस ही कडू-तिखट.तुळस ही हृद्योष्ण पित्त आणि भूक वाढवणारी
तर दुसऱ्या श्लोकात श्लोक कर्ता म्हणतो.
त्रिकाल बिनता पुत्र प्रयाश तुलसी यदि। विशिष्यते कायशुद्धिश्चान्द्रायण शतं बिना।।
तुलसी गंधमादाय यत्र गच्छन्ति: मारुत:।
दिशो दशश्च पूतास्तुर्भूत ग्रामश्चतुर्विध:।।
जर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी तुळशीच्या पानांचे सेवन केले तर मनुष्याचे शरीर एवढे शुद्ध होते, जेवढे चांद्रायण व्रत केल्यानंतरही होत नाही. तुळशीचा गंध जेवढा दूरपर्यंत जातो तेथील वातावरण आणि त्याठिकाणी निवास करणारे जीव निरोगी आणि पवित्र राहतात.
आयुर्वेद दृष्टीने महत्त्व ः
लघू, सूक्ष्म, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधील सर्वांत उपयुक्त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते, शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोचू शकते. यामुळे आत्ययिक अवस्था (इमर्जन्सी) असली की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो.
तुळशीतील औषधी कंटेन्ट.
तुळशीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रीशन आणि व्हिटॅमीन्स आढळतात. उदाहरणार्थ
व्हिटॅमीन ए, बी, सी आणि के,कॅल्शियम,आर्यन,क्लोरोफिल,झिंक,ओमेगा- 3,मॅग्नेशिअम,मँगनीज,कॅम्फेन, किनोल, यूग्नोल, कार्वक्रोल आणि मिथाईल चााविकोल या औषधीय गुणांनी युक्त असते तुळस.
तुळशीच्या जाती
१)औषधी तुळस - Fever plant of Sierra Leone (Ocimum viride)
२)कापूर तुळस - Camphor basil (Ocimum kilimandscharicum)
३)काळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- Hoary basil (Ocimum americanum)
४)कृष्ण तुळस - Sacred basil (Ocumum sanctum/tenuiflorum)
५)रान तुळस - Sweet basil (Ocimum basilicum)
६)राम तुळस - Shrubby basil (Ocimum gratissimum)
*धार्मिक महत्त्व
तुळशीच्या पतीच्या मृत्यूनंतर प्रभू विष्णूने तुळशीला आपल्या प्रिय सखीप्रमाणे मानले होते. तेव्हा तुळशीने त्याच्या घरात येण्याची परवानगी मागितली परंतू विष्णू म्हणाले की माझे घर देवी लक्ष्मीसाठी आहे तर हृदय तुझ्यासाठी. तेव्हा तुळशीने म्हटले की घरात स्थान मिळत नसेल तर घराबाहेर तरी राहण्याची परवानगी द्या. तेव्हा विष्णूने होकार दिला. तेव्हापासून तुळस घर आणि मंदिराच्या बाहेर लावली जाते.
औषधी उपयोगः
*चरक सूत्रस्थानातील या श्लोका पासून आपण तुळशीच्या औषधी उपयोगाची माहिती घेण्यास सुरू करू.
हिक्का कासविषश्वास- पार्श्वशूलानिनाशनः ।
पित्तकृत् कफवातघ्नः सुरसः पूतिगन्धहा ।।... चरक सूत्रस्थान
अर्थःउचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळशी उपयुक्त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळशी दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते.
