आत्महत्या दूस्तर ,महापाप, महादोष :
इति श्रीमद् गुरुचरितम्.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/10/ 2024 : सध्याच्या काळात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मानसिक ताणतणाव, आर्थिक संकटे, शारीरिक आजार, कौटुंबिक समस्यांसह विविध कारणांनी लोक आत्महत्येकडे वळत आहेत. परंतु, "श्रीमद् गुरूचरित्र" या अतिशय पवित्र दत्त ग्रंथातून श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीगुरु नरसिंह सरस्वती यांच्या चरित्रात आपल्याला कळते की, आत्महत्या हे एक महादोष, महापाप आहे आणि जीवन हे परमेश्वराचे वरदान आहे. ह्या लेखामध्ये आपण ह्या दोन्ही महान दत्तगुरु अवतारांच्या शिकवणीचा मागोवा घेत आत्महत्येचे दुष्परिणाम व त्यापासून वाचण्यासाठी जीवनातील सकारात्मकतेचे महत्त्व समजून घेऊ.
श्रीपाद श्रीवल्लभ यांची कथा (गुरुचरित्र अध्याय आठवा):
श्रीपाद श्रीवल्लभ हे श्रीदत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडले ज्यातून त्यांनी लोकांना जीवनातील अडचणींवर मात करण्याचे धडे दिले. श्रीगुरुचरित्रातील आठव्या अध्यायात यासंदर्भात उल्लेख आढळतो.एक माता व तिचा मुढ मुलगा लोकनिंदेमुळे अत्यंत त्रस्त व निराश होऊन आत्महत्या करण्यासाठी नदीत जीव देण्याच्या उद्देशाने जातात तेव्हा श्रीपादांनी आत्महत्या 'दूस्तर'असल्याचे सांगून प्रबोधन केले व आपल्या अलौकिक अवधूत शक्तीने त्यांच्या जीवनात बदल घडवून आणला.
श्रीगुरु नरसिंह सरस्वती यांची गुरुचरित्रातील शिकवण (गुरुचरित्र अध्याय तेरावा)
श्रीगुरु नरसिंह सरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात. 'श्रीमद् गुरुचरित्र' या ग्रंथात तेराव्या अध्यायात पोटदुखीने त्रस्त भक्त निराशेने ग्रासून आत्महत्या करण्यासाठी नदीत जात असताना
श्रीगुरु नरसिंहसरस्वती यांनी आत्महत्या महापाप व महादोष असल्याचे सांगितले व प्रबोधन करुन त्यास आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले तसेच चौदाव्या अध्यायात आपल्या अवधूत शक्तीने व्याधीमुक्त केले.
आत्महत्येचे दुष्परिणाम आणि त्यापासून वाचण्याचे मार्ग:
आत्महत्या केवळ एका व्यक्तीचे आयुष्यच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करते. आध्यात्मिक दृष्ट्या ते एक महापाप व महादोष समजले जाते. कारण हे अमूल्य जीवन ईश्वराचे वरदान आहे, त्याचा अंत करण्याचा अधिकार कोणालाही नाही अगदी स्वतः लाही नाही.
दत्त अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीगुरु नरसिंह सरस्वती यांनी आत्महत्या टाळण्यासाठी त्याकाळात दिलेली शिकवण सध्याच्या आधुनिक काळातही आत्मसात करणं गरजेच बनलं आहे.
जीवनात सकारात्मकता कशी निर्माण करावी?
1. ईश्वरावर श्रद्धा ठेवावी:
संकटाच्या काळात ईश्वरावर विश्वास व श्रध्दा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
2. ध्यान साधना करावी:
ध्यानाद्वारे मनाची शांती व स्थिरता प्राप्त होते.
ज्यांचा ध्यान धारणेवर विश्वास नसेल अशांनी कमीतकमी प्राणायाम एक श्वासाचा व्यायाम म्हणून तरी करावा.
3. कौटुंबिक व मित्र परिवार यांचा आधार मिळवावा:
कुटुंबाशी व मित्रमंडळींशी मोकळेपणाने बोलावे आणि मदतीची अपेक्षा करावी. मनात कुढत बसू नये लोकांशी संवाद साधला तर ओझ हलकं होत. कुठल्याही समस्येवर बोलून मार्ग नक्कीच निघतो. त्यामुळे सकारात्मक विचार करावा.
4. व्यवस्थित ताणतणाव व्यवस्थापन करावे:
मानसिक तणाव खुप जास्त असेल तर मानसोपचार तज्ज्ञ यांचा सल्ला घेऊन तणाव दूर करण्याचे उपाय करावेत.
महत्वाचे: अगदी काहीच जमलं नाही तर रोज काही ठराविक ओळी किंवा जमलं तर एक पान/काही पाने नियमित गुरूचरित्र ग्रंथ वाचन सुरू करावे.या नित्य भक्ती उपासनेला सोवळ्याचे कडक बंधन नाही. गुरुचरित्र वाचनाने जीवनात नक्कीच सकारात्मक मार्ग निघतील.
निष्कर्ष:
आत्महत्या महादोष व महापाप आहे, आपल्या पश्चात कुटुंबाच काय होईल हे समजून घेत, श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीगुरु नरसिंह सरस्वती यांच्या शिकवणीतून जीवनाचे खरे महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करावा. संकटांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून जीवनात प्रगती करण्यासाठी आपले मनोबल दृढ करणे आवश्यक आहे. श्रीगुरुचरित्र वाचनाने दत्तगुरुंच्या अचाट शक्तीचा अनुभव व कृपालाभ जीवनात एकदा तरी नक्की घ्यावा व कल्याण करून घ्यावे.
वंदे गुरुचरितम् माम् उध्दर त्वरितम्
।।श्री दत्त:शरणं मम्।।
लेखन सेवा:
नंदन पंढरीनाथ दाते.

0 टिप्पण्या