एकनाथांच्या शिवसेनेचा कुरकुरणारा पाळणा
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 03/12/2024 : सध्या सर्वत्र गुलाबी थंडीच थैमान सुरू आहे कारण तामिळनाडूत भलं मोठ वादळ येऊन गेले आहे त्यामुळे कोट्यावधी रुपयांच अतोनात नुकसान झाले आहे परिणामी या वादळाने थंडीला चांगलीच फोडणी दिली आहे , अशात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता त्या निकालाचा दशक्रिया विधी सुध्दा झाला आहे पण अजूनही महायुतीचा मुख्यमंत्री ठरेना किंवा या सरकारचे मंत्री कोण होणार हेही तितकंच गुलदस्त्यात आहे त्यामुळे हे सगळे सत्तेचे गदाधारी आणखीन जास्त चलबिचल होत आहेत अर्थात या सरकारचा तेराव्याला शपथविधी सोहळा होणार हे आता स्पष्ट झाले आहे .
वास्तविक या नव्या सरकारचा शपथविधी सव्वीस नोव्हेंबरला होणे आवश्यक होते पण ' कशात काय अन् फाटक्यात पाय ' असल्याने हा शपथविधी भलताच लांबला हे काही केल्या पचनी पडत नाही जसे की उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी केवळ दोनदाच मंत्रालयात जाऊन इतर वेळी घरबसल्या फेसबुकवर कोमट पाणी कसे ढोसावे असे उपदेशाचे डोस दिल्यासारखेच होते , अर्थात ते आताच्या शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्या देखील पचनी पडले नव्हते पण म्हणून त्यांनी त्याचवेळी सत्तेतून बाहेर पडण्याचा हंटर काढला असता तरी त्यांच्या पक्षाची इतकी गलितगात्र अवस्था झाली नसती पण ' केले तुका अन् झाले माका ' म्हणून निकालानंतर ईव्हीएमच्या नावाने खडे फोडायची अवदसा त्यांना आठवली नाही का ॽ
असो राजकारणात ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडणार हे जरी मान्य केले तरी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात भलतीच माया जशी कमावली तशीच माया कोमट पाणी प्यायला न देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख व त्यानंतर दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते कमावली हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही कारण त्यासाठी तर गृहमंत्री पद भलतेच महत्त्वाचे भाव खाऊन उगाच जात नाही त्यामुळे तर सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री याच गृहमंत्री पद पदरात पाडून पवित्र होण्यासाठी भलतीच धावाधाव करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खंडाळ्याचा घाट दाखवत आहेत , पण एकनाथ शिंदे हे अशी काही तरी तिकडमबाजी करणार याचा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना होता म्हणून तर त्यांनी सर्वांचा विरोध डावलून अजितदादा पवार यांच्या पंखात चांगले बळ दिले त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पाळणा आता ऐनकेन प्रकारे मागील दहा दिवसांपासून दर तासागणिक भलताच नको तितका कुरकुर करत नाटकांचे विविध प्रयोग करत आहे पण आज रात्री किंवा उद्या ज्यावेळी दिल्लीच्या हंटरचा आवाज बाहेर पडेल त्यावेळी यांच्या कुरकुरणाऱ्या पाळण्याचा आवाज कायमचा बंद होईल अर्थात तोपर्यंत संजय शिरसाट , उदय सामंत काय किंवा दीपक केसरकर यांनी मागण्यांचा यथेच्छ पाऊस पाडावा.
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
दिनांक -०३/१२/२०२४ .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक
0 टिप्पण्या