*रोगप्रतिकारशक्ती व कोरोना संक्रमण टाळता येईल कारण तुळशीच्या बियांमध्ये फ्लेवोनाईड आणि फेलोनिक असल्याने ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. तुळशीमध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंट शरीराला होणा-या फ्री रेडीकल्सच्या प्रभावापासून संरक्षित करतात. जर तुम्ही रोज दिवसातून एकदा जरी तुळशीची पाने गिळलीत किंवा त्याचा पानांचा चहा (herbal tea) करुन प्यायला तर त्यापासून तुमच्या शरीराला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. कारण आपली व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असेल तर आपण कोणत्याही आजाराचा सामना सहज करू शकतो.कोरोना सारख्या आजारात तुळस आपल्या शरीरासाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. शरीरातील इन्फेक्शनशी लढणाऱ्या अँटीबॉडीजच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ करते, ज्यामुळे आपलं आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं.यासोबत गुळवेलीचा काढा व अश्वगंधा चुर्ण, शतावरी चुर्ण घालून घेतल्यास. तुम्हाला हा आजार एकतर होणार नाही किंवा झाल्यास रँपिड रिकव्हरी होईल. आयुष्य मंत्रालयाने दर्शवल्या नुसार लवंग,दालचिनी,पिंपरी,आले,मीरी यांचा सह वरील उल्लेख लेले घटक घालून ही काढा पिऊन रोगाशी फाईट देता येईल.
* तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लीटर पाण्यात वेलची पावडर, साखर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने उकळून घ्यावी. तीन तासांच्या अंतराने हा काढा रुगणाला दिल्यास ताप कमी होतो.
*तुळशी, काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून प्यायल्यानेही सर्दी-पडसे ठिक होते.
* तुळशीची काही पाने, संत्र्याची साल घेऊन त्यात गुलाबजल मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटे चेह-यावर लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेह-यावरील मुरूम जाऊन चेहरा उजळण्यास सुरूवात होईल.
*तुळशीच्या पानांच्या रसात चंदन पावडर टाकून त्याचाही रस बनवू शकता. तुळस रक्त शुद्ध करून टॉक्सिनचे प्रमाण कमी करत असल्याने आणि तुळशीच्या पानात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरीयल तत्व असल्याने मुरुम पुटकुळ्या, तारुण्यपिटीका या समस्या दूर होतात.
*तुळशीच्या वाळलेल्या पानांची गरम पाण्यात वाफ घेणे हा डोकेदुखी व मनशांती साठी सर्वात चांगला उपाय आहे.
* तुळस कॅन्सरवर प्रभावशाली आहे. त्यामुळे रोज तुळशीची पाने गिळणार्या अथवा रस घेणाऱ्या व्यक्तींना कॅन्सर होण्याची संभावना फार कमी असते. दहा ग्रॅम तुळशीच्या पानांचा रस 20 ते 30 ग्रॅम ताजे दही किंवा 2 ते 3 चमचे मधाबरोबर नियमित घेतल्यास हे कॅन्सरवर गुणकारी औषध ठरते.
*तुळशीचा रस हा डेंग्यू आणि मलेरियाचा ताप कमी करण्यासाठी गुणकारी आहे.
*कोड ,पांढरे डाग,लालसर, गुलाबी डाग सातत्याने तुळस तेल लावल्यास कमी होतात.
* तुळशीचे तेल दुखण्यावर उपयोगी पडते. शरीरातील कोणताही अवयव दुखत असल्यास त्यावर तुळशीच्या तेलाचा प्रयोग करा. दुखण्यावर आराम मिळेल.
* थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील, तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायांच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो.
*दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.
*लघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन म्हणजे अनावश्यक चरबी कमी करण्याचे काम करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता वाढलेली चरबी कमी होते.
* कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो.
* मुखामध्ये कफदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळशी उपयोगी असते. तुळशीचा रस हे काम उत्तम करतो.
*पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरवण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुण्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते
*शरीरात कुठेही जडपणा, जखडलेपण जाणवत असेल तर त्यावर तुळशी उपयोगी पडते.रस प्या व तेल लावा.
* डोके जड होऊन दुखत असेल, कफ भरून राहिला असेल, तर डोक्यावर पानांचा शेक करण्याचा फायदा होतो.
* सायनसमध्ये कफ भरला असेल, जडपणा जाणवत असेल, तर बाहेरून तुळशीच्या पानांनी शेक करण्याने लगेच बरे वाटते.
* पचनसंस्थेमध्ये कफदोष वाढल्यामुळे पोट जड होणे, सुस्ती वाटणे, तोंडाला चव नसणे वगैरे लक्षणे जाणवतात, अशा वेळी तुळशीची पाने व आले यांचा चवीपुरती साखर टाकून बनवलेला चहा घोट घोट पिण्याने बरे वाटते.
