गुरुदेव ! दया कर दे ! हम ध्यान धरें तेरा !!

 

गुरुदेव ! दया कर दे !

हम ध्यान धरें तेरा !!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 19/10/ 2024 : वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी करिता लाखो गुरुदेव सेवक त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता गुरुकुंज मोझरी येथे येत असतात. जणू काय ही विदर्भ पंढरीचा भास जाणवतो. श्रीकृष्ण द्वापार युगातले युगप्रर्वतक आहेत. त्यांनी भगवत्गीता सांगितली. तसेच कलीयुगातले युगप्रवर्तक वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. त्यांना पंढरपूर येथे ग्रामगीता लिखाणाची स्फूर्ती मिळाली. त्यांनी ग्रामागीता लिहली. राष्ट्रसंतांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. पंथभेद नाहिसा केला. त्यांनी सामुदायिक प्रार्थना व सामुदायिक ध्यानाची योजना आखली. त्यामुळे आध्यात्मिकतेचे बीज रोवल्या गेले. त्यांची ग्रामगीता सद्धर्म, लोकवशीकरण, ग्रामनिर्माण, दृष्टी परिवर्तन, संस्कार शोधन, प्रेमधर्म, देवत्व साधन, आदर्श जीवन शिकवते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कसे संस्कार करावेत हे शिकवते. महाराज सामुदायिक ध्यानामध्ये म्हणतात.

गुरुदेव ! दया कर दे, हम ध्यान धरें तेरा ।

दासोंको यही वर दे, हम ध्यान धरें तेरा ।।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, हे गुरुदेवा आमच्यावर दया करा. आम्ही तुझे ध्यान करु. या तुझ्या सर्व सेवकांना असा वर दे की, तुझं ध्यान ते कधीही विसरणार नाही. आपण सामुदायिक प्रार्थना व सामुदायिक ध्यान प्रत्येक घराघरातून आणि प्रत्येक गावागावातून गुरुदेव सेवा मंडळाचे माध्यमातून रुजविण्याचा प्रयास केला पाहिजे. आपल्या पुढील पिढींवर संस्कार करणारी ही शिदोरी आपल्या मनामनात रुजवली पाहिजे. ही गुरुदेवाला अर्पण केली जाणारी आराधना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.

चल-चल भाई ! करे सफाई ।

कूडा-कचरा साफ करें ।

बहूत दिनोंका रुका हुआ है ।

मिलकर सुंदर आज करें ।।

 गुरुदेवाचे ध्यान करायचे असेल तर आपण आपल्या गावातील काडी-कचरा साफ करतो आणि गावाला सुंदर बनवतो तसेच आपल्या मन मंदिरात असणारी घाण, गढूळपणा, वासना, व्यसन साफ करुन मनाला एक पवित्र मंदिर बनवू या. आपले शरीर हे एक परमेश्वराचे जणू मंदिरच भासायला हवे. तेव्हा कुठे सामुदायिक प्रार्थना व सामुदायिक ध्यान आनंदाने होऊ शकेल. पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.

येतिल गुरुराजे, पहायासी निर्मळ मंदिर माझे ।।

पुष्पे वाहिन मी भावाची, घालिन माळ जिवाची ।

गुरुच्या हृदयासी, प्रेमाची उटी लाविन गंधाची ।।

गुरुदेवाची ध्यान धारणा करावी. आपले शरीर मंदिरासारखे ठेवले तर गुरुदेव आपले निर्मळ मंदिर पाहावयासी येतील. जीवाभावाने गुरुदेवाला आसनावर बसवून फुले वाहावीत. गळ्यात तुळशी माळ तसेच कपाळावर गंध लावले म्हणजे आपले विचारात विकार राहणार नाही. आपले मन मंदिर पवित्र वाटायला पाहिजे. आपले आचरण सदैव निरव्यसनी असावे. अशाप्रकारे गुरुदेवाची ध्यान धारणा केली की, गुरुदेवांची सेवकांवर दया होईल. राष्ट्रसंत पुढे म्हणतात.

येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली ।

या आयुष्याची दोरी कमी जाहली ।।

हे गुरुदेवा, वयोमानानुसार जीव घाबरायला लागला आहे. श्वास कधी निघून जाईल कळत नाही. गळा खरखरायला लागला आहे. हे गुरुदेवा फक्त तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली आहे. आता माझ्यात वासनाच शिल्लक राहिली नाही. मला शेवटी तुझी सेवा घडावी हीच चिंता मी तुला वाहिली आहे. कारण या आयुष्याची दोरी कमी झाल्यासारखी वाटायला लागली आहे. हे गुरुदेवा आतातरी दया येऊ दे, तुझा सेवक तुझे नित्य नेमाने ध्यान करीत आहे. राष्ट्रसत गुरुदेवाला म्हणतात.

येशिल ना शेवटी तू,गुरुराया धावुनी ।

जव नेती ओढुनिया, मम प्राणा काढुनी ।।

 हे गुरुदेवा तु शेवटी धावुन येशिल काय? जेव्हा माझे प्राण यमराजा ओढून, काढून नेईल. मरणाचे संकटाला कुणीही आपले धावुन येत नाही. हे गुरुदेवा माझ्या डोक्यावर हात ठेवून माझं भलं करं. कुणी म्हणतात की, मृत देहाला बाहेर काढा. चिता रचली  जाते. कुणी म्हणायला लागतात की, काळाने काढून नेला. राष्ट्रसंत म्हणतात की, माझी प्रेमभक्ती भोळी आहे. शेवटी गुरु स्मरणी माझे ध्यान लागो. हे गुरुदेवा, आतातरी दया कर. आम्ही तुझे ध्यान सदैव करु. पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.

कुठवरी भोगशिल मौजा? ।

मग येती यमाच्या फौजा रे ।।

मृत्यूनंतर आपले धन, घरदार मुलगा, साथी सगे राखतील. आपण सोबत काही घेऊन आलो नाही आणि जाताना सोबत घेऊन जाता येणार नाही. आतापर्यंत आपण मौजमजा केली. हा मानव जन्म ८४ योनी भोगून आपल्याला मिळतो. तु गुरुदेवाने दिलेल्या मंत्राचा जप कर. हा भवसागर तरुन जाशिल. संत कबिर महाराज म्हणतात.

गुरुबिन कौन बतावे बाट ।

कहत कबिर सुनो भाई साधो ।

क्यो तरना यह घाट ।।

शेवटी गुरुदेवा शिवाय तरणोपाय नाही. हा यम घाट तरुन जाणे फार आवघड आहे. गुरुदेवच आपल्याला मार्ग दाखविल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.

ये माटीकी काया बंदे माटी मिलेगी ।

तेरे पीछे इन्सान कीरत रहेगी ।।

आपण माणूस बनून जन्माला आलो तर पैसा, खजाना घेऊन आलो नाही. दोन दिवसाचे जीवन चांगले जगावे. नंतर आपल्याला हे जग सोडून जावे लागेल. रात्रंदिवस लोकांशी चांगला वागला नाहीस. महाराज म्हणतात की, जो सेवा करुन मरतो त्याला मरणे म्हणत नाही. आपलं नेहमी भलं व्हावं असे वाटत असेल तर--

हरिनाम जपा मन लावूनिया ।

मग मोक्ष सुखा किती वेळ असे ।।

हे गुरुदेवा, आतातरी दया येऊ दे. तुझं ध्यान आम्ही करीत आहोत. या सेवकांना असा वर दे की, आम्ही सदैव तुझं ध्यान करु. शेवठी मोक्ष सुख हवे असेल तर हरिनाम जपायला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात.

व्दार खडा गुरुदेव तुम्हारे ।

हे गुरुदेव दया कर दो ।

करु तुम्हारी चरण वंदन ।

मेरे पाप मिटा करो ।।


पुरुषोत्तम बैस्कार मोझरकर

श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- ९९२१७९१६७७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या