*खाज येणाऱ्या त्वचारोगात तुळशीच्या पानांचा रस लावण्याचा उपयोग होतो
*तुळशीची पाने वाफवून त्यांचा छातीवर लेप केल्यास कफयुक्त खोकला कमी होतो.
* टॉन्सिल्सच्या सुजेमुळे घसा दुखत असेल, घशात कफ साठल्यासारखे वाटत असेल, तर तुळशीची पाने वाफवून त्यांचा लेप करण्याने बरे वाटते.
* रोज काही वेळ तुळशीच्या रोपाच्या सानिध्यात बसल्यास अस्थमा आणि श्वास घेण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते.तसेच नियमितपणे दोन चमचा रस तमालपत्र चुर्ण व मध घालून चाटण करा.
*तुळशीची पानं उकळलेल्या पाण्याने चूळ भरल्यास तोंडाच्या कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून सुटका मिळते.
*दातांमध्ये तुळसतेल भरल्यास दातांच्या वेदना कमी होतात
*तुळस पानांचे 2, 3 थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होते.
*लहान बाळांच्या अंघोळीसाठी तुळशीच्या पानांना पाण्यात टाकून त्याने अंघोळ केल्यास आरोग्यदायी मानले जाते.
*पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जिवाणूंचे संक्रमण कमी होते. *तुळस पानांना कूटून त्यांना मधासोबत घेतल्यास गळयातील कफ दूर होतो
*तुळसपानांचा वापर दातांचे दूखणे हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर केल जातो. तूळस पाने 5,10 मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. (या उपाययोजने बद्दल काही ठिकाणी मत वेगळी आहेत. काही लोक पारा असल्याने वापरु नये म्हणतात तर अनेक पुस्तकात दुखतांना दातात लाभप्रद म्हणतात आपण दात अपले हलके असल्यास हा उपाय न करणेच उत्तम.)
*तूळस पानांचा लेप त्वचा संक्रमणावर लावून उन्हात बसल्यास व वाळल्यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास फार लाभ मिळतात
* स्त्रियांच्या खाजगी जागांवरील विविध संक्रमणासाठी तुळसपानांच्या लेपाचा वापर होतो.
* फार डोके दुखणे ( मायग्रेन ), नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळसपानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते.
*तुळसतेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास फायदा होतो. केसांच्या तेलात तुळसतेल मिसळून त्याने केसाची मालीश केल्यास डोकेदुखी कमी होते.
*तुळशीतील कॅम्फेन, किनोल, यूग्नोल, कार्वक्रोल आणि मिथाईल चााविकोल या औषधीय घटकांमुळे डोकेदूखी कमी केल्या जाते.
*पाण्यासोबत तुळसपानांचा रस घेतल्यास शरीरातील विविध संस्था निटपणे कार्य करतात त्यामूळे शरीरास वृध्दावस्था लवकर येत नाही.
*डोळयांमध्ये संक्रमण झाल्यास त्यांना तुळसपानांनी धूतल्यास डोळयातील संक्रमण बरे होते.
*डोळयांची सूज, आणि डोळे जळजळीवर तूळसतेल डोळयांत 2,3 थेंब टाकल्यास डोळे निरोगी होतात.
*डोळयातील विविध व्याधींसाठी वापरल्या जाणा-या आयुर्वेदिक ड्राॅप आणि औषधीमध्ये तुळसतेलाचा वापर होतो.
*तुळशीचा वापर रेडिएशनच्या आणि विषजन्य परजिवांच्या बचावासाठी करतात
*हातपायामधील दुखणे या सर्वांवर चांगले वेदनानाशक मानले जाते.
* तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
* तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते.
* लहान मुलांना मुदतीचा ताप व इतर ताप.
ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. लहान मुलांना ताप आल्यानंतर तुळशीच्या तेलाने मालिश केल्याने ताप कमी करण्यास मदत होते.
* एक चमचा तुळशीच्या रसाचं रोज सेवन केल्यास पोटासंबंधित सर्व आजार हळूहळू दूर होतात.
त्वचा जळल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास लाभदायक ठरतो.
*कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे यासारख्या समस्यावर तुळशीचा रस कोमट करून कानात घातल्यास फायदा होऊ शकतो. (पण हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
*लिंबाच्या रसासोबत तुळशीच्या पानांचा रस चेहऱ्याला लावल्यास ग्लो वाढतो.
* ताप आणि सर्दी कमी होण्याकरता दुसर्या पध्दतीने उपाय
एक कप पाण्यात 5 ते 7 तुळशीची पानं चांगली उकळून घ्या. मग ते पाणी गाळून दिवसातून कमीत कमी दोन वेळा प्या.
*जर तुम्हाला मायग्रेन किंवा डोकेदुखीचा वारंवार त्रास होत असल्यास तुळशीच्या पानांचा काढा करून प्या . लगेच फरक पडेल.
तुळशीसोबत काळीमिरीचं सेवन केल्यास पचन चांगलं होतं.
*नैसर्गिकरित्या तणाव कमी करण्यासाठी एका दिवसता कमीत कमी एक वेळा तरी तुळशीचा चहा नक्की प्या.
तुळशीचं बी दह्यासोबत खाल्ल्यास पाईल्सचा त्रास दूर होतो.
*ज्या लोकांना जास्त थंडी वाजते त्यांनी तुळशीची 8-10 पानं दूधात उकळून प्यावी.
*जखम झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास जखम लवकर भरते आणि इन्फेक्शनही होत नाही.
तुळशीची पानं तेलात मिसळून त्वचेला लावल्यास जळजळ कमी होते.
*तुळशीची पानं वाटून चेहऱ्यावर किमान 10 मिनिटं लावा आणि चेहरा धुवा. यामुळे स्कीन हायड्रेट होते आणि हे अँटी एजिंग म्हणूनही काम करतं.
*तुळशीच्या तेलाचा वापर केल्यास कोंडा आणि ड्राय स्कॅल्पपासून सुटका मिळते.
*लिव्हरचा त्रास असल्यास रोज सकाळी तुळशीची पानं सकाळी पाण्यात उकळून प्यावी.
*डोळ्यांची आग किंवा खाज येणे अशी समस्या असल्यास तुळशीच्या पानांच्या अर्काचा वापर करावा.
*आणखी एक उपाय सर्दी, पडसे किंवा तापासाठी खडीसाखर, काळे मिरे आणि तुळशीच्या पानांना पाण्यामध्ये उकळून काढा करावा आणि त्याचे सेवन करावे. आपण या काढ्याचा घोळ वाळवून याच्या बारीक बारीक गोळ्या बनवून खाल्ल्यामुळे सर्दी, पडसे आणि तापामध्ये आराम मिळतो.
*पायरीया मुळे सडून तोंडात वास येत असेल त्यांनी दररोज सकाळी उठल्यावर तुळशीचे पान तोंडात ठेवावे, असे केल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते.
* अनेक दिवस बरी न होणारी जखम झाल्यास तुळशीच्या पानांना तुरटीबरोबर जखमेवर लावल्याने जखम लवकर बरी होते.
* रोज सकाळी उठल्यानंतर तुळशीच्या रस पिल्याने तुमची स्मरणशक्ती वाढू शकते.
*मलेरीया आणि डेंग्यू झाल्यानंतर ही तुळशीचा रस पिल्यावर आराम मिळतो .
*गजकर्ण वर उपचार तुळशीचा रस लावला जातो.
*वार्धक्य कमी करण्यासाठी तुळशीचा रस प्यायल्यास फायदा होतो.
*त्वचा विकार आणखी या पध्दतीने उपाय
कोणत्या प्रकारचं स्कीन इन्फेक्शन असेल तर त्या स्कीन इन्फेक्शनवर बेसनासोबत तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून स्कीनवर लावावी, नक्कीच फायदा होईल.
*तुळशीच्या पानांमध्ये अँटी स्ट्रेस एजंट आढळतात जे आपल्यावरील तणाव आणि मानसिक असंतुलनाला बरं करतात.
*कॅन्सरच्या ट्यूमर पसरण्यापासून रोखते. असं म्हणतात की, नियमितपणे तुळशीचं सेवन करणाऱ्यांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी असते.
*अनियमित किंवा उशिरा येणाऱ्या पिरियड्सची समस्या आजकाल बऱ्याच मुलींमध्ये दिसून येते. साधारणतः पिरियड्सची सायकल ही 21 ते 35 दिवसांची असते. जर तुमचे पिरियड्स 35 दिवसांनंत येत असतील तर अशावेळी तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास फायदा होतो. यामुळे मासिक पाळीतील अनियमितता दूर होते.
* पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो. तज्ज्ञांनुसार तुळशीची पान आणि बिया दोन्हीही पोटाचा अल्सरवर गुणकारी आहेत.
* किडनी स्टोन असेल तर तुळशीचा ताजा रस मधात घालून रोज किमान 4 ते 5 महिने सेवन करावा. यामुळे मूत्रावाटे किडनी स्टोन पडून जाईल
तुळस आपल्या त्वचेवर अँटी एजिंगच्या रूपात काम करते.
*डागविरहीत चेहरा आणि तजेलदार त्वचेसाठी तुळस खूपच फायदेशीर आहे.
*केसांच्या प्रत्येक समस्येपासून तुळस सुटका करते.
*गर्भवती महिलांमध्ये उलटी होण्याची समस्या आढळते. या समस्येवर तुळशीची पानं फायदेशीर ठरतात.
*वजन कमी करण्यासाठी रोज तुळशीच्या पानांचा रस घेतल्यास फायदा होतो.
*यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यताही कमी होते.
*तुळस कॉलेस्ट्रॉल कमी करून रक्तातील गुठळ्या होणं ही थांबवते.
*लैंगिक रोगांमध्येही तुळशीच्या बियांचा उपचारासाठी वापर केला जातो.
*धूम्रपान सोडण्यासही तुळस खूप फायदेशीर ठरते.
*जळजळ आणि सूज यांसारख्या समस्यांवर आरामासाठी तुळशीचा उपयोग होतो.
**तुळशीचा वापर करताय मग हे नियम पाळा.
तुळशीच्या पानांना खाण्याचा योग मार्ग म्हणजे ती पानं गिळणं किंवा त्याचा रस, काढा बनवून पिणं. चहा किंवा इतर प्रकारे पाण्यात तुळशीची पान उकळून पिता येतात. पण चूकूनही तुळशीची पान चावू नये. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे तुळस ही पूजनीय आहे आणि दुसरं म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये पारा धातूची तत्त्व आढळतात, जी पानं चावल्याने दातांवर लागू शकतात. पाऱ्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पान चावण्याऐवजी ती गिळावी किंवा चघळावी. यामुळे अनेक प्रकारच्या रोगांमध्ये फायदा होतो.
टिपःऔषधासाठी तुळशीची पाने हवी असतील तेव्हा ती मंजिऱ्या न आलेल्या तुळशीची घ्यायची पद्धत आहे. कारण एकदा मंजिऱ्या आल्या की पानातील गुण कमी होतात.
प्रस्तुत माझ्या लेखातून दरवाजातील तुळशीच महत्त्व व तुळस प्रत्येक घरात का असावी हे ही कळले असेल.हे साधे सोपे स्वस्त सहज उपलब्ध होणारे झाड आपल्या ही दारात असेल अशी आशा आहे.नसल्यास आजच लावा व आपल्या निरोगी आयुष्याचा संकल्प याच झाडाच्या पुढ्यात सोडा.असे हे पाँझिटीव्ह एनर्जी देणारे झाड आपल्याला खूप उपयोगी पडेलच व्याधिमुक्त रहायला.हा विश्वास आहे.आपल्याला लेख आवडेल अशी आशा आहे.पोस्ट लिहीताना पुस्तके व संदर्भ अभ्यासून तपासले जात असल्याने उपाययोजना खात्रीशीरच असतात.
वैद्य गजानन
77 15 99 40 60

0 टिप्पण्या